You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुरमीत राम रहीम सिंग : वादग्रस्त बाबाची कहाणी
हरियाणातले वादग्रस्त बाबा राम रहीम सिंग यांना पत्रकार रामचंदर छत्रपती हत्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. पंचकुला इथल्या CBI कोर्टाने त्यांना दोषी ठरवले. 17 जानेवारीला शिक्षेची सुनावणी होईल.
राम रहीम यांच्यासोबत इतर तीन जणंही दोषी आढळले आहेत.
ऑगस्ट 2017मध्ये राम रहीम यांना बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यांना 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ते सध्या तुरुंगातच आहेत.
राजस्थानमध्ये जन्मलेल्या गुरमीत सिंगचं राम रहीम इन्सान नावाच्या बाबात रूपांतर कसं झालं?
राजस्थान मधील श्रीगंगानगर येथे 15 ऑगस्ट 1967 रोजी गुरमीत सिगंचा जन्म झाला. 1990 मध्ये गुरमीत सिंग उर्फ गुरमीत राम रहीम इन्सान डेरा सच्चा सौदाचा प्रमुख झाला. डेरा सच्चा सौदा हे पंजाब, हरियाणा भागातील मोठं प्रस्थ आहे. शाह मस्ताना यांनी 1948 मध्ये हा डेरा स्थापन केला. देशभरात सध्या पन्नासहून अधिक आश्रम या डेऱ्यातर्फे सांभाळले जातात. लाखो अनुयायी या डेराशी जोडले गेले आहेत.
डेराचं प्रमुख काम हे सामाजिक कार्य, रक्तदान आणि गरीबांसाठी मदत गोळा करणं असं असलं तरी गुरमीत राम रहीम सिंग डेरा प्रमुख झाल्यावर या डेराला वेगळं वलय प्राप्त झालं. कारण बाबा राम रहीमनं काही चित्रपटांतही प्रमुख भूमिका केली. गुरमीत राम रहीमच्या मुलाचं लग्न काँग्रेस सदस्य हरमिंदर सिंह जस्सी यांच्या मुलीशी झालं आहे. हरमिंदर सिंग हरियाणा विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी मात्र भारतीय जनता पक्षासोबत होते.
डेराला एवढा लोकाश्रय का?
डेरा सच्चा सौदातर्फे मोठ्या प्रमाणावर समाजकार्य केलं जातं. सिरसा येथील आश्रमातील रुग्णालयात स्वस्तात उपचार केले जातात. पण डेरा प्रमुख झाल्यापासून राम रहीमची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. 1998 मध्ये बेगू गावात एक मुलगा डेराच्या जीपखाली आला. ही घटना स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली. डेराच्या समर्थकांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. त्यानंतर डेरातर्फे माफी मागण्यात आली. राम रहीम डेराप्रमुख झाल्यानंतरचा हा पहिला विवाद होता.
2002 मध्ये आश्रमात वास्तव्यास असणाऱ्या एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तसंच पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्याधीशांना एक चिठ्ठी लिहिली. गुरमीत राम रहीम याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप यात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी टसीबीआय'कडे सोपविण्यात आली.
त्याचवर्षी स्थानिक पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती हे डेरातील अनागोंदीवर सातत्याने लिहित होते. गुरमीत राम रहीमनी छत्रपती आणि डेराचे प्रबंधक रणजीत सिंह यांचीसुद्धा हत्या केल्याचा आरोप ठेवला गेला.
2007 मध्ये सलावतपुरा येथे गुरमीत राम रहीमनी शिखांचे सर्वोच्च धमर्गुरू गुरूगोविंद सिंग यांच्या वेशभूषेत छायाचित्रे काढली. याच्याविरोधात भटिंडामध्ये राम रहीमचा पुतळा जाळण्यात आला. त्या वेळी तिथे दंगल झाली. कारण पुतळा जाळणाऱ्या शीखधर्मीयांवर डेरा प्रेमींनी हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण उत्तर भारतात हिंसेच्या घटना घडल्या होत्या. शीखधर्मीय विरुद्ध डेराप्रेमी यांच्यात ठिकठिकाणी चकमकी उडाल्या. यात एका शीख युवकाचा मृत्यू झाला.
त्यावेळी डेरा प्रमुख राम रहीमला पंजाबात जाण्यास बंदीही घालण्यात आली होती. याच वर्षी सिरसा येथील एका गावात बंदी असतानाही डेरा सच्चा सौदाने दीक्षा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमात डेरा डेरा प्रमुख म्हणून गुरमीत राम रहीम सहभागी होण्यासाठी पोहोचला मात्र दोन्ही बाजूनं दगडफेकीला सुरुवात झाल्यानं त्याला कार्यक्रम सोडून पळावं लागलं.
2007 पासून तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये डेरा सच्चा सौदाने न्यायालयीन यंत्रणेवर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 2010 मध्ये डेराचे पूर्वीचे प्रमुख राम कुमार बिश्नोई यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत माजी व्यवस्थापक फकीरचंदच्या गायब होण्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. बिश्नोईचा आरोप होता की डेरा प्रमुखाच्या आदेशानेच फकीरचंदची हत्या करण्यात आली आहे. सीबीआय या प्रकरणात पुरावे गोळा करू न शकल्याने क्लोजर रिर्पोट सादर करण्यात आले. हे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात आहे.
गुरमीत राम रहीम यांनी एक व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, अनेक युवक हे भारतासाठी पदकं आणत आहेत. विजेंदर सिंगनी देशाचं ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव मोठे केलं. विराट कोहलीनंदेखील. ते आमचेच अनुयायी आहेत. आमच्याकडे ते कसे आलेत, त्यांनी आमच्याकडून कशी दी क्षा घेतली याचे व्हिडीओ आमच्याकडे आहेत. आता ही मुलं देशाचे नाव मोठे करीत आहेत`
फतेहाबाद जिल्ह्यातील टोहाना येथील रहिवासी आणि डेराचे पूर्व साधू हंसराज चौहान यांनी जुलै 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत डेरातील 400 साधूंची बळजबरीनं नसबंदी करण्यात आल्याचा आरोप डेरा सच्चा सौदा प्रमुखांवर केला. न्यायलयासमोर 166 साधूंच्या नावासहित विवरण सादर करण्यात आलं. हे प्रकरणही सुनावणीसाठी आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)