पाहा व्हीडिओ : लातूरचे मोदी म्हणतात - माझ्या सोयाबीनला चांगला भाव द्या!

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची वाट गावागावातले शेतकरी पाहताहेत. सरकार कर्जमाफीची प्रक्रिया सुरळीत चालू असल्याचा आणि निकषांमध्ये बसत असलेला कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही, असा दावा करत असलं, तरीही प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. कर्जाखाली दबलेले कित्येक शेतकरी अर्जाची शर्यत पार करूनही अद्याप कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

लातूर जिल्ह्यातल्या भिसे वाघोलीचे गुरलिंग मोदी चिंतेत आहेत की त्यांना कर्जमाफी मिळाली आहे किंवा नाही. इतर सगळ्या शेतकऱ्यांसारखा त्यांनीही फॉर्म भरला, पण त्यानंतर हातात अद्याप काहीही आलं नाही.

"सोसायटीचं पीककर्ज काढलं त्याला तीन-चार वर्ष झाली. ८० हजार कर्ज काढलं, तर त्याच्यात सरकारनं ३८ हजाराची कर्जमाफी दिली - असं म्हणतात. पोहोचली नाही, नुसती म्हणतात माफी. कोपराला नुसता गूळ लावलाय मुख्यमंत्र्यानं, काय चाटू पण देईना आणि माफी पण करेना," गुरलिंग मोदी डोळ्यांत पाणी आणून सांगतात.

पाच एकराला दोन गुंठे कमी असलेल्या शेतात मोदींनी सोयाबीन लावलं होतं. "जमीन पेरली, सोयाबीन काढलं, तेव्हा तीन हजार क्विंटल रुपये भाव होता. आता २५०० आणि २६०० ने ओतून घेताहेत. कसं काय कर्ज फिटायचं?" मोदींचा सवाल आहे.

आणि तो केवळ त्यांचाच नव्हे तर मराठवाडा-विदर्भातल्या कोरडवाहू जमिनीवर सोयाबिन घेणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा आहे. सरकार तीन हजारापेक्षा अधिक हमीभावाविषयी आश्वस्त करतं, पण बाजारात भाव पडतात.

यंदा तेच झाल्यानं आणि नवं सोयाबीनही बाजारात आल्यानं भाव कोसळले आणि शेतकरी पेरणी, कापणीचाही खर्च निघेना म्हणून हतबल झाला. याच परिस्थितीत कर्जमाफी जाहीर तर झाली आहे, पण मिळत तर नाही त्यामुळे हतबलता अधिक वाढते आहे.

मराठवाडा-विदर्भाच्या या कोरडवाहू पट्ट्यात गेल्या वर्षी शेतकरी तुरीवर अवलंबून होते, पण तेव्हाही भाव गडगडले आणि शेतकरी कोसळले. "दहा हजार तुरीला भाव होता, तो पाच हजारांवर टेकला. कसं काय कर्ज फिटावं?" गेल्या वर्षी तूर घेणारे गुरलिंग मोदी विचारतात. तुरीपेक्षा सोयाबिन साथ देईल असं वाटलं, तर यंदा त्यानंही दगा केला.

निसर्ग आणि पडणारे भाव यांच्या लहरींमध्ये अडकलेला शेतकरी कर्जचक्रातून बाहेर येईल का हा प्रश्न आम्ही जेव्हा गुरलिंग मोदींना त्यांच्या शेतात उभं राहून विचारतो तेव्हा ते म्हणतात, "सरकारनं सरसकट कर्जमुक्ती द्यावी अशी आमची इच्छा आहे. हे कर्ज तर माफ करावंच, पण त्यानंतर जर शेतमालाला भाव दिला तर शेतकरी एवढा अडचणीत येणार नाही, आत्महत्या करणार नाही, दोन रूपये त्याच्या खिशात राहतील. पण हे कधी? भाव दिला तर," स्वत:चं कर्ज माफ होईल की नाही या चिंतेत असूनही हे मोदी एक मार्ग सुचवतात.

गुरलिंग मोदींच्या मराठवाड्यात अद्यापही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. सोयाबीनसारख्या कोरडवाहूतल्या पिकांना हमीभावापेक्षा कमी काही मिळू नये यासाठी झगडताहेत. त्याच वेळेस मराठवाड्यासह नगर पट्ट्यामध्ये ऊसदराच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)