You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'पॉर्न साईट्स बंद करूनही बलात्कार थांबले नाहीत तर...?'
पॉर्न साईटमुळे देशात बलात्काराच्या घटना घडत असून त्यामुळे राज्यात 25 पॉर्न साईटवर बंदी घालण्यात आली आहे, असं मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे.
तसंच, देशात पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात यावी म्हणून आपण केंद्र सरकारकडे मागणी करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पण या चर्चेतून अनेक प्रश्न पडतात - खरंच पॉर्न साईट्सवरच्या बंदीमुळे देशात बलात्काराच्या घटनांना आळा घालणं शक्य होईल का? बलात्कारी मानसिकतेला पॉर्न साईट्स जबाबदार आहेत का?
आम्ही वाचकांकडून त्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अनेकांनी भुपेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे, तर काहींना वाटतं की या सगळ्याचा काही फायदा होणार नाही.
पॉर्न वेबसाईटला दोष देण्यात उपयोग नाही. ते येण्याच्या आधीपासूनच हे प्रकार घडत आहेत. ते थांबवायला आपलं सरकार कमी पडतंय, असं समीर शोभा गौतम म्हणतात.
तसंच, सरकार कोणतंही असो, लोकांची मानसिकता बदलायला हवी, असं त्यांना वाटतं.
चेतन सूर्यवंशी यांनी ही मागणी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. "बलात्कार करणारी व्यक्ती विकृतच असते. खजुराहोच्या मंदिरांमध्ये संभोगाच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्या आहेत. तेव्हा इंटरनेट होतं का? 1980 च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये बलात्काराची दृश्यं दाखवायचे, तेव्हा इंटरनेट होतं का?" असा सवाल ते उपस्थित करतात.
सचिन पाटील यांनी सिंह यांच्या मागणीला दुजोरा दिला आहे. यामुळे अशा घटनांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असं त्यांना वाटतं.
"या सरकारला बंदी शिवाय काहीही येत नाही. प्रत्येक गोष्टीचा यांच्याकडे एकाच उपाय आहे आहे. पॉर्नचा आणि बलात्काराचा काही संबंध नाही. तसं असतं तर 100% तरुण बलात्कारी असायला हवे होते. कारण जवळपास सगळ्यांनीच पॉर्न पाहिलेलं असतंच," अशी प्रतिक्रिया संजय करहले यांनी दिली आहे.
उदय इनामदार म्हणतात, "बलात्कारांच्या बाबतीत मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तिकडे पॉर्न जास्त बघितले जातं का?"
समीर पवार यांनी, "सगळ्या पॉर्न साईट्स बंद करा, पण त्यानंतरही जर बलात्कार थांबले नाही तर मग काय?" असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)