You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019: अर्जुन खोतकरांनी माघार का घेतली?
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यातील वाद मिटला आहे. त्यांच्या वादामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. तो तणाव आता निवळला आहे.
भाजप शिवसेना युतीचा मराठवाडा विभागीय मेळावा औरंगाबादमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यापूर्वी दानवे आणि खोतकर यांच्यात दिलजमाई झाली.
फडणवीस यांनी खोतकर आणि दानवे यांच्यातील समेटाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, "भाजप शिवसेना म्हणजे फेविकॉल सारखे मजबूत आहेत. तसाच रावसाहेब आणि अर्जून खोतकरांचा 'मजबूत जोड राहील. काही कारणाने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आता त्यांच्यात दिलजमाई झाली आहे. उद्या रावसाहेबांचा वाढदिवस आहे. तो दणक्यात साजरा करण्यासाठी अर्जून खोतकरच त्यासाठी पुढाकार घेतील असा मला विश्वास आहे."
अर्जुन खोतकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, " शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो. मी कडवट शिवसैनिक आहे दगाफटका करणार नाही. मी स्वतः दानवे यांचा प्रचार करणार आहे."
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांच्याकडे मराठवाडा समन्वयकाची जबाबदारी दिली आहेत. खोतकर यांनी यापूर्वी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यातून युतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. शनिवारी खोतकर, पंकजा मुंडे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याच विषयावर चर्चा केली होती.
दानवे आणि खोतकर यांच्यात नेमका वाद काय आहे?
रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातलं वितुष्ट खूप जुनं आहे, असं सकाळचे प्रतिनिधी भास्कर बालखंडे सांगतात.
खोतकर हे सध्या जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे बंधू अनिरुद्ध खोतकर हे जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि भाजपची केंद्रात तसेच राज्यात युती आहे तेव्हा जिल्ह्यातही युती व्हावी असा आग्रह दानवेंनी धरला. त्यांच्या या मागणीकडे खोतकरांनी लक्ष दिलं नाही.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना एकत्र आणून अर्जुन खोतकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ आपल्या भावाच्या गळ्यात घातली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन आपल्या शह दिला अशी सल दानवेंच्या मनात निर्माण झाली. दानवेंचे विरोधक राष्ट्रवादीचे सतिश टोपे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बनले. तेव्हापासून खोतकर दानवे हा संघर्ष अधिक तीव्र झाला असं बालखंडे सांगतात.
खोतकरांची घोषणा
खोतकर यांनी दानवेंचे विरोधीपक्षातले विरोधक, त्यांच्या पक्षातले पण त्यांच्यावर नाराज असलेले लोक यांची मोट बांधण्यास सुरुवात केली. म्हणून गेल्या वर्षीच त्यांनी जाहीर केलं की यावेळी आपणच लोकसभा निवडणूक लढवणार.
दानवे सलग तीन वेळा खासदार बनले. त्यांचा मुलगा आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघात भाजप, एका मतदारसंघात काँग्रेस आणि दोन मतदारसंघात शिवसेना आहे. खोतकर हे जालना मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांचे भाऊ अनिरुद्ध खोतकर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.
रावसाहेब दानवे यांच्या हातात जालना जिल्ह्याची सत्ता अनेक वर्षांपासून राहिली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर मराठवाड्यातला सर्वांत शक्तिशाली भाजप नेता अशी त्यांची प्रतिमा बनली आणि ते जेव्हा प्रदेशाध्यक्ष बनले त्यानंतर त्यांची शक्ती आणखी वाढली. मराठवाड्यात भाजपविस्ताराचं काम त्यांनी जोमानं पुढे रेटल्यानंतर स्थानिक नेत्यांबरोबर असलेले संघर्ष आणखी तीव्र झाले.
अर्जुन खोतकरांनी माघार का घेतली?
शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंचा शब्द अंतिम असतो. त्यांचा शब्द आपण पडू देणार नाहीत असं म्हणत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज आपला पवित्रा बदलला. अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात अखेर मनोमीलन झाल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं.
अर्जुन खोतकर हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याचा अथवा उद्धव ठाकरे यांच्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत. असं पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी बद्रीनाथ टेकाळे यांनी सांगितलं.
शिवसेना आणि भाजपची केंद्रात आणि राज्यात युती आहे. रावसाहेब दानवे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघातून शिवसेनेच्या नेत्याने बंड केलं असतं तर त्यामुळे चुकीचा संदेश गेला असता, असं टेकाळे सांगतात.
उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोघांची दिलजमाई करण्यात आली. दानवे आणि खोतकरांचा वाद मिटवणं हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचं ठरलं होतं का असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, दानवे आणि खोतकर यांच्यातला वाद मिटवणं हे शिवसेनेसाठी आणि एकूणच युतीसाठी महत्त्वाचं होतं.
"भाजपला आपली यादी जाहीर करायची आहे. जर प्रदेशाध्यक्षाच्याच जागेवरून वाद असेल तर युतीसाठी जितकी मेहनत घेतली ती वाया गेली असती. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शिवसेनेचा नेता एखादा निर्णय घेतो तेव्हा त्याला पक्षांतर्गत विरोध होण्याचं काही कारण नसतं," प्रधान सांगतात.
खोतकर आणि दानवे एकत्र आल्याचा परिणाम
दानवे आणि खोतकर एकत्र आल्यामुळे युतीची शक्ती अनेक पटीने वाढली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दानवे यांच्याविरोधात कल्याण काळे उभे राहतील. 2009मध्ये दानवेंनी त्यांना 8 हजार मतांनी हरवलं होतं. तेव्हा काँग्रेसची स्थिती मजबूत होती तरी दानवे निवडून आले. 2014मध्ये विलास औताडे यांच्याविरोधात दानवे 2 लाख 7 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे ही निवडणूकही त्यांच्यासाठी सोपीच ठरेल, असं टेकाळे सांगतात.
"खोतकर आणि दानवे एकत्र आल्यामुळे दानवेंना फायदा होईल पण त्यांची खरंच दिलजमाई झाली का? हा प्रश्न आहेच. दानवेंनी शिवसेनेविरोधात खूप कठोर टीका केली होती हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. पण सध्या तरी दोघं एकत्र आल्याचं चित्र आहे," असं प्रधान सांगतात.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)