राष्ट्रीय विज्ञान दिन : या 8 शोधांनी आपलं जग बदलून टाकलं

    • Author, सिद्धनाथ गानू आणि गुलशनकुमार वनकर
    • Role, बीबीसी मराठी

भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला.

यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो.

दरम्यान, आज आपल्या आयुष्यात असलेल्या अनेक गोष्टी या वर्षानुवर्ष चालत आलेल्या संशोधनाचं फलित आहेत.

आपल्या भोवतालच्या प्रत्येक वस्तूत एक महत्त्वाचा वैज्ञानिक शोध दडलाय. आम्ही अशा असंख्य शोधांमधल्या आठ गोष्टी निवडल्या. ज्या वाटतात तेवढ्या साधारण नाहीत.

1. इलेक्ट्रिक बल्ब

पहिल्या इलेक्ट्रिक बल्बचा जन्म थोडा वादग्रस्त आहे. तसं तर थॉमस अल्वा एडिसन यांना बल्बचं जनक मानलं जातं, पण त्यांनी शोध लावला साधारण त्याच दरम्यान अनेकांनी पहिला बल्ब पेटवल्याचा दावा केला आहे. या वादाला कारण आहे.

काचेच्या एका निर्वात भांड्यात एका पातळ तारेतून करंट सोडला की त्याचं तापमान वाढून त्यातून प्रकाशाच्या रूपात ऊर्जा उत्सर्जित होते, हा मूळ सिद्धांत आहे, जो 200 वर्षांपूर्वीच हम्फ्री डॅव्ही नावाच्या एका रसायनशास्त्रज्ञानं मांडला होता.

पण अनेकांनी वेगवेगळ्या धातूंच्या तारा आणि हवेचा दाब बदलत नेमका सर्वाधिक प्रकाश कधी मिळतो याचा अभ्यास केला. गंमत अशी की जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत बसून अनेक जण हे प्रयोग करत होते. त्यामुले पहिला बल्ब कोणी पेटवला, याबाबत अचूक माहिती मिळणं तसं अवघडच आहे.

असो, पण बल्बमुळे जगात उजेड पसरला. रात्रीच्या वेळी दिवे-मशालींवर जगणारी दुनिया बल्बच्या उजेडात जग पाहू लागली. 'स्वदेस' सिनेमातला झोपडीत बल्ब लागल्यानंतर आज्जीच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपणारा प्रसंग तुम्हाला लक्षात असेलंच?

अर्थात या बल्बमुळे औद्योगिकीकरणाला बळ मिळालं असलं तरी माणसासाठी एक वाईट गोष्ट घडली- नाईट शिफ्ट! रात्रपाळीच्या नोकऱ्या सुरू झाल्या आणि अनेक लोक वैतागली. साहजिक आहे ना, उत्पादन वाढलं असलं तरी लोकांच्या झोपेची मात्र बोंब झाली.

2. पहिलं इंजिन आणि वाहन उद्योग

सहसा हेनरी फोर्ड यांना वाहन उद्योगाचा जनक मानलं जातं. पण, पहिली गाडी त्यांनी बनवली होती का? फोर्ड यांचं खरं श्रेय गाड्यांचा पहिला कारखाना सुरू करण्याचं होतं.

वाफेवर चालणारी अनेक इंजिन जेम्स वॉट यांच्या जन्मापूर्वीही कार्यरत होती. मग इंजिनच्या शोधाशी त्यांचं नाव का जोडलं जातं?

एकदा त्यांच्याकडे एक न्यूकॉमन इंजिन दुरुस्तीसाठी आलं तेव्हा त्यांना जाणवलं की ते इंजिन किती ऊर्जा वाया घालवत होतं. मग त्यांनी त्यात दुरुस्ती करून त्याला अधिक कार्यक्षम बनवलं आणि 1769मध्ये त्याचं पेटंट मिळवलं.

कार्ल बेन्झ यांनी निकोलस ओटो यांच्या इंजिनच्या मदतीनं 1886 साली एक Automobile, अर्थात एक स्वयंचलित वाहन तयार केलं. आणि त्यानंतर केवळ 15 वर्षांत लंडनच्या रस्त्यांवरचे घोडे गायब झाले.

हेनरी फोर्ड यांनी खरी क्रांती घडवली जगाला गाड्यांच्या फॅक्टरीची कल्पना देऊन. असेंब्ली लाईनची कल्पना कारखान्यात राबवून त्यांनी चारचाकी गाडीचं स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात आणलं.

जगभरातल्या लोकांचा प्रवास यामुळे अधिक सोपा, आरामदायी आणि जलद झाला.

3. सिमेंट काँक्रीट

पर्यावरणाबद्दल बोलत असताना एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं, "खरी जंगलं जाऊन काँक्रीटची जंगलं उभी राहिली आहेत."

सिमेंट आणि त्यापासून तयार होणाऱ्या काँक्रीटचा शोध लागला नसता, तर आपण आजही दगड-मातीच्या घरात राहात असतो. उंच आणि मजबूत इमारती बांधणं शक्य झालं नसतं आणि आजची अत्याधुनिक अवाढव्य शहरं दिसली नसती.

सिमेंट-काँकीटमुळे केवळ बिल्डिंगच नव्हे तर मोठमोठाले पूल, रस्ते, धरणं बांधणं शक्य झालं. म्हणजे एका प्रकारे विचार केला तर मनुष्याच्या भोवतालचं जग आज काँक्रीटनेच बनलेलं आहे.

अर्थात काँक्रिटशिवाय झालेली अनेक मोठाली बांधकामं आहेत. मग ते इजिप्तचे पिरॅमिड असोत वा आग्र्याचा ताज महाल, पण आधुनिक बांधकामयुगाची आणि तंत्राची पायाभरणी 1824 साली जोसेफ एस्पडिन नावाच्या एका इंग्रज माणसानं पोर्टलँड सिमेंटचा शोध लावल्यानंतर झाली असं म्हणायला हरकत नाही.

4. लिफ्ट

जसजश्या इमारती उभ्या राहायला लागल्या, तशी शहरं आणि तिथं राहणारी लोकसंख्या वाढत गेली. पण इमारतींची उंची अजूनही मर्यादितच होती. कारण सोपं होतं - इतक्या वर जाणार कोण, राहणार कोण?

एका इंजिनिअरने गुरुत्वाकर्षणाला झुगारून वस्तू आणि माणसांना हलवता येईल अशी यंत्रणा तयार केली. ही यंत्रणा म्हणजे एलिवेटर किंवा लिफ्ट.

साहजिकच आधी राजवाड्यांमध्ये लिफ्ट लागल्या. त्यांना ने-आण करण्यासाठी एक विश्वासू बाहुबली नेमलेला असायचा. कालांतराने प्राण्यांकडून या लिफ्ट ओढण्याचं काम सुरू झालं. व्यावसायिकरीत्या वीज उपलब्ध झाल्यावर या लिफ्टचं विद्युतीकरण झालं.

लिफ्टनेही तेच झालं जे सिमेंट काँक्रीटनं झालं - इमारतींची उंची वाढू लागली, त्यामळे शहरं ऐसपैस वाढण्यासोबतच उंचउंचही होऊ लागली, नवनव्या गगनचुंबी इमारती उभ्या आहेत त्या याच कारणामुळे की त्यांच्यात लिफ्ट आहेत.

लिफ्टचा शोध लावणाऱ्या एलिशा ओटिस यांनी लोकांना यामध्ये प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी या लिफ्टचं सार्वजनिक प्रात्यक्षिक दाखवलं. त्यात त्यांनी लिफ्टचा दोर तुटून लिफ्ट पडली तरी तुम्ही सुरक्षित राहाल, हेही दाखवलं. तेव्हा कुठं जाऊन लिफ्टचा उपयोग प्रचलित झाला.

5. प्लॅस्टिक

प्लॅस्टिक म्हटल्यावर तुमच्या डोळ्यापुढे कॅरीबॅग, रॅपर्स, खेळणी वगैरे आली असतील. पण जॅकेट्स, कॉर्न फ्लेक्स या गोष्टीही प्लॅस्टिक आहेत असं म्हटलं तर? ह्या सगळ्या गोष्टी पॉलिमरपासून बनतात त्यामुळे शास्त्रीय दृष्ट्या त्यांना प्लॅस्टिक म्हटलं जाऊ शकतं.

पण आपण रुढार्थानं ज्याला प्लॅस्टिक मानतो त्याबद्दल विचार करू या. लिओ बेकलंड या अमेरिकन माणसानं पहिलं सिंथेटिक प्लॅस्टिक शोधलं आणि पाहता पाहता या प्लॅस्टिकनं सगळ्याच गोष्टींमध्ये शिरकाव केला.

पॉलिस्टेरीन, पॉलिस्टर, पीव्हीसी, पॉलिथिन, नायलॉन या विविध प्रकारच्या प्लॅस्टिकचा शोध लागला आणि झपाट्यानं प्रगत होणाऱ्या औद्योगिक विश्वाला हात मिळाला. 1930सालाच्या सुमारास पांढऱ्या आणि दुधी रंगाच्या चकाकत्या पांढऱ्या वस्तू बनवता येऊ लागल्या.

दुसऱ्या महायुद्धानं प्लॅस्टिकच्या वापराला चालना दिली. युद्धोपयोगी वस्तूंमध्ये प्लॅस्टिकचा वापर वाढलाच आणि त्यापाठोपाठ काही वर्षांत बाजारात टप्परवेअर, पेट बाटल्यांची चलती झाली.

प्लॅस्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन जैव-विघटनशील म्हणजे बायो-डिग्रेडेबल प्लॅस्टिक पुढे येत आहे, पण त्याचा वापर म्हणावा तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही.

6. कॅमेरा

आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची धडपड करणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहत असतो. कुठल्यातरी फॅन्सी ठिकाणी जाऊन प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या जोडप्यांचा आणि फोटोग्राफर्सचाही सगळीकडे सुळसुळाट आहे. पण मुळात हा कॅमेरा आला कसा माहीत आहे?

सुरुवातीच्या काळात फोटोग्राफी हा अत्यंत वेळकाढू आणि अंगमेहनतीचा प्रकार होता. धातू आणि लाकडापासून बनवलेले कॅमेरे काचेच्या किंवा धातूच्याच प्लेटवर फोटो घ्यायचे.

कधी कधी सगळी उपकरणं वाहून नेण्यासाठी प्राण्यांचा वापर करावा लागायचा! पण 1888 साली जॉर्ज इस्टमन या अमेरिकन संशोधकानं शोधलेल्या फिल्ममुळे कॅमेराविश्वात क्रांती घडली. ही 'कोडॅक मोमेंट' पुढच्या सगळ्या संशोधनाची पायाभरणीच होती असं म्हणा ना!

20व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या 'कोडॅक ब्राऊनी' कॅमेऱ्यानं फोटोग्राफीच्या जगात लोकशाही आणली असं रॉयल फोटोग्रॅफिक सोसायटीचे महासंचालक डॉ. मायकल प्रिचर्ड म्हणतात.

त्यानंतर कॅमेऱ्याच्या क्षेत्रात झालेले बदल आपण पाहिलेच आहेत. ब्लॅक अँड व्हाईट कॅमेऱ्यात रंग आले, फिल्म्स (ज्याला आपल्याकडे बहुधा 'रोल' म्हणायचे) जाऊन डिजिटल कॅमेरा आले. कॅमेरे नसते तर सध्याचं सेल्फीग्रस्त विश्व कदाचित उभं राहिलंच नसतं, नाही का? अर्थात, हे चांगलं की वाईट हे ज्यानं त्यानं आपापलं ठरवावं!

7. मोबाईल फोन्स

कॅमेरे, सेल्फीजचा विषय निघावा आणि मोबाईल फोनबद्दल बोलू नये असं होऊच शकत नाही, बरोबर ना?

तुमच्यातल्या अनेकांना कंपासपेटी सारखे दिसणारे, अँटेना असलेले आणि बांधकामाच्या वीटेसारखे वजनदार मोबाईल फोन्स आठवतात का?

तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्हाला आजचे स्लीक फोन्स ही केवढी मोठी प्रगती आहे याचा अंदाज येणार नाही कदाचित.

मार्टिन कूपर यांना मोबाईल फोन्सचा जनक मानलं जातं. 3 एप्रिल 1973ला मोटोरोला कंपनीत सिनियर इंजिनिअर असणाऱ्या कूपर यांनी एका प्रतिस्पर्धी कंपनीतल्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की "मी एका अस्सल सेल फोन वरून बोलतो आहे" हाच पहिला मोबाईल फोन कॉल मानला जातो.

सुरुवातीचे मोबाईल फोन्स प्रचंड महागडे होते आणि अर्थात त्यातल्या सुविधा आत्ताच्या मानानं अगदीच तोकड्या होत्या.

1983साली 3500 डॉलर्स किंमत असलेला फोन आणि आज 4-5हजार रुपयात मिळणारा स्मार्टफोन या दोन्हीत केवढा अमूलाग्र बदल झाला आहे, हे तुम्हीच विचार करून पाहा ना!

या एका गॅजेटनं कॅल्क्युलेटर, कॅलेंडर, डायरी, गजराचं घड्याळ यासारख्या अनेक यंत्रांची जागा घेतली. हल्ली लोक मोबाईलचं 'डीटॉक्स' करण्याबद्दल बोलतात ते काही उगीच नाही!

8. इंटरनेट

1986 साली 2308, 1990 साली 313000 आणि 2015 साली सुमारे 3.2 अब्ज लोक. 40 वर्षांत इंटरनेटच्या वापरात झालेली वाढ चक्रावून टाकणारी आहे.

शाळेत 'इंटरनेटची तोंडओळख' असा तास अनेकांना आठवत असेल. लँडलाईन फोनवरून मिळणारं डायल-अप कनेक्शन, मग ते सुरू असताना फोन एंगेज्ड असणं, इंटरनेट एक्सप्लोररचं होमपेज उघडण्याची वाट पाहत बसणं आणि आता क्षणार्धात अख्खी फाईल डाऊनलोड करून देईल असं 4G नेटवर्क असा इंटरनेटचा सुपरसॉनिक प्रवास आहे.

सोशल मीडिया असो, बँकेचे व्यवहार असोत किंवा प्रवास, सिनेमाची तिकीटं, अगदी सलूनमधली अपॉइंटमेंट का असेना. सगळ्या गोष्टी घरबसल्या इंटरनेटवरून करता येतात.

मोबाईल फोन्सवर इंटरनेट आल्यामुळे ते कानाकोपऱ्यात पोचलं. स्मार्टफोन आल्यापासून इंटरनेट नसलेला फोन वापरणारी माणसं विरळाच.

या सगळ्या यंत्रांनी, वस्तूंनी आपल्या आयुष्यात असं अढळ स्थान निर्माण केलं आहे की, त्या नसत्या तर आपलं काय झालं असतं, याची कल्पनाच केलेली बरी. आणखी काय संशोधनं होतील आणि या वस्तू कशा बदलतील हे येणारा काळच सांगेल.

विज्ञानाची कास धरताना आपल्या प्रगतीमुळे निसर्गाचा ऱ्हास होणार नाही इतकीच खबरदारी आपण घेत राहावी हे महत्त्वाचं.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)