You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅज्युअल सेक्सबद्दल या कारणांमुळे स्त्रियांना कमी पश्चात्ताप
जर डेटदरम्यान एखाद्या तरुण महिलेनं स्वतःहून पुढाकार घेतला आणि सेक्स चांगला झाला तर स्त्रियांना कॅज्युअल सेक्सबद्दल कमी पश्चात्ताप होतो, असं 2018 सालच्या एका अभ्यासात दिसून आलं आहे. ही बातमी पुन्हा शेयर करत आहोत.
यापूर्वी झालेल्या अभ्यासांत पुरुषांशी तुलना करता सर्वसाधारण महिलांना वन-नाईट स्टँडबद्दल अधिक पश्चात्ताप होतो, असं दिसून आलं होतं.
नॉर्वेजिएन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये हा अभ्यास करण्यात आला.
यात नॉर्वेतले 547 आणि अमेरिकेतले 216 विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांचं वय 30च्या आत होतं. सहभागी विद्यार्थी भिन्न लिंगी होते.
कॅज्युअल सेक्सनंतर पश्चात्ताप होण्यासाठीचा स्त्री आणि पुरुषनिहाय महत्त्वाचा मुद्दा 'कुणी पुढाकार घेतला' हा आहे.
अभ्यासकांना असंही आढळून आलं आहे की जर जोडीदाराकडे कौशल्य असेल आणि त्या लैंगिकदृष्ट्या समाधानी असतील तर महिलांना कमी पश्चात्ताप होतो.
यापूर्वीच्या अभ्यासातून असं दिसून आलं होतं की, पुरुषांना स्त्रियांच्या तुलनेत कॅज्युअल सेक्सबद्दल कमी पश्चात्ताप होतो.
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे प्रा. डेव्हिड बस म्हणाले, "ज्या महिला सेक्सबद्दल पुढाकार घेतात, त्यांच्यात 2 महत्त्वाचे गुण दिसतात. एक म्हणजे त्यांची लैंगिक मानसिकता सुदृढ असते, शिवाय त्या त्यांच्या लैंगिक ओळखीबद्दल समाधानी असतात."
"दुसरा मुद्दा म्हणजे ज्या महिला पुढाकार घेतात त्यांना जोडीदार निवडीसाठी अधिकाधिक संधी असते. परिणाम म्हणून त्यांनी त्यांची स्वतःच्या आवडीनुसार निवड केलेली असते, त्यामुळे पश्चात्ताप होण्यासाठी कमी कारण असतं."
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे प्रा. जॉय पी. वॉयकॉफ म्हणाल्या, "महिलांनी त्यांच्या लैंगिक वर्तनाबद्दल निर्णय घेण्याची क्षमता का महत्त्वाची आहे, हेच यातून दिसून येतं."
त्या म्हणाल्या, "पश्चात्ताप ही अतिशय अप्रिय भावना असते. त्यामुळे लैंगिक कृतीमध्ये गुंतण्याच्या निर्णयावर असलेलं नियंत्रण महिलांना पश्चात्तापच्या भावनेपासून दूर ठेवते."
'चांगला सेक्स'
महिलांना पश्चात्ताप वाटण्याबाबत जोडीदाराची क्षमताही महत्त्वाची भूमिका पार पाडते, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
नॉर्वेजिएन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सहायक प्रा. मॉन्स बेन्डिक्सन म्हणाले, "जर सेक्स चांगला झाला असेल तर महिलांना कमी पश्चाताप होतो. पुरुषांसाठी हे कमी महत्त्वाचं असतं. याचं मूळ कारण जीवशास्त्रात आहे."
जीवशास्त्रीयदृष्ट्या शरीर संबंधाच्या निर्णयातील परिणामांत गर्भधारणेच्या रूपानं महिलांची गुंतवणूक राहते.
या अभ्यासावर काम करणाऱ्या केली असौ म्हणतात, "महिलाच्या दृष्टिकोनातून पुरुषांमधलं लैंगिक कौशल्य निदर्शक ठरत असावीत."
'तिरस्करणीय संबंध'
कॅज्युअल सेक्सबद्दल पश्चात्ताप वाटण्याबद्दलची दोन प्रमुख कारणं ही म्हणजे तिरस्कार आणि दुराचरण केल्याची भावना.
यात नैतिक पश्चात्ताप, अस्वच्छता आणि सेक्सचं अस्विकारहार्य वाटणं यांचा समावेश आहे.
याबाबत प्रा. बस म्हणाले, "लैंगिक तिरस्कार ही अनाकलनीय भावना आहे. जोडीदार म्हणून ज्यांचं मूल्य कमी आहे किंवा ज्यांच्याकडून लैंगिक आजार होण्याचा धोका आहे अशा संभाव्य लैंगिक जोडीदारांना वर्तमानात किंवा भविष्यात टाळण्यासाठी या भावनेचा उपयोग होतो."
या अभ्यासात अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी तुलना करता नॉर्वेतील विद्यार्थ्यांत कॅज्युअल सेक्सच प्रमाण अधिक दिसून आलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)