You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरातमधल्या मराठी माणसाचं राज ठाकरेंना खुलं पत्र
- Author, प्रशांत दयाळ
- Role, बीबीसीसाठी
शनिवारी ठाण्यात झालेल्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या गुजराती भाषिकांवर टीका केली. "गुजरात्यांना अचानक मांसाचा वास कसा येऊ लागला आहे?" असा प्रश्न विचारत त्यांनी शुद्ध शाकाहारी हाउसिंग सोसायट्यांवर प्रहार केला. तसंच, गुजरात्यांसाठीच्या बुलेट ट्रेनचा बोझा आमच्यावर पडला आहे, असा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरेंना जन्मानं मराठी असलेल्या, पण गुजरातमध्ये स्थायिक असलेल्या प्रशांत दयाळ यांचं हे खुलं पत्र.
प्रिय राज ठाकरे,
तुम्ही मला आवडता, कारण तुमच्यात लढाऊ बाणा आहे. तुमचा राग व्यवस्थेविरोधात आहे. पण तो तुम्ही चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीनं व्यक्त करत आहात.
एक मराठी माणूस जर लढत असेल, तर ते मला आवडणारच. कारण मीसुद्धा जन्मानं मराठी आहे. पण मी गुजरातमध्ये राहतो. त्यामुळं मी जरी जन्मानं मराठी असलो तरी कर्मानं गुजराती आहे.
मराठी भाषिक असलो तरी आम्ही आठ पिढ्यांपासून गुजरातमध्ये राहतो. माझ्या पूवर्जांचं शिक्षण गुजराती भाषेतच झालं. मीपण गुजरातीतच शिक्षण पूर्ण केलं. मला मराठी आणि गुजराती या माझ्या दोन्ही भाषांचा गर्व आहे.
आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया.
1960 पर्यंत तुम्ही आणि मी एकाच राज्यात राहत होतो. तुमच्या पूर्वजांनी महाराष्ट्रात राहणं पसंत केलं, तर माझ्या पूर्वजांनी गुजरातमध्ये.
यामुळेच तुम्ही आणि मी एक असूनही भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या राज्यांचे निवासी झालो.
माझा जन्म गुजरातमध्ये झाला. इथंच मी लहानाचा मोठा झालो. यामुळंच मला माहीत आहे की गुजरातमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या नसानसात व्यापार आहे. गुजराती व्यक्ती श्रीनगरमध्ये जाऊन बर्फही विकू शकतो.
आपलाही स्वतःचा व्यवसाय असावा, असा विचार माझ्याही मनात आला. पण मी त्यात कधी यशस्वी ठरू शकलो नाही. कदाचित माझ्या DNAमध्येच व्यापार नसावा.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामागे असलेल्या गुजराती व्यक्तींच्या सहभागाला कुणीही नाकारू शकत नाही. तुमच्याआधी बाळासाहेब ठाकरे गुजरात्यांवर नाराज होते. आणि आता तुम्ही आहात.
तुम्हाला असं वाटतं का, की गुजराती लोकांमुळे मराठी लोकांचा व्यवसाय नाही चालत?
पण मला माहीत आहे, तुम्ही देवावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहात. देवानं सगळ्यांसाठी नियती ठरवून दिली आहे. त्यानुसारच काम होत असतं.
जेव्हा आपण पाकिस्तानविरोधात लढत असतो, तेव्हा सर्वजण भारतीय असतो. पण जेव्हा भारताची गोष्ट येते, तेव्हा "मी मराठी" आणि "तू गुजराती" असं होतं. हे योग्य आहे का?
मुंबईत गुजराती व्यापार करतात, याचा तुम्हाला राग आहे. मला सांगा, मुंबईत राहणाऱ्या गुजराती भाषिकांनी एक महिन्यासाठी कुठलाही व्यापार, व्यवसाय न करण्याचं ठरवलं तर काय होईल?मग बघूया देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई कधीपर्यंत टिकू शकेल.
देशातल्या राजकीय नेत्यांनी आपली समज आणि काळाच्या मागणीप्रमाणे गुजरात आणि महाराष्ट्राला वेगळं केलं. असं असलं तरी मला वाटतं की आपण एकाच आईची मुलं आहोत.
एकाच भूमीवर तुम्ही आणि मी मोठे झालो आहोत. तुम्ही आणि तुमच्यासारखे विचार करणारे लोक गुजराती आणि मराठी माणसाला कधीही वेगळं करू शकणार नाहीत.
जर गुजरात्यांनी मुंबई सोडली तर माझ्यासारखे मराठी भाषिक जे गुजरातमध्ये राहतात, त्यांना मुंबईत सामावून घ्यावं लागेल. आम्ही मुंबईत येऊ, पण आम्हाला तर व्यापार येत नाही.
मग कसं होणार?
मी मराठी असूनही माझ्या जीवनात मी एकदाच मुंबईला आलो आहे.
मी मुंबईला यावं, अशी माझी अनेकदा इच्छा झाली. पण मी येणं टाळलं. कारण जिथे तुमच्यासारखे लोक द्वेषाची भाषा बोलतात, अशा मुंबईत समुद्र आहे, समृद्धी आहे, पण शांतता नाही.
मन अस्वस्थ असेल तर अशा ठिकाणी कुणीही सुसंस्कृत व्यक्ती कशी राहू शकेल?
मराठी असूनही मी गुजराती पत्रकार आहे. जेव्हाही माझे वाचक, माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्या मित्रांना हे कळतं की माझी मातृभाषा मराठी आहे, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटतं. त्यांचा पहिला प्रश्नच हा असतो की, महाराष्ट्रात माझं गाव कोणतं आहे?
मी सांगतो की माझं गाव अमरेली आहे. अमरेली गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातला एक जिल्हा आहे.
मी आता 51 वर्षांचा आहे. पण या आयुष्यात मला भेटलेल्या 51 व्यक्तींनीही कधी मला माझी जात विचारली नाही. माझं नाव ऐकून अनेक गुजराती व्यक्ती मला विचारतात की अमरेलीमध्ये मराठी कसे आणि कुठून आले?
गुजरातमध्ये बहुतांश लोकांना माहीत नाही की, गुजरातच्या नवसारीपासून बडोदे, अमरेली आणि मेहसाणामध्ये गायकवाड घराण्याचं राज्य होतं. ज्यामुळं आजही या भागात मोठ्या प्रमाणात मराठमोळी माणसं राहतात.
माझं बालपण अमरेलीत गेलं आणि आता मी अहमदाबादमध्ये पत्रकार आहे. पण मराठी भाषिक असल्यामुळे कधीच कुठल्या गुजराती व्यक्तीनं मला त्रास दिल्याचं मला आठवत नाही.
मी गुजराती पत्रकार आहे. एका सामान्य गुजराती व्यक्तीपेक्षा चांगली गुजराती मी बोलू आणि लिहू शकतो. त्यामागचं कारण हे की, जशी मराठी भाषा मला माझी वाटली, त्यापेक्षा थोडीशी जास्त गुजराती मला माझ्या जवळची वाटते.
त्यामुळे जर कुणी मला विचारलं की तुम्ही गुजराती आहात की मराठी, तर मी एक सेकंदही विचार न करता सांगतो की, मी गुजरात्यांपेक्षाही जास्त गुजराती आहे. मराठी आणि गुजराती हे मला दोन डोळ्यांसारखे आहेत.
तुम्ही राजकीय नेते आहात आणि मी एक सामान्य गुजराती पत्रकार. मी मराठी आहे. माझ्यासारखेच हजारो मराठी लोक गुजरातमध्ये राहतात.
पण माझी मातृभाषा गुजराती नाही म्हणून मला किंवा माझ्यासारख्या हजारो मराठींना कधीच कोणत्या गुजराती व्यक्तीने अपमानित केलं नाही.
कधीही 'तुम्ही महाराष्ट्रात चालते व्हा' असं सांगितलं नाही. जर असं गुजरातमध्ये झालं असतं, तर गुजरातला कधीही काकासाहेब कालेलकर यांच्यासारखे जन्मानं मराठी आणि गुजरातीचे श्रेष्ठ साहित्यकार मिळाले नसते.
देशाच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश माळवणकर हेसुद्धा अहमदाबादेतील भद्रमध्ये राहत होते. पण त्यांना कधीही कुठल्या गुजराती माणसाने परप्रांतीय म्हणून टोमणा नाही मारला. गणेश माळवणकर यांचे पुत्र पुरुषोत्तम गणेश माळवणकर हेही गुजरातमधून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते.
गुजराती जेव्हा कोणावर प्रेम करतात, तेव्हा त्यांचा धर्म आणि प्रदेश विचारून प्रेम नाही करत.
मी जे सांगायचा प्रयत्न करतोय, त्यावर एकदा तरी विचार करावा. तुम्ही स्वतःला बदलू शकत असाल तर जरूर प्रयत्न करा.
तुमच्या मागेही लोकांनी तुमच्यावर प्रेम करावं, असं काही तरी केलं पाहिजे, अशी माझी प्रार्थना आहे.
- प्रशांत दयाळ
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)