You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी एक रखमाबाई राऊत
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
दररोज एका नवीन डूडलच्या माध्यमातून लोकांचा सन्मान करणाऱ्या गुगलनं 1 जुलै 2018च्या बुधवारी मराठी मनाला एक सुखद धक्का दिला. ते होतं डॉक्टर्स डेचं डूडल रखमाबाई (सावे) राऊत यांच्या सन्मानार्थ. कोण होत्या रखमाबाई? आणि त्यांच कार्य काय होते ते जाणून घेऊ या.
गुगलनं रखमाबाईंवर डूडल बनवलं आणि अनेकांनी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टरांपैकी त्या एक होत्या.
1864 साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाईंचं लग्न त्यांच्या विधवा आईनं लावून दिलं. मात्र सासरी न जाता त्या आईसोबतच राहिल्या.
इतिहासाचे अभ्यासक चिन्मय दामले सांगतात, "त्याकाळी त्यांनी नवऱ्याकडे जायला नाही म्हणणं ही खूप मोठी गोष्ट होती."
त्यानंतर रखमाबाईंच्या आईंनी पुन्हा लग्न केलं. सावत्र वडिलांचा रखमाबाईंवर खूप प्रभाव होता.
"त्यांचे सावत्र वडील सखाराम अर्जुन हे शल्यविषारद होते. त्यामुळेच त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली असावी."
"तसं पाहिलं तर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. पण त्यांचं लवकरच निधन झालं. म्हणून रखमाबाई या मेडिकल प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर लंडन स्कूल ऑफ मेडिसीनमध्ये त्या अभ्यास करण्यासाठी गेल्या."
बालविवाहाविरुद्ध लढा
रखमाबाईंचे पती दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपल्या बालपणी झालेला विवाह रखमाबाईंना मान्य नव्हता आणि त्याविरुद्ध त्यांनी कोर्टात लढाही दिला.
जस्टिस रॉबर्ट हिल पिंगहे या न्यायाधीशांनी रखमाबाईंच्या बाजूनं निकाल दिला. समाजसुधारणेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असलं तर तत्कालीन महाराष्ट्रात या निकालावर बरीच टीका झाली.
गंमत म्हणजे या निकालाला आणि त्या अनुषगांने येणाऱ्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कडाडून विरोध करणाऱ्यांमधलं एक प्रमुख नाव होत बाळ गंगाधर टिळक.
"त्यावेळी खरंतर आगरकर केसरी मध्ये होते. बालविवाह प्रतिबंधक कायद्याला टिळकांचा विरोध होता हेच आगरकरांनी केसरी सोडण्याचं एक मुख्य कारण होतं."
"संमतीवयाचा कायदा आणि टिळक-आगरकर यांचा समाजसुधारणेवरचा वाद हा रखमाबाईंना अभ्यासल्याशिवाय समजून घेताच येत नाही. मुळात तुम्ही रखमाबाईंशिवाय पुढे जाऊच शकत नाही," चिन्मय ठामपणे सांगतात.
"त्यांनी 'द हिंदू लेडी' या टोपणनावानं टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेखही लिहीले होते. पण, रखमाबाईंनी याबाबत कधीही जाहीर वाच्यता केली नाही."
एमडी करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. "इंग्लंडच्या कॉलेजनं त्यांना एमडी करण्याची परवानगी दिली नाही. कारण त्याकाळी इंग्लंडमध्येही स्त्रियांना एमडी करण्याची परवानगी नव्हती. त्याकरिता त्यांनी तिथंही लढा दिला. शेवटी त्यांनी ब्रसेल्सला जाऊन पोस्ट ग्रॅज्युअशन पूर्ण केलं," ते सांगतात.
तरीही उपेक्षा?
असं असतानाही इतिहासानं रखमाबाईंची उपेक्षा का केली? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशा महाराष्ट्रातल्या थोर स्त्रियांच्या यादीत रखमाबाईंचं नाव का येत नाही?
चिन्मय यांच्या मते, याचं ठोस उत्तर देता येणार नाही. "तसं पाहिलं तर स्वातंत्र्यलढा सुरू होता तेव्हा दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात सामाजिक सुधारणांचंही वारं वाहात होतं."
"दोन्ही चळवळींमध्ये मोठी मोठी माणसं जोमानं काम करत होती. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत लढणाऱ्यांचा इतिहासात प्रामुख्यानं उल्लेख झाला आणि समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं."
रखमाबाई बहुजन समाजाच्या होत्या म्हणून त्यांच्या कार्याकडे तत्कालीन इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं का?
"तसं काही नसावं. एकदंरच समाजसुधारकांकडे दुर्लक्ष झालं. रानडे आणि आगरकरांचंही तसंच झालं," ते पुढे सांगतात.
अभिनेते आणि दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंवर चित्रपट बनवला आहे. महादेवन सांगतात, "मुळात आपल्याकडे पुरुषांनाच हिरो बनवायची पद्धत आहे. त्यांचाच उदोउदो करा. त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून पटकथा रचल्या जातात. त्यामुळे स्त्रियांचं काम मागे पडतं. त्यांना इतिहासात अनुल्लेखानं मारलं जातं."
"म्हणूनच मी त्यांच्या कामावर, त्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवायचं ठरवलं. रखमाबाई या पहिल्या स्त्री बंडखोर होत्या. नवऱ्याला सोडण्यासाठी कोर्टात गेलेली पहिली भारतीय बाई असेल ती. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी जो लढा दिला तो खूप प्रेरणादायी आहे," असं अनंत महादेवन म्हणाले.
पण आजही कित्येक जणांना रखमाबाईंच्या कार्याविषयी माहिती नाही हे आपलं दुर्दैव आहे, असं महादेवन यांना वाटतं.
"मी चित्रपट बनवायला सुरुवात केली, तेव्हा खूप लोकांना विचारलं की, तुम्हाला माहिती आहे भारतातल्या प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? उत्तर आलं, आनंदीबाई जोशी. तेव्हा खूप वाईट वाटलं."
"आनंदीबाईंचं कर्तृत्व मोठं आहेच, पण त्या प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. त्यांना अकाली मरण आलं. हा मान खऱ्या अर्थानं रखमाबाईंकडे जातो."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)