राणी पद्मावती खरंच अस्तित्वात होती की कविकल्पना होती?

    • Author, सुधा जी. टिळक
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावती चित्रपटाला उजव्या विचारसरणीच्या तसंच विशिष्ट जातींच्या संघटनांनी आक्षेप घेतला आहे. सुधा जी. टिळक यांनी हे प्रकरण नेमकं काय आहे याचा घेतलेला आढावा.

ऐतिहासिक घटना तसंच इतिहासकालीन व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याची उदाहरणं वाढत चालली आहेत.

नक्की वाद काय?

14व्या शतकातील मुस्लीम राजा अल्लाऊद्दीन खिलजी आणि हिंदू धर्मीय राजपूत समाजातील राणी पद्मावती यांची कहाणी म्हणजे पद्मावती चित्रपट.

दीपिका पदुकोण राणी पद्मावती यांच्या भूमिकेत आहे, तर रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिलजी असणार आहे.

चित्रपटात पद्मावती आणि अल्लाऊद्दीन यांच्यात प्रेमाचे उत्कट प्रसंग दाखवण्यात आल्याचं काही हिंदू गट आणि राजपूत समाजाला वाटतं. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा इन्कार केला आहे.

सोळाव्या शतकातील कवी मलीक मुहम्मद जयासी लिखित पद्मावत या कवितेतील पद्मावती राणी हे काल्पनिक पात्र आहे.

अवधी भाषेतील ही प्रसिद्ध कलाकृती आहे. मुस्लीम राजा अल्लाऊद्दीन खिलजी यांनी केलेल्या आक्रमणात राजपूत राजांनी आपला जीव गमावला. पद्मावती या दिवंगत राजपूत राजांची पत्नी. पतीचा सन्मान वाचवण्यासाठी राणी पद्मावती सती गेल्या. जयासी यांच्या काव्यात राणी पद्मावतींच्या कारकीर्दीचा गुणगौरव करण्यात आला आहे.

साधारण 700 वर्षांपूर्वी सत्ताधारी तसंच राजपूत समाजात सतीची प्रथा रुढ होती. लढाईत पती गमावलेल्या विधवा स्त्रिया सती जात असत. आक्रमण करणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांकडून अब्रू वाचावी म्हणून हे टोकाचं पाऊल त्या उचलच असत. मात्र काही वर्षांतच समाजाचा दृष्टिकोन बदलला आणि पतीवरील निष्ठा म्हणून सतीची परंपरा रूढ झाली.

सामाजिक सुधारकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर ब्रिटिश सरकारनं 1829 मध्ये सतीच्या प्रथेवर बंदी घातली.

हिंदू राणीच्या सौंदर्याची मोहिनी पडलेल्या मुस्लीम राजानं राणीच्या साम्राज्यावर अर्थात तिच्या पतीच्या राज्यावर आक्रमण केले. 1600 व्या शतकात या कलाकृतीची निर्मिती झाल्याचं इतिहासकारांनी सांगितलं. मात्र प्रत्यक्षात अशा स्वरुपाचं आक्रमण दोनशे वर्षांपूर्वी झाल्याचं इतिहासकार सांगतात.

राणी पद्मावती हे लोकसंस्कृतीत दंतकथा सदरात गणलं जाणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या उदाहरणातून सती परंपरेला बळकटी मिळाल्यानं त्यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त आहे.

पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध पाहता राणी पद्मावती राजपूत समाजाला पूजनीय आहेत. आदर्श पतीव्रतेचं प्रतीक म्हणून राजपूत समाज राणी पद्मावतींकडे पाहतो.

हिंदू संघटनांचा विरोध कशासाठी?

मुस्लीम राजा अल्लाऊद्दीन खिलजी आणि राणी पद्मावती यांच्यातील चित्रपटातील कथित प्रणयदृश्याला हिंदू संघटनांचा विरोध आहे. राजपूत कर्णी सेना या संघटनेनं या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणात अडथळा आणणाऱ्या तसंच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना श्रीमुखात भडकावणाऱ्या गटानेच मागच्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित करणार असलेल्या चित्रपटगृहांमध्ये धुडगूस घातला.

याव्यतिरिक्त रामायणातील शूर्पणखेप्रमाणे राणी पद्मावतीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणचं नाक कापू असा इशाराही या गटानं दिला आहे.

भारतीय जनता पक्षाचं सरकार असलेल्या राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा यांच्यासह अनेक राज्यांमध्ये या गटानं चित्रपटाविरोधात आंदोलनं केली. राजपूत समाजानं दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची प्रतिमा जाळली. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. म्हणूनच आवश्यक बदल झाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये अशी भूमिका राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मांडली.

संजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1.5 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस देण्यात येईल असं भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्यानं जाहीर केलं.

राजस्थानमधील पूर्वीच्या राजांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या पद्मावती यांना चित्रपटातल्या गाण्यात एका बाहुलीसारखं दाखवण्यात आलं आहे. अशा दृश्यांमुळे समाजात अनागोंदी माजू शकते असं राजे महेंद्रसिंग यांनी सांगितलं आहे.

चित्रपटात अशा स्वरुपाचं कोणतंही दृश्य किंवा गाणं नसल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी सांगितलं. अफवांमुळेच हा चित्रपट विविध वादांमध्ये अडकला आहे असंही त्यांनी सांगितलं.

मात्र काल्पनिक पात्र असलेल्या राणीच्या सन्मानाचा मक्ता हाती घेतलेल्या संस्कृतीरक्षकांनी भन्साळी यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला आहे.

दुसरीकडे दिग्दर्शक आणि अभिनेत्रीला विद्रूप करण्याच्या जाहीर धमक्या ऐकून धक्का बसल्याची प्रतिक्रिया असंख्य मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

इतिहासकार आणि संशोधकांचा पाठिंबा

चित्रपटावरील बंदीविरोधात एकत्र आलेल्या दिग्दर्शक आणि कलाकारांना इतिहासकार आणि संशोधकांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.

चित्रपटातल्या काल्पनिक पात्राला लक्ष्य करून प्रक्षोभक वक्तव्यं आणि धमक्या देणं अनाकलनीय आहे असं इतिहासकार आणि संशोधकांचं म्हणणं आहे.

पद्मावती हे काल्पनिक पात्र आहे, ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही असं अलीगढ विद्यापीठातील इतिहासकार इरफान हबीब यांनी सांगितलं.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये खिलजीला मांस खाणारा आणि लूटमार करून दहशत फैलावणारा विकृत राजा दाखवण्यात आल्याचं काही टीकाकारांचं म्हणणं आहे.

दरम्यान भन्साळींच्या चित्रपटानं सतीच्या प्रथेला उत्तेजन दिल्याचं लेखक देवदत्त पटनायक यांनी ट्वीट केलं आहे.

या प्रकरणाच्या निमित्तानं तथ्यहीन विषयाला प्रसारमाध्यमांनी मोठं केल्याचं वाईट वाटतं अशा शब्दांत क्रिश अशोक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या प्रकरणाकरता केंद्रातलं आणि विविध राज्यांमधलं भाजप सरकार कारणीभूत असल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटलं आहे.

पुढे काय होणार?

चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यांनी रविवारी जाहीर केलं. धमक्यांना भीक न घालता चाहत्यांनी चित्रपट हिट करावा असं अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना यांनी ट्वीट केलं आहे.

तुम्हा व्हीडिओ पाहिला का ?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)