You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅशेसची राख आणि चषक आला तरी कुठून?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
द अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. अॅशेसचा अर्थ होतो राख. या दोन संघांमधील मालिका जिंकणाऱ्या संघाला राख असलेला कलश प्रदान करण्यात येतो. या अॅशेसचं मूळ आहे तरी कशात?
क्रिकेटचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्येच रंगला होता. 1877 मध्ये या सामन्याचं आयोजन झालं होतं.
मात्र तेव्हापासून या दोन संघांमधील मालिकेला अॅशेस मालिका म्हटलं जात नव्हतं. या दोन संघांमधील नऊ सामन्यांनंतर 'अॅशेस'चा उगम झाला.
1882 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ एकमेव कसोटीसाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. प्रसिद्ध ओव्हल मैदानावर हा सामना झाला.
त्यावेळी ऑस्ट्रेलिया ही इंग्लंडची वसाहत होती. घरच्या मैदानावर इंग्लंडचं पारडं जड होतं. मात्र या कसोटीत इंग्लंडवर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर पराभवाची नामुष्की ओढवली.
गोलंदाजांना अनुकूल अशा ओव्हलच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवत ऑस्ट्रेलियाचा फक्त 63 धावांत खुर्दा उडवला.
यष्टीरक्षक जॅक ब्लॅकहमनं सर्वाधिक 17 धावा केल्या. फलंदाज म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या मात्र अल्पावधीतच गोलंदाज झालेल्या डिक बर्लो यांनी ऑस्ट्रेलियाला शंभरीही गाठू दिली नाही.
त्यांनी 31 षटकांपैकी 22 षटकं निर्धाव टाकताना केवळ 19 धावांच्या मोबदल्यात 5 बळी मिळवले. टेड पीअटेने 4 बळी घेत बर्लोला चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाला झटपट माघारी धाडल्यामुळे इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीचा फायदा उठवला आणि इंग्लंडच्या फलंदाजांचीही भंबेरी उडाली.
मात्र त्यातून सावरत त्यांनी शंभरी गाठली आणि अल्पशी आघाडी मिळवली. इंग्लंडचा डाव 101 धावांत आटोपला.
ह्यूज मॅसे यांच्या 55 धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डावात 122 धावांपर्यंत मजल मारली. बिनबाद 66 वरून ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाली.
टेड पीअटेनं दुसऱ्या डावातही 4 बळी घेतले. इंग्लंडला विजयासाठी फक्त 85 धावांची आवश्यकता होती.
खेळपट्टी परिचयाची असल्यानं इंग्लंडला हे लक्ष्य आव्हानात्मक ठरणार नाही अशी चिन्हे होती. मात्र नियतीच्या मनात काही भलतंच होतं.
85 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची स्थिती 3 बाद 51 अशी होती. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज फ्रेड स्पोफोर्थ यांच्या झंझावातासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सपशेल शरणागणी पत्करली.
सामना जिंकण्याची चिन्हे असताना ओव्हल मैदानावर जमलेले चाहते उत्साहात होते. मात्र स्पोफोर्थचा वेग आणि स्विंगच्या किमयेसमोर इंग्लंड चीतपट झालं.
घरच्या मैदानावर दादागिरी गाजवणाऱ्या इंग्लंडच्या संघाला घरच्याच मैदानावर मानहानीकारक पराभवाला सामोरे जावं लागलं.
इंग्लंडचा डाव 77 धावांत आटोपला. क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डब्ल्यू जी ग्रेस यांनी सर्वाधिक 32 धावा केल्या.
इंग्लंडच्या आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. स्पोफोर्थ यांनी 28 षटकांत 15 मेडनसह केवळ 44 धावा देत 7 विकेट्स पटकावल्या. हॅरी बॉयलनं 3 विकेट्स घेत स्पोफोर्थला चांगली साथ दिली.
चाहत्यांना हा धक्का पचवणं जड गेलं. वसाहतीतल्या खेळाडूंनी मूळ साम्राज्याला दणका दिला. इंग्लंडच्या पराभवाची खरी चिकित्सा प्रसारमाध्यमांनी केली. 'द स्पोर्टिंग टाइम्स' या वृत्तपत्रानं या पराभवाचं वर्णन 'इंग्लंड क्रिकेटची मृत्यूघंटा' असं केलं.
इंग्लंड संघाच्या सुमार कामगिरीच्या वर्णनाकरता स्वतंत्र मृत्यूलेख छापण्यात आला होता. रेगइनाल्ड शिर्ले ब्रुक्स यांनी हा लिहिला होता.
हा पराभव म्हणजे इंग्लंडमधलं क्रिकेट संपलं असून, त्याची विल्हेवाट लवकरच लावण्यात येईल आणि राख अर्थात अशेस ऑस्ट्रेलियात पाठवण्य़ात येईल असं या मजकुराचा आशय होता. ते शब्द होते-
In Affectionate Remembrance
of
ENGLISH CRICKET,
which died at the Oval
on
29 August 1882,
Deeply lamented by a large circle of sorrowing
friends and acquaintances
R.I.P.
N.B.—The body will be cremated and the
ashes taken to Australia.
काही महिन्यांतच इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जायचं होतं. तत्पूर्वी इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार आयव्हो ब्लाइगनं संघाला ही अॅशेस परत मिळवून देण्याचं संघसहकाऱ्यांना आवाहन केलं.
इंग्लंडमधल्या प्रसारमाध्यमांनी इंग्लंड संघाच्या त्या ऑस्ट्रेलियन दौऱ्याला अॅशेस परतफेड मोहीम असं नाव दिलं.
काल्पनिक अशी ही अॅशेसची कल्पना कायमस्वरुपी या दोन देशांमधल्या मालिकेचं नाव होईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
शानदार कामगिरीसह इंग्लंड संघानं तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकत घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाची परतफेड केली.
यानंतर युनायटेड ऑस्ट्रेलियन इलेव्हन आणि ऑनरेबल ब्लाइग इलेव्हन यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियन इलेव्हन संघानं हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियातील तत्कालीन वर्तमानपत्रांनी एक बातमी दिली. मेलबर्नमधल्या महिलांच्या गटानं इंग्लंडचा कर्णधार इव्हो ब्लाइग यांना परफ्युमच्या बाटलीच्या आकाराचा चषक दिला. या चषकात लाकडाच्या बेल्स जाळून तयार झालेली राख होती.
ब्लाइग यांनी हीच अॅशेस अर्थात राख परत मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं. या महिलांच्या गटात फ्लोरेन्स मोर्फी यांचा समावेश होता.
वर्षभरातच ब्लाइग आणि फ्लोरेन्स मोर्फी यांचं लग्न झालं. त्यानंतर या दोन देशांमधील मालिकेला अॅशेस हे नाव मिळालं. राख अर्थात अॅशेस हे मृत्यूशी संदर्भ जोडणारं विशेषण प्रत्यक्षात मात्र प्रेमाचं प्रतीक होतं.
1929 मध्ये ब्लाइग यांच्या निधनानंतर पत्नी फ्लोरेन्स यांनी हा चषक इंग्लंडमधल्या 'मेरलीबोन क्रिकेट क्लब'ला सुपुर्द केला.
क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये 1953 पर्यंत हा चषक ठेवण्यात आला होता. त्यानंतर पॅव्हेलियनच्या शेजारी असणाऱ्या म्युझियममध्ये हा चषक स्थलांतरित करण्यात आला.
मात्र फ्लोरेन्स यांनी दिलेला चषक आणि आताचा चषक हा सारखाच आहे का याविषयी संभ्रम आहे. राख असलेला चषक अॅशेस जिंकणाऱ्या संघाला दिला जाणारा अधिकृत चषक कधीच नव्हता.
मात्र प्रतीक म्हणून मूळ चषकाची प्रतिकृती अशेस विजेत्या संघाला देण्यात येते. 1998-99 नंतर स्फटिकासारखा दिसणारा चषक विजेत्या संघाला देण्यात येतो.
दरम्यान मालिका कोणीही जिंकलं तरी मूळ कलशरुपी चषक इंग्लंडमधल्या लॉर्ड्स स्टेडियमवर असलेल्या मेरलीबोन क्रिकेट क्लबमध्येच असतो.
1988 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या द्विशतसंवत्सरिक वर्षात आणि 2006-07 मालिकेवेळी चाहत्यांना पाहण्यासाठी मूळ चषक ऑस्ट्रेलियाला नेण्यात आला होता.
अॅशेस मालिका पाच सामन्यांची खेळवण्यात येते. दर दोन वर्षांनी या मालिकेचं आयोजन करण्यात येतं. शेवटची मालिका 2015 मध्ये इंग्लंडने जिंकली होती.
इंग्लंड संघानं पाचपैकी तीन सामने जिंकत जेतेपदावर कब्जा केला होता. क्रिकेट विश्वातील सगळ्यात प्रतिष्ठेचं द्वंद म्हणून ही मालिका ओळखली जाते.
1934 पासून महिला क्रिकेटमध्येही अॅशेस मालिका सुरू झाली. 49 कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने 12 तर इंग्लंडने 9 कसोटी सामने जिंकले आहेत. 28 सामने अनिर्णित झाले आहेत.
पुरुषांच्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 325 कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या नावावर 130 विजय, 106 पराभव आहेत. तर इंग्लंडनं 106 कसोटी जिंकल्या आहेत तर 130 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 89 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
पुरुषांच्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 69 मालिका झाल्या आहेत. योगायोग म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 32 मालिका जिंकल्या आहेत. तर 5 मालिका बरोबरीत किंवा अनिर्णित राहिल्या आहेत.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)