पी. व्ही. सिंधूच्या करिअरमध्ये यांचा आहे मोलाचा वाटा

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. पी. व्ही. सिंधूनं कॅनडाच्या मिशेल ली हिचा 21-15, 21-13 असा पराभव केला. सिंधू भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे.

कौटुंबिक पार्श्वभूमी

पी.व्ही.रामण्णा आणि पी.विजया या राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटूंची सिंधू ही कन्या. रामण्णा यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

1986 साली सेऊलमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकविजेत्या भारतीय संघाचा ते भाग होते. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत सिंधूच्या आईनं तिच्या कारर्कीदीकडे लक्ष देण्यासाठी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

सिंधूची बहीण पी.व्ही. दिव्या राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू आहे. डॉक्टर होण्यासाठी तिनं खेळाला सोडचिठ्ठी दिली.

प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांची अकादमी हैदराबादनजीकच्या गच्चीबाऊली परिसरात आहे. अकादमीच्या ठिकाणापासून सिंधूचं घर दीड तासाच्या अंतरावर होतं.

प्रशिक्षण, शाळा, पुन्हा प्रशिक्षण यामध्ये सिंधूची ओढाताण होत असे. खेळाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी गोपीचंद यांनी सिंधूच्या पालकांना अकादमीजवळ राहायला येण्याचा सल्ला दिला.

हा सल्ला सिंधूच्या पालकांनी मानला. सहाव्या वर्षापासून रॅकेट हाती घेतलेल्या सिंधूच्या कारकीर्दीसाठी हा निर्णय कलाटणी देणारा ठरला.

पाच फूट आणि अकरा इंच अशा उंचीचं वरदान लाभलेल्या सिंधूच्या खेळातील तंत्रकौशल्यावर गोपीचंद यांनी प्रचंड मेहनत घेतली.

कारकीर्दीत सुरुवातीला सामन्यादरम्यान मोक्याच्या क्षणी सिंधू एकाग्रता भंग पावत असे. प्रशिक्षकांच्या मदतीनं सिंधूनं या मुद्यावर लक्ष देत खेळात सुधारणा केली.

ऑलिम्पिकपूर्वी गोपीचंद यांनी सिंधूला दडपण घालवण्यासाठी कोर्टवर मोठ्या आवाजात ओरडण्याचा सल्ला दिला. दडपण येऊन खेळावरचं लक्ष विचलित होऊ नये यासाठी गोपीचंद यांनी ही युक्ती केली.

विक्रमी सिंधू

ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी सिंधू पहिली भारतीय महिला क्रीडापटू आहे. सायना नेहवालनंतर ऑलिम्पिक पदक पटकावणारी सिंधू केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

सिंधूनं मकाऊ स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. सिंधूनं 2013, 2014 आणि 2015 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं.

कोरिया सुपर सीरिज स्पर्धेचं जेतेपद पटकावणारी सिंधू पहिलीवहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत चेन्नई स्मॅशर्सने 94,000 डॉलर्सची बोली लावत सिंधूला आपल्या ताफ्यात समाविष्ट केले. मलेशियाचा ली चोंग वेई आणि सायना नेहवाल यांच्यानंतरची सर्वाधिक बोली सिंधूसाठी होती.

बक्षीसं, पुरस्कार आणि गौरव

2013 मध्ये सिंधूला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. 2015 मध्ये सिंधूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2016 मध्ये क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सिंधूची निवड झाली.

ऑलिम्पिक तसंच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा बॅडमिंटन विश्वाचा मानबिंदू असलेल्या स्पर्धांमध्ये आणि मातब्बर प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सिंधूची कामगिरी उंचावते.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला तेलंगणा सरकारने हैदराबादनजीक 1,000 चौरस यार्ड जमीन बक्षीस म्हणून दिली आहे.

आंध्र प्रदेश सरकारनं सिंधूला उपजिल्हाधिकारी अर्थात क्लास वन दर्जाची नोकरी दिली आहे.

कारकीर्दीतील सिंधूची जेतेपदं

एकूण आकडेवारी

2017 मध्ये आतापर्यंत सिंधू एकूण 33 सामने खेळली आहे. त्यात 22 सामन्यांमध्ये तिला जेतेपद मिळालं आहे तर 7 सामन्यांमध्ये तिला हार पत्करावी लागली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)