You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'फिफा U-17 वर्ल्डकपमुळे भारतात फुटबॉल संस्कृतीला चालना'
फिफा U-17 वर्ल्डकपमुळे क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल संस्कृती रुजेल असं आजच्या तरुणाईला वाटतं आहे. काहींना मात्र आपलं क्रिकेटच बरं वाटत आहे.
फिफा U-17 वर्ल्डकप शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारत पहिल्यांदाच भूषवत आहे. इतकंच नाही, तर या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच खेळत आहे.
या स्पर्धेचं आयोजन केल्यानं आपल्या देशात फुटबॉल संस्कृती रूजायला मदत होईल का असा प्रश्न बीबीसी मराठीनं वाचकांना विचारला होता. त्यावर वाचकांनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नम्रता माळी पाटील यांच्या मते या स्पर्धेचा फायदा भारतीय खेळाडूंना नक्कीच होणार आहे.
या स्पर्धेमुळे भारतातल्या फुटबॉल संस्कृतीला लगेच चालना मिळणार नाही पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा मात्र नक्कीच निर्माण होतील, असं विजय कारवारकर यांच म्हणण आहे.
नीरज कोकाटे म्हणतात या स्पर्धेमुळे सगळ्या क्रीडाप्रेमींना फुटबॉलचा आनंद घेता येणार आहे तसंच अनेक खेळाडूंना संधी मिळणार आहे.
फुटबॉलचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तो अगदी स्थानिक पातळीवर व्हायला हवा. आपल्याकडे गुणवत्तेची कमतरता नाही, मात्र, पुरेशा पायाभूत सुविधा मिळायला हव्यात. अगदी शालेय पातळीवर स्पर्धा व्हायला हव्यात, असं सचिन चव्हाण यांनी म्हटलं आहे.
विशाल मोकळ म्हणत आहेत की फुटबॉलला चालना मिळेल की नाही माहित नाही. पण, त्यामुळे रस्ते मात्र चकाचक झाले आहेत.
आकाश बडवे म्हणत आहेत की या स्पर्धेमुळे खेडोपाडीच्या तरूणांमध्ये या खेळाविषयी जागरूकता वाढीला लागेल.
हेमंत बोरकर म्हणत आहेत की यामुळे क्रिकेटचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल.
मात्र हर्षल हेडे यांना असं काही वाटत नाही. फुटबॉलची काही गरज नाही आपलं क्रिकेटच बरं आहे असं ते पुढे म्हणतात.
सुरज मोहिते यांनाही फिफा U-17 वर्ल्डकपमुळे भारतात फुटबॉलला चालना मिळणार नाही, असं वाटत आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)