नागालँडमध्ये आज पहिली आमदार निवडून येईल का?

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झालं. यंदा पाच महिलाही या निवडणुकीत आपलं नशीब आजमावात आहेत. नागालँडच्या इतिहासात ही संख्या सगळ्यांत जास्त आहे. आणि कमाल म्हणजे, नागालँडमध्ये आजपर्यंत एकही महिला आमदार झालेली नाही. नागालँडमध्ये आज पहिली आमदार निवडून येईल का?

या विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार नॅशनल पीपल्स पार्टीच्या, एक भारतीय जनता पक्षाची, एक नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक पॉप्युलर पार्टीची (NDPP) आणि एक उमेदवार अपक्ष रिंगणात आहेत.

कोण आहेत उमेदवार?

'नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक पॉप्युलर पार्टी'च्या उमेदवार अवान कोन्याक एकमेव अशा उमेदवार आहे ज्यांना राजकीय वारसा आहे. अवान यांचे वडील राज्यमंत्री होते. अवान यांनी दिल्ली विद्यापीठातून एम. ए केलं आहे.

नॅशनल पीपल्स पार्टीच्या उमेदवार के. मांगयांगपुला चॉग सरकारी नोकरीत होत्या. त्या व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्या 45 वर्षांच्या असून त्यांनी श्रीलंकेहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केला आहे. त्यांचे पती उद्योजक आहेत.

याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार आहेत वेडी यू क्रोमी, ज्या दीमापूर तीन मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. 27 वर्षीय क्रोमी यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. त्या आणि त्यांचे पती दोघंही सामाजिक कार्यात गुंतलेले आहेत.

रेखा रोज या निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरल्या आहेत. 35 वर्षीय रेखा या चिजामी मतदारसंघातून मैदानात आहे. मँगलोर विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या रेखा अविवाहित आहेत आणि स्वत:ला उद्योजक मानतात.

बीबीसीशी बोलताना रेखा म्हणाल्या, "मला राजकारणाचा अनुभव नाही. आजही नागालँडमध्ये राजकारण हे पुरुषप्रधान क्षेत्र मानलं जातं. हीच विचारसरणी मला मोडून काढायची आहे. मला 10 भाऊ बहीण आहेत. मला माझ्या कुटुंबापासून जितका पाठिंबा मिळाला तितकाच विरोध सुद्धा झाला आहे. माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, म्हणून मी घराघरात फिरून प्रचार करत आहे."

रेखा यांनी पत्रकारितेचा अभ्यास केला आहे. आपल्या निवडणूक प्रचाराबाबत बोलताना त्या म्हणतात, "माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी साडे सहा वाजता होते. पैसे जास्त नाही म्हणून मी घराघरात फिरून प्रचार करते."

आपल्या विजयासाठी रेखा किती आश्वस्त आहेत? "मी विजय किंवा पराभव दोन्हीसाठी तयार आहे," असं त्या सांगतात.

भाजपनेसुद्धा यावेळी एका महिला उमेदवाराला मैदानात उभं केलं आहे. रखिला 66 वर्षांच्या आहे आणि यापूर्वी त्यांनी तीन वेळा निवडणूक लढवली आहे. त्या नववी उत्तीर्ण असून सर्व महिला उमेदवारांमध्ये त्या सगळ्यांत कमी शिकलेल्या आहेत. त्यांना राजकारण आणि समाजकारणाची आवड आहे. त्यांचे पती शासकीय शाळेत शिक्षक आहेत.

नागालँडचा इतिहास

भारताचं 16वं राज्य म्हणून नागालँडची स्थापना 1 डिसेंबर 1963 रोजी झाली. नागालँडची एकूण लोकसंख्या 22 लाख आहे आणि विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. तिथे एकूण 16 जातीजमाती आहेत.

'नागालँड इलेक्शन वॉच'च्या संयोजक हैकानी जखालू यांच्या मते नागालँडचा बहुतांशी समाज हा पुरुषसत्ताक आहे. त्यामुळे अभ्यासात पुढे असूनसुद्धा महिला राजकारणात आघाडीवर नाहीत.

हैकानी गेल्या अनेक वर्षांपासून नागालँडचं राजकारण अगदी जवळून पाहत आहेत. त्यांच्या मते, "याआधी दोन-चार महिला नागालँडच्या राजकारणात उमेदवार होत्या. पण यावेळची निवडणूक थोडी वेगळी आहे."

हैकानी याचं कारण सांगतात, "मागच्या एक वर्षापासून नगरपालिका निवडणुकांमध्ये महिला आरक्षणाची मागणी जोरावर आहे. त्यावरून राज्यात खूप निदर्शनं झाली, हिंसाचारही झाला. काही लोकांनी आपला जीव गमावला. प्रकरण न्यायालयात गेलं. पण सध्या कोणताही निकाल लागलेला नाही."

त्या पुढे सांगतात. "मागच्या प्रकरणावरून धडा घेत एक सगळ्यांत चांगली गोष्ट इथे अशी झाली आहे की पाच महिला यावेळच्या निवडणुकीला उभ्या आहेत. हिंसात्मक निदर्शनानंतरसुद्धा त्या मागे हटल्या नाहीत, हेच या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे."

महिलांचा राजकारणाचा प्रवास

2011च्या जनगणनेनुसार नागालँडच्या 76 टक्के महिला सुशिक्षित आहेत. नागालँडमध्ये काम करणाऱ्या महिलांचं अर्थव्यवस्थेत योगदान पुरुषांपेक्षा कमी नाही, पण राज्याच्या राजकारणात त्या पिछाडीवर आहेत.

Association of Democratic Reformsच्या अहवालानुसार 2013 सालच्या निवडणुकीत 188 उमेदवारांमधून फक्त दोन महिला होत्या. 2008 मध्ये एकूण 218 उमेदवारांपैकी चार महिला उमेदवार होत्या. पण आजपर्यंत तिथे एकही महिला उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेली नाही.

यंदा 195 उमेदवारांपैकी पाच महिला आहेत. निदान या निवडणुकीत इथली स्त्री विधानसभेची पायरी चढेल का, हे तीन मार्चला विधानसभेच्या निकालानंतरच कळेल.

तुम्ही हे बघीतलं का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)