You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भीमा कोरेगाव प्रकरणी मायावतींचं मौन का?
- Author, समीरात्मज मिश्र
- Role, लखनऊ, बीबीसी हिंदीसाठी
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा देशातल्या प्रमुख दलित नेत्यांमध्ये समावेश होतो. मात्र महाराष्ट्रातल्या भीमा कोरेगावमध्ये दलितांवर झालेल्या हल्ल्यानंतर मायावती यांनी राखलेलं मौन अनेक प्रश्न उपस्थित करणारं आहे.
मायावती यांनी महाराष्ट्रातल्या या हिंसेसाठी राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारला जबाबदार धरलं आहे आणि याप्रकरणी एक वक्तव्यही केलं आहे.
मात्र एवढ्या मोठ्या घटनेवर मायावती यांनी औपचारिक मामुली वक्तव्य देणं अपेक्षित नाही, असं जाणकारांचं मत आहे.
भीमा कोरेगावप्रकरणातील हिंसाचाराचं खापर मायावती यांनी राज्यातलं भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर फोडलं.
मात्र मायावती यांची प्रतिक्रिया खूप उशिरानं आली. तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला होता. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही याप्रकरणी निषेध नोंदवत अशा घटना निंदनीय असल्याचं म्हटलं होतं.
एवढंच नव्हे तर भीमा कोरेगाव घटनेच्या एका आठवड्यानंतरही मायावती तिथं गेल्या नाहीत आणि पीडितांना राजकीय समर्थन देण्यातही त्यांनी अनुत्सुकता दाखवली.
राजकीय लाभाचा विचार
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरही मायावती तिथं उशिरानंच पोहोचल्या होत्या. त्याआधी याप्रकरणी त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरले होतं. काही दिवसांनंतर याच मुद्द्यावर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा त्यागही केला होता.
पुण्याजवळच्या भीमा कोरेगाव प्रकरणातून कोणताही राजकीय फायदा होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानं मायावती तिथं फिरकल्या नाहीत, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
या कारणासाठीच त्यांनी या मुद्द्यापासून सुरक्षित अंतर राखलं आहे. परंतु दलित नागरिकांविरुद्ध हिंसाचार झाल्यानं मायावती यांनी औपचारिक वक्तव्य केलं जाणकारांच मत आहे.
दलित राजकारणाचे जाणकार बद्री नारायण यांच्या मते, मायावती यांची दलित राजकारणाची भाषा बहुजन ते सर्वजन अशी आहे.
"भीमा कोरेगावमध्ये होणाऱ्या घटना दलित पँथर चळवळीचा नवा आविष्कार आहे. आक्रमक दलित वर्गाची ही भाषा प्रातिनिधिक आहे. आधुनिक पेशवाईला विरोध हा या विचारांचा पाया आहे," असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "हे विचार बहुजन समाज पक्षाच्या जुन्या विचारसरणीशी साधर्म्य साधणारे आहेत. मात्र आता उत्तर प्रदेशातली राजकीय समीकरणं बदलली आहेत. म्हणून मायावती आणि बसप या आक्रमक पवित्र्याशी संलग्न होऊ इच्छित नाहीत. आता हे काम गुजरातमधील नेते जिग्नेश मेवाणी यांच्यासारखे नेते करत आहेत."
मायावती यांचा आवाज कमकुवत?
"उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीनं बहुजन समाज पक्षाची वाटचाल सुरू आहे, ते पाहता येत्या काही दिवसांत भीमा कोरेगावप्रकरणी मायावती आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता नाही. आक्रमक पवित्रा घेऊन महाराष्ट्रात काही फायदा होण्याची शक्यता नाही. मात्र महाराष्ट्रात अशी भूमिका घेतल्यास उत्तर प्रदेशात फटका बसू शकतो, त्यामुळे त्या तसं करणार नाहीत," असं बद्री नारायण यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणतात, "भीमा कोरेगावच्या घटनेनंतर देशपातळीवर जिग्नेश मेवाणी यांच्यासारखं युवा नेतृत्व पुढं आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मायावती यांची राजकीय शक्ती कमकुवत होण्याची शक्यता आहे."
"याचं कारण म्हणजे मायावती जिग्नेश यांच्याप्रमाणे दलितांना आक्रमकपणे पाठिंबा देऊ शकतात. मात्र तशाच बुलुंद आवाजात मायावती 'ब्राह्मण विरोध' करू शकणार नाहीत. दुसरा मुद्दा म्हणजे अन्य नेत्यांच्या बरोबरीने मायावती जाहीरपणे व्यासपीठावर येऊ शकत नाहीत," असं त्यांनी स्पष्ट केलं.
"मायावती यांना स्वत:ला कधीही संघर्ष करावा लागलेला नाही. त्यांना गोष्टी आयत्या स्वरूपात मिळाल्या आहेत. त्यामुळे अशा मुद्द्यांवर त्या उशिराने प्रतिक्रिया देतात किंवा त्या मौन बाळगणं पसंत करतात," अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जोपर्यंत कांशीराम यांची सोबत होती
"मायावतींची कारकीर्द ऐन भरात असतानाही त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रात यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्या महाराष्ट्रात पाय रोवू इच्छित नाहीत," असं लखनऊमधले वरिष्ठ पत्रकार शरद प्रधान यांनी सांगितलं.
"मायावती आणि कांशीराम एकत्र होते तोपर्यंत आक्रमक पवित्र्यानिशी संघर्ष करण्याची त्यांची तयारी असे. मात्र काशीराम यांची साथ सुटल्यानंतर मायावती यांनी संघर्षाचा मार्ग सोडून दिला. कांशीराम यांनी मोठ्या पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवली. एकदा मुख्यमंत्री केलं. त्यानंतर दोनवेळा मुलायम सिंह यांच्या चुकीमुळे त्यांना उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली," असं ते म्हणाले
"बहुजन समाज पक्षाला आता फारच कमी वाव आहे. दलितांचे नेते म्हणून मायावती आणि त्यांच्या पक्षाला देशभरात अनेक पर्याय समोर येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशात भीम आर्मी आणि त्याचे नेते चंद्रशेखर यांच्यासह गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी या नेत्यांचं नेतृत्व उभं राहत आहे," असं ते म्हणाले.
मात्र भीमा कोरेगावप्रकरणी शांत आहोत, असं बहुजन समाज पक्षाला वाटत नाही. याप्रश्नी रस्त्यावर उतरण्याची तयारी असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाच्या एका नेत्याने केला.
मात्र भीमा कोरेगावप्रकरणी कधी आणि कुठे रस्त्यावर उतरणार, याचं उत्तर कोणीच देत नाही.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)