You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्रीदेवींच्या मृतदेहावर लेप लावण्याची गरज का भासली होती?
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू कसा झाला यासंदर्भात अनेक दिवस अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले.
दुबई पोलिसांनी श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून अपघातानं झाला असल्याचं स्पष्ट केलं.
जेव्हा श्रीदेवी यांचं पार्थिव भारतात आणलं गेलं, तेव्हा मृतदेह योग्य स्थितीत राहावा यासाठी त्यावर लेप लावण्यात आला होता. काय असते ही प्रक्रिया?
मृतदेहाला लेप लावण्याची प्रक्रिया अर्थात एम्बॉबमेंट किंवा एम्बामिंग नक्की काय असतं? या प्रकियेत नक्की काय होतं? लेप लावला नाही तर मृतदेहावर काय परिणाम होऊ शकतो?
एम्बॉमिंग काय असतं?
मृत्यू झाल्यानंतर मृतदेह योग्य अवस्थेत राहावा यासाठी लेपन प्रक्रिया केली जाते. मृतदेह टिकवण्यासाठी हजारो वर्षांपासून माणसं वेगवेगळी प्रक्रिया अवलंबत आहेत. यामध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो.
दिल्लीस्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी या प्रक्रियेबद्दल बीबीसीला सविस्तर माहिती दिली.
मृतदेह सुरक्षितपणे टिकावा यासाठीच ही प्रकिया राबवली जाते. मृतदेहाला कोणतंही इन्फेक्शन होऊ नये, त्याला दुर्गंधी येऊ नये, मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावा यासाठी लेपन प्रक्रिया करणं आवश्यक असतं.
लेपन प्रक्रियेत काहीजण रसायनांचा तर काही मद्याचा वापर करतात. काहीवेळेला आर्सेनिक आणि फॉर्मलडिहाइड यांचा वापर केला जातो. ही सगळी वेगवेगळी रसायनं आहेत ज्याद्वारे मृतदेह सडण्यापासून वाचवला जातो.
या सर्व रसायनांमुळे मृतदेह सुरक्षित राहतो आणि त्याची नेआणही करता येऊ शकतो.
किती दिवस मृतदेह टिकतो?
मृतदेहावर किती प्रमाणात लेप लावण्यात आला आहे यावर तो किती दिवस टिकेल हे ठरतं. सर्वसाधारणपणे जी रसायनं वापरली जातात त्यानंतर तीन दिवस ते तीन महिने एवढ्या कालावधीकरता मृतदेह टिकवता येतो.
पण एम्बामिंग केलं नाही तर काय?
ही प्रक्रिया केली नाही तर मृतदेह हाताळणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. मृतदेहातून अनेक प्रकारच्या वायूंची निर्मिती होते. विषाणूंचं संक्रमणही होत असतं. मृतदेहातून मिथेन आणि हायड्रोजन सल्फाइडसारखे विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू दुर्गंधीही निर्माण करतात. या व्यतिरिक्तही जे वायू मृतदेहातून बाहेर पडतात ते घातक ठरू शकतात.
मृतदेह धोकादायक होतो?
प्रत्येकवेळी मृतदेह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना एम्बामिंगची प्रक्रिया राबवावी लागते का, असं विचारलं असता डॉ. गुप्ता यांनी सांगितलं, "प्रत्येकवेळी लेपन करणं आवश्यक असतं. जेव्हा मृतदेहाची नेआण केली जाते तेव्हा लेपन करण्यात आलं आहे की नाही हे लिहिलेलं असतं. कोणत्या रसायनांचं लेपन करण्यात आलं आहे हेही स्पष्ट केलेलं असतं. यामुळे मृतदेहाला दुर्गंधी येणार नाही, कोणाला कोणताही त्रास होणार नाही आणि मृतदेहाची नेआण करता येईल असंही लिहिलेलं असतं."
funeralzone.co.uk नुसार दोन पद्धतीनं एम्बामिंग केलं जातं. आर्टेरियल आणि कॅव्हिटी या दोन नावांनी या प्रक्रिया ओळखल्या जातात. आर्टेरियल प्रक्रियेत शरीरात रक्ताऐवजी एम्बामिंग द्रव्य भरलं जातं. कॅव्हिटी एम्बामिंगनुसार पोट आणि छातीचा भाग रिकामा करून त्यात द्रव्य भरलं जातं.
मृतदेहाला मसाज का केला जातो?
एम्बामिंग प्रक्रियेआधी मृतदेहाला जंतुनाशक रसायन (डिसइनफेक्टेड सोल्युशन) लावलं जातं. मृतदेहाला मसाजही केला जातो. कारण मरणानंतर पेशी आणि स्नायू कडक होतात. या व्यतिरिक्त मृतदेहाचे डोळे आणि तोंड बंद केले जातात.
आर्टेरियल प्रक्रियेत धमन्यांद्वारे शरीरातलं रक्त काढून टाकण्यात येतं आणि त्याजागी एम्बामिंग द्रव्य भरलं जातं. या द्रव्यात फॉर्मललडिहाइड, ग्लुटरल्डेहाइड, मेथेनॉल, इथेनॉल, फेनोल आणि पाणी यांचा समावेश असतो.
कॅव्हिटी प्रक्रियेत पोट आणि छातीला छेद देऊन शरीरातील द्रव्यं काढून टाकून त्याजागी एम्बामिंग सोल्युशन भरलं जातं आणि छेद शिवला जातो.
एम्बामिंग नंतर काय?
एम्बामिंग प्रक्रियेनंतर मृतदेहाला कॉस्मेटिक पद्धतीनं तयार केलं जातं जेणेकरून लोकांना अंतिम दर्शन घेता येईल. मृतदेहाला आंघोळ घालण्यात येतं, कपडे परिधान करण्यात येतात, केस ठीकठाक केले जातात आणि काहीवेळेला मेकअपही करण्यात येतो.
एम्बामिंग प्रक्रियेआधी मृतदेहाचे डोळे बंद करण्यात येतात. काहीवेळेला स्कीन ग्ल्यू लावण्यात येतं किंवा प्लॅस्टिकच्या आयकॅप लावण्यात येतं. यामुळे डोळ्याबाहेरचा भाग नीट आणि सुरक्षित राहतो.
एम्बामिंग प्रक्रियेआधी मृतदेहाचं तोंडही बंद केलं जातं. खालचा जबडा नीट ठेवला जातो. त्याची शिलाईही करण्यात येते.
टॅक्सीडर्मी आणि एम्बामिंग या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. एम्बामिंग प्रक्रियेत मृतदेहाला सुरक्षित ठेवण्यात येतं. टॅक्सीडर्मी व्यवस्थेत एखाद्या प्राण्याचा मृतदेह रिकामा करण्यात येतो. त्यात पेंढ्यासारखे पदार्थ भरून त्याला पूर्वीसारखं रुप देण्याचा प्रयत्न केला जातो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)