You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्लॉग : 'बोल ना आंटी...' म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर?
- Author, दिव्या आर्य
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अशी कोणती गोष्ट असेल ज्यासाठी तुम्ही हातातलं काम सोडून भर बाजारात याल? ते ही एखाद्या फ्लॅशमॉबमध्ये भाग घेण्यासाठी! विचार करून उत्तर द्या.
जर तो फ्लॅशमॉब एखादं गाणं गात असेल आणि त्याच्या गायकाला जाहीर पाठिंबा दर्शवत असेल तर तुम्ही तुमचं हातातलं काम सोडून बाहेर जाल का ? आणि जर ते गाणं तुमच्या शेजारी राहणाऱ्या आंटीसोबत सेक्स करण्याविषयी असेल तर... तर जाल तुम्ही बाहेर नाचायला?
जर ते गाणं स्त्रीला एक उपभोगाची वस्तू म्हणून संबोधत असेल, तिच्यासोबत बळजबरी सेक्स करण्याला प्रोत्साहन देत असेल आणि या सर्वांसाठी त्या स्त्रीलाच जबाबदार ठरवत असेल तर... तर तुम्ही जाल का ?
इथं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, फ्लॅशमॉब हा प्रकार सोशल मीडियावरील ट्रोलिंगपेक्षा खूपच वेगळा आहे. सोशल मीडियावर ट्रोल करणारी मंडळी लपून-छपून ते काम करत असतात. पण, फ्लॅशमॉबमध्ये लोकांनी प्रत्यक्षात त्या कृतीत भाग घेतलेला असतो. त्यामुळंच फ्लॅश मॉबमध्ये सहभागी होणाऱ्यांना सहजासहजी ओळखता येतं.
शिवाय, युवक आणि युवतींना एकत्र येऊन हे गाणं गायलाही काहीच खेद वाटत नव्हता. यात गायक 'बोल ना आंटी आऊं क्या, घंटी मै बजाऊं क्या' असं विचारताना दिसून येतो. तसंच या गाण्यात तो आपल्या शेजारी राहणाऱ्या आंटीविषयी सेक्स करण्यासाठी खूप आक्रमक भूमिका घेताना दिसून येतो.
यूट्यूब वरील व्हीडिओ
या गाण्यात गायक त्या स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून संबोधतो... जी छोटे कपडे घालते, आपल्या वडिलांच्या पैशांवर मजा करते आणि जिला दररोज दहा पुरूषांसोबत सेक्स करण्याची सवय आहे. डिक्शनरीनुसार या प्रकारच्या वर्तनाला 'मिसोजेनी' असं म्हणतात. याचा अर्थ महिलांविषयी तिटकारा असणं, त्यांची उपेक्षा करणं किंवा त्यांच्या विरुद्ध पूर्वग्रह बाळगणं.
हे फ्लॅश मॉबचे व्हीडिओ यूट्यूबवर हिट झालेत. सर्वच माणसं अशी असतात असं नाही. पण, तरीही 30 लाख लोकांनी हा व्हीडिओ यूट्यूब वर पाहिला आहे. (आता तो यूट्यूब वरून काढून टाकण्यात आला आहे. ) असं असलं तरी, हे गाणं आजही आपण पाहू शकतो. कारण, हजारो लोकांनी गाणं शेअर केलं आहे आणि स्वत:च्या पेजवर पोस्ट केलं आहे.
इतकंच नाही, तर फेसकुकवर यासंबंधी अनेक इव्हेंट्स बनवले गेले आहेत. ज्यात लोकांना ते जिथं कुठं असतील तिथं मग ते बाजारात असोत अथवा कॉलेजात एकत्र येऊन 'बोल ना आंटी आऊं क्या...' या गाण्यावर फ्लॅश मॉब करण्यास सांगितलं जात आहे. मी या अशा फ्लॅश मॉबचे दोन व्हीडिओ बघितले. त्यात भाग घेणारे युवक-युवती प्रचंड आक्रमक वाटतात. ते या संपूर्ण गाण्याचा आनंद लुटताना दिसून येतात. मात्र याबद्दल त्यांना काहीही खेद वाटताना दिसत नाही.
हिंसेला उत्तेजन
मॉबमधील पुरुषांच्या हाताचे इशारे बघता अथवा त्यांच्या कंबर हलविण्याचा अंदाज बघता त्यांना या गाण्याचे बोल समजत नसतील असंही म्हणता येणार नाही. मग फक्त आनंद मिळतोय म्हणून ते एक असं करत आहेत का ?
पण, यातून फक्त मजा नाही करता येत, तर महिलांविरूद्धच्या हिंसेला उत्तेजन मिळतं. ज्यात जाहीरपणे 'सेक्सिस्ट' भाषेचा वापर केला गेला आहे. विशेष म्हणजे या फ्लॅश मॉबमध्ये यात महिलाही सामील आहेत. त्याही पुरुषांइतकाच आनंद लुटताना दिसून येतात.
कोण आहेत हे युवक-युवती ?
रस्त्यावर जमलेला मॉब आणि इंटरनेटवरील फ्लॅश मॉब यात काय फरक आहे ? एका पत्रकारानं या गाण्यावर टीका केली, तर तिला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या. फोनवरून तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.
हा प्रकार एवढा हिंसक होता की, आपल्या पत्रकारावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून संबंधित वृत्तवाहिनीने मॉबसंबंधीचा व्हीडिओ रिपोर्ट वेबसाईटवरून काढून टाकला.
फ्लॅश मॉब सारखंच आणखी काय ?
बॉलीवूडच्या चित्रपटांतही यापेक्षा वेगळं काय होतं? यातील गाण्यांतही सेक्सचा इशारा करणाऱ्या शब्दांचा सर्रास वापर केला जातो. महिलेचा माग काढणाऱ्या पुरुषाला हिरो म्हणून संबोधलं जातं. अशी परिस्थिती असताना हा एक अनोळखी गायक आपल्या गाण्यात असं वर्तन करतो यात वेगळं काय? मग मीच एवढी त्रागा करते आहे का? कारण, शेकडो लोकही त्या गायकाला आणि गाण्यातून साथ देत आहेत.
माझी चिंता त्या गायकाविषयी नाही तर त्याला साथ देणाऱ्या शेकडो लोकांविषयी आहे. ज्यामुळं माझ्या मनात विचार येतो की, अभिव्यक्तीचा अधिकार आपल्याला हिंसक व्हायला कसं काय प्रेरित करू शकतो?
या वेळी संयमाची सीमा कुठे जाते? कोण आखतं ही सीमारेषा आणि ती पार केली गेली की नाही हे कोण ठरवतं ? मला त्या गायकाविषयी राग नसून त्या गर्दीचा मला राग येतोय. ही गर्दी काय बोलते हे त्या गर्दीला ऐकू येत नाही, काय लिहिलं गेलं आहे, हे गर्दी वाचायला तयार नाही आणि यामुळं काय नुकसान होऊ शकतं हे बघायलाही तयार नाही.
भारतातील हे युवक आणि युवती जे आजवर इंटरनेटचं माध्यम द्वेष पसरवण्यासाठी वापरत होते ते आता फ्लॅश मॉबच्या माध्यमातून महिलांविषयी तिरस्कार जाहीरपणे व्यक्त करत आहे आणि असलं गाणं याची प्रेरणा ठरत आहे.
आता सांगा... तुम्हाला या गर्दीचा भाग व्हायला आवडेल ? विचार करून उत्तर द्या.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)