श्रीदेवी यांचा अखेरचा प्रवास, वाचा संपूर्ण घटनाक्रम

एका विवाहसमारंभासाठी दुबईला गेलेल्या श्रीदेवी यांचं शनिवारी उत्तररात्री निधन झालं. रविवारी सकाळी ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. पहिल्या बातमीच्या क्षणापासून आतापर्यंत काय काय घडलं? घेऊया एक आढावा.

शनिवार, 24 फेब्रुवारी

श्रीदेवी या कुटुंबासह दुबईला आपल्या भाच्याच्या विवाहसमारंभास उपस्थित होत्या. काही कामानिमित्त बोनी कपूर हे भारतात परतले. शनिवारी सांयकाळी ते पुन्हा दुबईला रवाना झाले.

जुमैरा अमीरात हॉटेलमध्ये त्यांनी श्रीदेवी यांच्याबरोबर गप्पा मारल्या. जेवायला बाहेर जायचं असल्यानं श्रीदेवी या तयार व्हायला गेल्या. काही वेळानं बाथरूममध्ये त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या.

शनिवार-रविवार

शनिवारी उत्तररात्री दुबईच्या जुमैरा अमीरात हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय माध्यमांद्वारे चाहत्यांना मिळाली.

दुबईच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास त्यांचं निधन झालं. त्यावेळी भारतात रात्रीचा एक वाजला होता आणि दोनच्या सुमारास हे वृत्त सर्वांना कळण्यास सुरुवात झाली.

फिल्मफेअरसह इतर काही अधिकृत ट्विटर हॅंडलवरून त्यांच्या मृत्यूची बातमी लोकांना कळली.

पण ही बातमी बाहेर येण्याच्या काही तासांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी हे ट्वीट केलं होतं.

रविवार, 25 फेब्रुवारी

रविवारी सकाळी भारतासह जगभरात ही बातमी पोहोचली होती. सुरुवातीला हार्टअटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होते. त्यानंतर कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

रविवारी दुबईतील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी यांच्या मृतदेहावर संलेपन करून तो मुंबईत आणला जाईल, असा अंदाज होता.

विवाह समारंभानंतर मुंबईला परतलेले कुटुंबीय तातडीने दुबईकडे रवाना झाले.

श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास नव्हता, असं संजय कपूर यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितलं.

रविवारी सकाळी पोलिसांनी बोनी कपूर यांना बुर दुबई पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं. जबाब नोंदवल्यानंतर त्यांना हॉटेलला जाण्याची परवानगी देण्यात आली.

हॉटेल कर्मचाऱ्याचे जबाब नोंदवण्यात आले. CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आलं.

रविवारी सांयकाळी दुबई पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमकडून शवविच्छेदन करण्यात आलं. पण शवविच्छेदनाचा पूर्ण अहवाल मिळेपर्यंत श्रीदेवी यांचं पार्थिव कुटुंबाकडे सोपवता येणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

श्रीदेवी यांचं पार्थिव आणण्यासाठी मुंबईहून एक चार्टर्ड प्लेन दुबईला रवाना झालं.

सोमवार, 26 फेब्रुवारी

श्रीदेवी यांचं पार्थिव सकाळी मुंबईत आणण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. मुंबईतच्या लोखंडवाला भागातल्या 'ग्रीन एकर्स' या त्यांच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी सोमवार सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली होती.

संवेदना व्यक्त करण्यासाठी बॉलिवुडमधील सेलिब्रिटींनीही त्यांच्या कुटुंबीयांकडे गर्दी केली.

याआधी दुबई पोलिसांनी श्रीदेवींच्या मृत्यूमागच्या कारणाबाबत माहिती दिली नव्हती. मग सोमवारी दुपारी दुबई पोलिसांनी श्रीदेवींच्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून झाल्याचं स्पष्ट केलं.

संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, असं ट्विटद्वारे नमूद केलं. याआधी मृत्यूचं कारण हृदयक्रिया बंद पडल्याचं सांगितलं जात होतं.

श्रीदेवी यांचं मृत्यू प्रकरण दुबई पोलिसांनी दुबईच्या पब्लिक प्रॉसिक्यूटरकडे वर्ग केलं. अशा प्रकरणांच्या कायदेशीर पडताळणीची प्रक्रिया ते पाहतात. या प्रकरणीही हीच प्रक्रिया केली जात असल्याने त्यांचं पार्थिव आणण्यास उशीर झाला.

मंगळवार 27 फेब्रुवारी

त्यांचा सावत्र मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूर हा मंगळवारी सकाळी दुबईत दाखल झाला.

अखेर मंगळवारी दुपारी दुबईच्या पब्लिक प्रॉसिक्यूशन यांनी श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठीचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याचं सांगितलं. आणि अखेर तपास पूर्ण करून केस बंद करण्यात आल्याचंही सांगितलं.

मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 च्या सुमारास दुबईतून चार्टर्ड विमानानं हे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं. मृत्यूच्या जवळपास 73 तासांनंतर श्रीदेवी यांचं पार्थिव मुंबईतील ग्रीन एकर्स या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालं.

बुधवार 28 जानेवारी

बुधवारी सकाळी अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. बॉलिवुडच्या अनेक सेलिब्रिटींनी इथे हजेरी लावून श्रद्धांजली वाहिली.

दुपारी 1 ते 1.30च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून 3 ते 4 दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार विले पार्ले सेवा समाज स्मशानभूमीत करण्यात येतील.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)