अल्पेश, हार्दिक आणि जिग्नेश: हे गुजराती त्रिकूट मोदींना आव्हान देऊ शकेल का?

गुजरात विधानसभा निवडणुकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. राज्यात 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार असून 18 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीत युवाशक्ती निर्णायक ठरणार असल्याची शक्यता दिसत आहे.

ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला डोकेदुखी ठरतील अशी शक्यता आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

अल्पेश ठाकोर आणि राहुल गांधी यांची संयुक्त सभाही गांधीनगरमध्ये होते आहे. जो पक्ष आपल्या तीन मागण्या मान्य करेल, त्याला पाठिंबा देणार, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. जिग्नेश मेवाणी यांचा भाजपविरोधही स्पष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर या त्रिकुटाची ओळख आणि गुजरातमधील प्रभावाविषयी चर्चा.

अल्पेश ठाकोर

ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर हे आज काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत संयुक्त सभा घेणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाची मोट बांधून ते विविध आंदोलनांचं नेतृत्व करताना दिसतात.

एकेकाळी त्यांचे वडील भाजपमध्ये होते, पण आपल्या एकता मंचाद्वारे अल्पेश यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

एकता मंचमध्ये अंदाजे 15 लाख सदस्य असल्याचा त्यांचा दावा केला जातो. राज्यातील दलित, मागासवर्गीय यांच्या हक्कांसाठी आम्ही लढतो, असं अल्पेश सांगतात.

'गुजरातमध्ये मद्य विक्रीला बंदी आहे. पण ही मद्यबंदी नावापुरतीच आहे', असं अल्पेश म्हणतात. मद्याची विक्री करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवं, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

त्याविरोधात त्यांनी वेळोवेळी आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. या आधारावर त्यांच्या जनाधाराची कल्पना आपल्याला येऊ शकते.

हार्दिक पटेल

गुजरातमध्ये पाटीदार समाज मोठ्या संख्येनं आहे. पाटीदारांना आरक्षण मिळावं अशी मागणी पाटीदारांतर्फे वेळोवेळी होत असते.

हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वाखाली या मागणीला मोठं बळ मिळालं. 2015 मध्ये पाटीदार अनामत आंदोलन समितीतर्फे आरक्षणासाठी मोठी चळवळ उभारण्यात आली होती.

या आंदोलनाचं नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केलं होतं. तेव्हापासून पाटीदार आंदोलनाचा चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

पाटीदार समाजाचं आंदोलन उभं करुन आरक्षणाची मागणी त्यांनी लावून धरली आहे. केवळ त्याच मागणीवर मर्यादित न राहता त्यांनी युवकांना नोकऱ्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा दोन मागण्याही केल्या आहेत.

"जो पक्ष आपल्या तीन मागण्या मान्य करेल त्याला आपण पाठिंबा देऊ," असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. हार्दिक पटेल यांचे दोन साथीदार रश्मी पटेल आणि वरुण पटेल यांनी भाजपची वाट धरली आहे.

त्यावर "मी जनतेसाठी काम करत राहणार. जनता माझ्या पाठीमागे उभी आहे", अशी प्रतिक्रिया हार्दिक पाटील यांनी व्यक्त केली होती.

जिग्नेश मेवाणी

जुलै 2016 मध्ये गुजरातमधील उनामध्ये सात दलितांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ जिग्नेश मेवाणी या तरुण नेत्यानं अहमदाबाद ते उना मोर्चाचं आयोजन केलं होतं.

उनाच्या या आंदोलनामध्ये हजारो दलित सहभागी झाले होते. दलितांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

जिग्नेश मेवाणी हे कायद्याचे पदवीधर आहेत. आंबेडकर आणि आंबेडकर चळवळीचा त्यांचा अभ्यास आहे.

डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या मते, जिग्नेश मेवाणी हे सध्याच्या काळातील प्रमुख आंबेडकरी विचारवंतांपैकी एक आहेत. त्यांनी द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसं म्हटलं होतं. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणाच्यावेळी देखील मेवाणी यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली होती.

दलितांवर हल्ले होण्याच्या घटनेविरोधात त्यांनी दलितांची व्यापक चळवळ उभी केली आहे. त्यांचा प्रभावही वाढत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

काँग्रेसचं निमंत्रण

शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने या तिघांनाही काँग्रेसबरोहर येण्याचं खुलं निमंत्रण दिलं होतं. त्यापैकी अल्पेश यांनी हे निमंत्रण स्वीकारलं आहे. त्यानुसार राहुल गांधी यांच्याबरोबर ते सभेतही सहभागी झाले.

"राहुल गांधी आणि आमचे विचार समान आहेत. गुजरातमधील मागासवर्गीयांचं हित लक्षात घेऊन काम करणाऱ्या सरकारची स्थापना होणं आवश्यक असल्याचं," असं अल्पेश यांनी बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी रॉक्सी गागडेकर यांच्याशी बोलताना सांगितलं.

"गुजरातचा विकास आणि इथल्या लोकांचं हित लक्षात घेऊन आम्ही या तीन युवा नेत्यांना सोबत येण्याचं निमंत्रण दिलं आहे", असं गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं.

"अल्पेश ठाकोर यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं आहे. हार्दिक आणि जिग्नेश हेदेखील भाजपविरोधात आहेत," असंही सोलंकी म्हणाले.

मोदींकडून विकासकामांचं उद्घाटन

गुजरातमध्ये निवडणुकांचं वारं वाहताना भाजपचे अनेक मोठे नेते गुजरातेत नित्यनेमानं यायला लागले आहेत. त्याच वेळी काँग्रेस सर्व भाजप विरोधकांना एकत्र घेऊन मैदानात उतरण्याच्या बेतात आहे.

या तिघांना एकत्र घेऊन बिहारच्या धर्तीवर भाजप विरोधकांची एक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याचं दिसत आहे.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आपला बालेकिल्ला राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी हे नुकतेच गुजरात दौऱ्यावर येऊन गेले. काल त्यांनी वडोदरा जिल्ह्यात अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं.

गेल्या दोन दशकांपासून भारतीय जनता पक्षाची गुजरातमध्ये सत्ता आहे, पण सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये गतीने होणारे बदल पाहता गुजरातमध्ये निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे.

(संकलन :तुषार कुलकर्णी)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)