व्हायरल न्यूड सीनमुळे मराठी अभिनेत्रीला 'पॉर्नस्टार' म्हणून हिणवलं जातंय

    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका महिलेने आपल्या ब्लाऊजची बटन उघडली आणि तिची उघडी छाती दिसली. त्यानंतर तिने एका पुरुषासोबत सेक्स केला आणि तशीच त्याच्या बाजूला पहुडली. जवळपास 30 ते 40 सेकेंदाचा हा व्हीडिओ सध्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल केला जात आहे. अनेकांनी तिला 'पॉर्न स्टार्स'च्या यादीत बसवलं आहे.

यूट्यूबवर या एका बोल्ड सीन्ससोबतच आणखी काही 10 सेकेंदाच्या छोट्या क्लिप अपलोड करण्यात आल्या आहेत. जे आतापर्यंत हजारो वेळा पाहिले गेले आहेत.

एवढंच नाही तर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, हे सांगण्यासाठी तिच्या ओळखीच्या लोकांनीही हा व्हीडिओ तिला पाठवला.

हा कोणाताही पॉर्न व्हीडिओ नसून 'नेटफ्लिक्स ओरिजनल'वरील 'सेक्रेड गेम्स' या सीरिजमधला.

या सीरिजमध्ये राजश्री यांनी गँगस्टर गणेश गायतोंडेच्या (नवाजुद्दीन सिद्दीकीने ही भूमिका साकारली आहे) पत्नीची भूमिका साकारली आहे. राजश्री यांनी नवाजुद्दीनसोबत काही इंटिमेट सीन्स दिले आहेत, यात काही न्यूड सीन्सचाही समावेश आहे.

नवाजुद्दीन आणि राजश्री यांच्यातील संबंध सुरुवातीला चांगले नसतात. नवाजुद्दीनची भूमिका बायकोशी 'जबरदस्ती' करणाऱ्या नवऱ्याची दाखवण्यात आली आहे. नंतर परिस्थिती बदलते आणि दोघांत प्रेम खुलू लागतं. हा सीन खरंतर हा बदल दाखवणारा आहे.

यामध्ये एकमेकांच्या जवळ येण्याची ओढ आणि त्यासाठीचे प्रयत्न अतिशय सुंदररीत्या दाखवण्यात आले आहेत.

पण जर या सीनमधून ही गोष्टं काढून टाकलं, तर काय उरतं? उघडी छाती आणि सेक्स.

राजश्री यांच्या फोनवर सर्व संदर्भ कापलेली ही क्लिप ओळखीतल्याच व्यक्तीने पाठवली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं.

"मला वाईट वाटलं. पण मला लाज नाही वाटली. आणि मला लाज तरी का वाटावी?"

कथेची गरज लक्षात घेऊन मी ते सीन्स दिलेत, असं त्या सांगतात.

त्यांचा या भूमिकेवर आणि कथेवर विश्वास होता. आणि आपण काही चुकीचं करत नाही, यावर ही त्यांचा विश्वास होता. कारण यात बाईला एका वस्तूसारखं दाखवलेलं नाही.

बाईच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर कॅमेरा 'झूम' करून नाही दाखवलेल.

द्विअर्थी अर्थी शब्द असलेली गाणीही यात नाहीत. निव्वळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी कोणतही असभ्य चित्रिकरण यात नाही.

फक्त सरळ-सोप्या पद्धतीने नवरा-बायकोमधील प्रेमाचे प्रसंग दाखवले आहेत.

"मला महिती आहे की शरीरप्रदर्शन करताना खूप विचार केला पाहिजे. पण हे करण्यामागं माझा हेतू चांगला होता. मी काहीच चुकीचं केलेलं नाही."

पण राजश्री यांना वाईट वाटलं. फक्त यासाठीच नाही की हा व्हीडिओ पॉर्नसारखा बघितला जातोय - कारण असं काही तरी होईल, असा अंदाज त्यांना होताच. पण तो व्हीडिओ शेअर केला जातोय, याचं त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटतं.

तसं बघितलं तर व्हायरल खूप काही होत असतं. कुणी फक्त डोळा मारला तरी त्याचा व्हीडिओ व्हायरल होऊ लागला आहे.

पण हा व्हीडिओ वेगळा आहे. तीस-चाळीस सेकंदाच्या सीनचा एक व्हीडिओ आणि काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले जात आहेत.

"जर तुमच्याकडे असा कोणताही व्हीडिओ आला, तर त्या व्हीडिओचं काय करायचं याचा तुम्ही विचार करा. टेक्नॉलॉजी हे एक शस्त्र आहे. त्याचा वापर जीव घेण्यासाठीही होऊ शकतो आणि जीव वाचवण्यासाठीसुद्धा," असं त्या सांगतात.

मुद्दा हाच आहे की हा व्हीडिओ शेअर केला जात आहे.

चित्रपटात आणि टीव्हीवरच्या मालिकांत महिलांचं उघड शरीर दाखवलं जात आहे.

कधी कथेची गरज म्हणून तर कधी कथेची गरज नसताना. पण नेहमी हे मात्र नेहमी जास्त पाहिलं जातं. पॉर्नसारखं कोणत्याही संदर्भाशिवाय.

पण विरोधाभास आहे की हे पाहणाऱ्याला कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. जे पाहातात, याची मजा घेतात, तेही तिला पॉर्न स्टार म्हणायला मागे पुढे पाहात नाहीत.

'अँग्री इंडियन गॉडेसेस' आणि 'एस दुर्गा'मध्ये अभिनय केलेल्या राजश्री देशपांडे यांनी मोठ्या पडद्यावर साकारलेल्या या भूमिकांसारखंच आपल्या खऱ्या आयुष्यातही त्या शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत.

"यावर बोलणं गरजेचं आहे. तरच बदलाची अपेक्षा केली जाऊ शकते. पाच लोकांनी जरी त्यांचे विचार बदलले तरी चांगली गोष्ट असेल," असं त्या सांगतात.

त्या बोलत आहेत, मीही लिहीत आहे. तुम्ही वाचत आहात. कदाचित व्हॉट्सअपवर हा व्हीडिओ शेअर करणारे आता जरा विचारही करतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)