You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यूट्यूब व्हीडिओ बघून घरच्या घरी प्रसूती करणं सुरक्षित आहे का?
- Author, अपर्णा राममूर्ती
- Role, बीबीसी प्रतिनिधी
घरच्या घरी प्रसूत झाल्यामुळे तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातल्या एका महिलेचा मृत्यू ओढवला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या महिलेच्या नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने युट्यूबवरील व्हीडिओ पाहून प्रसूती केली असं म्हटलं जातं.
या प्रकरणाविषयी डॉक्टरांना काय वाटतं?
बीबीसी तामिळशी बोलताना स्त्रीरोगतज्ज्ञ कमला सेल्वराज म्हणाल्या की, हे पूर्ण प्रकरण ज्याप्रकारे हाताळलं जातंय ते फार चुकीचं आहे.
कमला सांगतात, "पेशंटला कधी रक्तस्राव होईल, किती जास्त होईल हे कोणी सांगू शकत नाही. मुळात अशा प्रकारच्या वैद्यकीय गोष्टी घरच्या घरी कोणी करतं का? रुग्णालय कोणत्याही प्रकारची गुंतागुंत हाताळायला सज्ज असतात. त्यांच्याकडे आवश्यक तेवढा रक्तसाठा असतो. पेशंटला अचानक काही झालं तर त्यावर लगेच उपचार करता येतात."
"पूर्वीच्या काळी सुईणी प्रसूती करायच्या. तुम्ही त्यांना अशिक्षित डॉक्टर म्हणू शकता. पण तेव्हा मातामृत्यू तसंच नवजात अर्भकांचा मृत्यूदरही फार जास्त होता. उगाच नाही प्रसूतीला बाईचा पुनर्जन्म म्हणायचे."
मग वैद्यकीय बिलांचे आकडे आपल्या घाबरवत आहेत का?
आजकालच्या काळात गरोदरपणाच्या काळापासून प्रसूती होईपर्यंतचा खर्च किमान 1 लाख असतो. मग वाढत्या बिलांकडे पाहून कुणी असा निर्णय घेतला तर?
"सरकारी रुग्णालयात कमी खर्चात सगळे उपचार करता येतात आणि प्रसूतीही करता येते. प्रसूती दवाखान्यातच व्हायला हवी. आणि कमी खर्च व्हावा या विचारापायी कोणाचा जीव गेला तर तुम्हाला चालेल का?" कमला विचारतात.
प्रसूती सामान्य होण्यासाठी काय करावं?
नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही उपाय डॉ. कमला सांगतात.
प्राणायाम : गरोदर महिलांनी हलका प्राणायाम करायला हरकत नाही. शुद्ध हवेत प्राणायाम केल्याचा बराच फायदा होते. शरीराची हालचाल होणंही गरजेचं आहे.
जमिनीवर खाली बसून भाजी चिरणं, जेवण करणं याचा फायदा होतो. खाली बसून वर उठल्याने मांडीच्या, कमरेच्या आणि नितंबाच्या हाडांचा आणि स्नायूंचा व्यायाम होतो. याचा प्रसूतीच्या वेळी फायदा होतो आणि बाळाचं डोकं सहजपणे बाहेर येण्यासाठी मदत होते. या हाडांचा आणि स्नायूंचा व्यायाम झाला नाही तर पुढे गुंतागुंत होऊ शकते.
सकस आहार
गरोदर स्त्रियांनी सकस आहार घेणं गरजेचं असतं. रोज एखाद्या तरी पालेभाजीचा जेवणात समावेश असावा. जेवणात फळांचाही समावेश असावा. सफरचंद, द्राक्ष आणि केळं तसंच सुकामेवा खाल्ल्याने फायदा होतो.
"या काळात कोणताही स्ट्रेस न घेणं खूप महत्त्वाचं आहे. योग केल्यानेही खूप फायदा होतो," डॉ कमला सांगतात.
"कधी सगळ्या प्रकारची काळजी घेऊनही त्रास होऊ शकतो," होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या श्यामला सांगतात.
त्या पुढे म्हणतात, "तिरुपूरमधल्या महिलेचा मृत्यू अतिरिक्त रक्तस्रावाने झाला असावा. धक्का बसल्याने किंवा फिट आल्यानेही तिचा मृत्यू झालेला असू शकतो."
डॉक्टरांच्या मते सिझेरियन कधी करावं?
बाळाचं डोकं खूप मोठं असेल आणि नैसर्गिक प्रसूतीला अडचण येत असेल तर सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जातो.
बाळाची स्थिती गर्भाशयात उलटी झाली असेल, नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेली असेल तरीही सिझेरियन करायला सांगितलं जातं.
कधी अचानक येणाऱ्या कॉम्प्लिकेशनमुळे सिझेरियन करावं लागतं.
सिझेरियनमध्ये वाढ का झाली आहे?
आपली जीवनशैली बदलली आहे. आपण वेळेवर खात नाही, झोपत नाही, आयुष्यात स्ट्रेस वाढला आहे, शरीराला व्यायाम नाही अशी सगळी कारणं सिझेरियनसाठी जबाबदार आहेत. कधी कधी कळा सहन करायच्या भीतीने महिला स्वतःहून सिझेरियनची मागणी करतात, डॉ श्यामला सांगतात.
"मूल होऊ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही योग्य," त्यापुढे सांगतात.
यूट्यूबवर असणारे प्रसूतीचे व्हीडिओ
यूट्यूबवर 'घरच्या घरी प्रसूती करा' टाईपचे अनेक व्हीडिओ आहेत. बऱ्याचशा व्हीडिओमध्ये बायका पाण्याखाली मुलांना जन्म देत आहेत असंही दाखवलं आहे. अशा वेळेस त्यांच्या सोबत मदतीला फक्त नवरा असतो. व्हीडिओमध्ये दाखवलेल्या प्रक्रियेच्या सुरक्षेविषयी साशंकता आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)