हाजी मस्तान : मुंबईचा 'गँगस्टर' ज्याने गुजराती नेत्यांना शिकवलं जातीचं राजकारण

    • Author, भार्गव परिख
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

सध्या गुजरातचं राजकारण लास वेगासमधील कॅसिनोसारखं झालं आहे. पटेल नावाचा फासा भाजपला त्रास देत आहे. तर, ओबीसी राजकारणाचा फासा काँग्रेसला मदत करतो आहे. तिसरा फासा शंकरसिंह वाघेला यांचा खेळ बिघडवतो आहे.

जातीचं समीकरण जुळवण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांची कसरत सुरू आहे.

आज गुजरातमध्ये जातीचं राजकारण एकदम रंगात आलं आहे. पण, गुजराती नेत्यांना हे राजकारण शिकवणारा कोणी राजकीय नेता नव्हता.

गुजरातच्या राजकारण्यांना हे शिकवलं ते कथित स्मगलर हाजी मस्तान यानं. जातीय राजकारणाचे धडे त्याच्याकडून मिळाले.

हे नेमकं घडलं कसं हे जाणून घ्यायचं असेल तर थोडं भूतकाळात डोकवावं लागेल.

गुजरातमध्ये कधीही जातीय दंगली झाल्या नव्हत्या. पहिली जातीय दंगल झाली ती स्वातंत्र्याच्या आधी, 1946मध्ये.

गुजरातची स्थापना झाल्यावर नऊ वर्षांनी, 18 सप्टेंबर 1969ला पुन्हा जातीय दंगल झाली. पण त्याचा राजकारणावर फारसा परिणाम झाला नाही.

त्या काळी अहमदाबाद शहर काँग्रेसचे अध्यक्ष जमनाशंकर पंड्या आघाडीवर होते.

या दंगलींनंतर, अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात उपोषणास बसलेल्या साधूंकडे जमनाशंकर पंड्या हे मुसलमानांची बाजू मांडायला गेले होते.

त्यावेळी सामताप्रसाद या साधूंनी त्यांना आणि काँग्रेसला शिव्यांची लाखोली वाहिली आणि तिथून हाकलून दिलं.

त्याच सुमारास झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर जातीवादाची छाप होती. पण त्याचा मतांवर फार परिणाम झाला नाही.

याच काळात सोनं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं स्मगलिंग फोफावलं होतं.

हाजी मस्तान आणि स्मगलिंग

हाजी मस्तान हा मुंबईत बसून स्मगलिंगचा माल गुजरातमधील जामसलाया इथं पाठवत असे, असं सांगितलं जातं.

शुकर नारायण बखिया आणि हाजी तालेब हे जामसलाया आणि पोरबंदर इथं त्याचं काम पाहात असत.

आणीबाणीच्या काळात हाजी मस्तानला तुरुंगात डांबण्यात आलं. दोन नंबरचा धंदा करायचा असेल तर राजकारण्यांशी हातमिळवणी करावी लागेल, हे हाजी मस्तानला या तुरुंगवासात लक्षात आलं.

चलाख हाजी मस्तानला राजकारण्यांची ताकद वेळीच कळली. गुन्हेगारी जगतावर राज्य करायचं असेल तर राजकारण्यांची सोबत फायद्याची ठरेल, हे त्यानं ताडलं.

हाजी मस्तानचा राजकारण प्रवेश

तुरुंगातून बाहेर आल्यावर हाजी मस्ताननं गुजरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचं ठरवलं.

1980च्या दशकात हाजी मस्तान गुजरातमध्ये आला. पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये बसून तो नवाब खान यांना भेटायला गेला होता.

नवाब खाननं बांधकाम व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली होती.

गुजरातमध्ये 1981मध्ये झालेल्या दंगलीत सर्वाधिक नुकसान दलित आणि मुसलमान यांचं झालं, हे हाजी मस्ताननं ताडलं.

दलित आणि मुसलमान भाई भाई

दलित आणि मुसलमान यांना आपल्या बाजूला करण्याकडे हाजी मस्तानचा भर होता.

अहमदाबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यानं दलित आणि मुस्लिम मायनॉरिटी महासंघ हा पक्ष उतरवला.

अहमदाबादच्या दरियापूर, जमालपूर आणि शाहपूर भागात दलित आणि मुसलमान यांची मोठी वस्ती आहे. तिथं रातोरात 'दलित आणि मुसलमान भाई भाई'ची पोस्टर्स लागली.

त्यामुळे मतांचं विभाजन झालं. अर्थात, दलित आणि मुस्लिम मायनॉरिटी महासंघाला एकही जागा मिळाली नाही. पण त्यांनी राजकारणाचं गणित बिघडवलं.

जाती आधारित राजकारण

जातीच्या कार्डानं मतांचं गणित बदलता येतं हे या निमित्तानं गुजराती नेत्यांच्या लक्षात आलं.

जाती आधारित राजकारणाचं गणित शिकवणाऱ्या पाठशाळेचा हाजी मस्तान हा मुख्याध्यापक ठरला.

आणीबाणीनंतर काँग्रेसची स्थिती खराब झाली होती. जनता पक्ष, जनसंघ यांना राजकारणात जातीवादाचा नवा मंत्र मिळाला.

गुजरातच्या प्रत्येक एक शहरात, गावात, पाड्यावर, जिल्हयातील राजकारणात जातीवादानं प्रवेश केला तो असा.

(या लेखातील मते लेखकाची आहेत. बीबीसीची नाहीत.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)