तो पगडी घालूच शकतो : ऑस्ट्रेलियन न्यायालयाचा शीख मुलाला दिलासा

पगडी घातली म्हणून ऑस्ट्रेलियातील एका शाळेनं भेदभाव करत प्रवेश नाकारला. शाळेच्या या निर्णयाविरोधात या शीख मुलाच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली तेव्ही लवादाने पालकांची बाजू उचलून धरली.

मेलबर्नच्या मेल्टन ख्रिश्चन स्कूलच्या गणवेश धोरणानुसार ख्रिश्चन नसलेल्या मुलांना डोकं झाकायला परवानगी नाही. त्यामुळे या शाळेनं सिधक अरोराला त्याच्या पगडीमुळे प्रवेश नाकारण्यात आला. मुलाचे वडील सागरदीप सिंग अरोरा यांच्या मते पटका (लहान मुलांची पगडी) घालू न देणं हा एक प्रकारचा भेदभावच आहे.

या प्रकरणी सागरदीप सिंग अरोरा यांनी स्थानिक ऑस्ट्रेलियन न्यायालयात दाद मागितली. तेव्हा लवादाने अरोरा यांच्या बाजूने निर्णय दिला.

केस न कापणे आणि पगडी घालणं हा शीख धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि यावरून भेदभाव करता येणार नाही, हा युक्तिवाद न्यायालयात मान्य करतण्यात आला.

मागच्या वर्षी प्रवेशासंबंधी झालेल्या बैठकीनंतर या ख्रिश्चन शाळेनं सिधक अरोरासाठी शाळेचे नियम शिथिल करण्यास नकार दिला. शाळेच्या युनिफॉर्मच्या पॉलिसीमध्ये पगडी बसत नाही, असं कारण त्या वेळी देण्यात आलं.

सागरदीप अरोरा यांनी यासंदर्भात 'बीबीसी'ला सांगितलं की, त्यांना या निर्णयानं मोठा धक्का बसला होता. ते म्हणाले, "ऑस्ट्रेलियासारख्या आधुनिक देशात हा प्रकार फारच धक्कादायक आहे."

"या देशात पगडी घातलेले सैनिक आणि पोलीस चालतात तर माझा मुलगा पगडी घालून शाळेत का जाऊ शकत नाही?" असा सवाल त्यांनी विचारला.

अनाठायी गणवेश धोरण

व्हिक्टोरियन सिविल अॅंड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलनं सागरदीप यांच्या तक्रारीवर निवाडा करताना शाळेची बाजूही विचारात घेतली. पण शाळेच्या गणवेश धोरणात बसत नाही, हे कारण त्या मुलाला जवळच्या शाळेत प्रवेश अधिकारापेक्षा मोठं नसल्याचं मान्य केलं.

सिद्धक केवळ त्याच्या पगडीमुळे त्याच्या घराजवळच्या शाळेत जाऊ शकत नव्हता. खरं तर त्याची भावंडंसुद्धा याच शाळेत शिकत होती. शाळेनं त्यांची बाजू मांडताना आपल्याला मिळालेल्या विशेष अधिकारांचा दाखला देत सांगितलं आहे की, ते त्यांच्या सोयीप्रमाणे गणवेश धोरण ठरवू शकतात. गणवेश धोरण ठरवतांना विविध गटांशी सल्लामसलतसुद्धा केली जाते, असं शाळेनं सांगितलं.

पण लवादाच्या मते, हे धोरण अनाठायी होतं. 2014 साली जेव्हा या धोरणात सुधारणा केली तेव्हा विविध धर्म समुदायांविषयी असलेल्या धोरणांचा कुठेही उल्लेख नव्हता.

लवादानं असंही म्हटलं आहे की, 'मेल्टन ही ख्रिश्चन शाळा आहे. तरी इथल्या प्रवेशांसंबंधीचं धोरण खुलं आहे. इथे शिकणारे 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी ख्रिश्चन अनुयायी नाहीत.'

व्हिक्टोरियन सिव्हिल अॅंड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलच्या सदस्या ज्युली ग्रेनगर सांगतात, ''ख्रिश्चन धर्माच्या चालीरीती पाळतांना दिसत नाही म्हणून त्यांना प्रवेश नाकारणं हे पटण्यासारखं नाही."

त्या म्हणाल्या की, शाळा व्यवस्थापन सिधकला गणवेशाच्या रंगाची पगडी घालायला सांगू शकत होते.

लवादाच्या या निर्णयानं आपल्याला आणि कुटुंबीयांना आनंद झाल्याचं सागरदीप सिंग अरोरा म्हणाले. ते म्हणाले, "ऑस्ट्रेलियातल्या शीख समुदायासाठी हा अतिशय उत्तम निर्णय आहे."

अरोरा आणि त्यांची पत्नी शाळेबरोबर लवकरच चर्चा करणार आहेत. सिधक आता लवकरच शाळेत जाऊ शकेल अशी त्यांना अपेक्षा आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)