You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रमोद सावंत : संघाच्या मुशीतील डॉक्टर ठरले पर्रिकरांचे वारसदार
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रमोद सावतं हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. सावंत यांना सलग दुसऱ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळता येणार आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी 'प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री असतील' अशी घोषणा केली.
सरकारी डॉक्टरपासून करिअर सुरू केलेले प्रमोद सावंत सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.
कोण आहेत प्रमोद सावंत?
प्रमोद सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी झाला. त्यांनी कोल्हापूरमधून 'बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन, सर्जरी' ही पदवी संपादन केली आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून 'मास्टर ऑफ सोशल वर्क' ही पदवी मिळवली आहे.
2012 साली प्रमोद सावंत यांनी साखळी मतदारसंघातून निवडून येत गोवा विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ते पुन्हा एकदा विजयी झाले. सध्याच्या विधानसभेत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
"प्रमोद सावंत यांची प्रतिमा स्वच्छ असून त्यांना रा. स्व. संघाची पार्श्वभूमी लाभली आहे," असं मत 'गोवा 365' वाहिनीच्या संदेश प्रभुदेसाई यांनी व्यक्त केलं. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सावंत हे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षही होते. त्यामुळे पक्षाचा एक तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. RSS केडरमधील असल्यामुळं त्यांना विशेष महत्त्वही आहे."
सरकारी नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
"प्रमोद सावंत हे डॉक्टर झाल्यावर गोवा सरकारच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत होते. राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ते नेहरू युवा केंद्राशीही संबंधित होते," असं साखळी येथील ज्येष्ठ पत्रकार विशांत वझे यांनी सांगितलं.
सावंत यांची धाटणी थोडीफार पर्रिकर यांच्यासारखी असून सावंतसुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील जिल्हा पंचायतीचे सदस्य होते. त्यांची पत्नी सुलक्षणा अध्यापक असल्याचीही माहिती वझे यांनी बीबीसी मराठीला दिली.
'घटक पक्षांशी जुळवून घ्यावे लागेल'
"प्रमोद सावंत भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री म्हणून चालणार असले, ते संघाच्या विचारसरणीतील असले तरी मनोहर पर्रिकर यांच्याप्रमाणे सर्वसमावेशक भूमिका ते कशी घेतात, याकडे पाहाणे गरजेचं आहे," असं मत 'लोकमत' गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी व्यक्त केलं.
सावंत यांच्यासमोरील आव्हानांबद्दल सांगताना नायक म्हणाले, "गोव्यामध्ये 23 टक्के ख्रिश्चन समुदाय आहे तसंच ख्रिश्चनांच्या जवळ असणाऱ्या 'गोवा फॉरवर्ड पक्षा'ला ते सांभाळून घेतात का, हेसुद्धा पाहावे लागतील.
"सावंत हे उत्खनन कंपन्यांच्या जवळचे मानले जातात. जवळपास 65 हजार कोटी रुपयांची देणी खाणकंपन्यांनी सरकारला देणं बाकी आहे. ही वसुली करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे," नायक सांगतात.
'पर्रिकरांशी तुलना नको'
गोव्यातील सारस्वत उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक डॉ. रोहित फळगावकर सांगतात, "डॉ. प्रमोद सावंत अत्यंत साधे आणि शास्त्रशुद्ध विचारांचे आहेत. गोव्यातील तरुण जनतेशी चांगला संपर्क ठेवू शकतील. पर्रिकर यांच्या तुलनेत सावंत अत्यंत नवे आहेत, परंतु त्यांच्या सध्याच्या कामाचा आणि प्रगतीचा वेग पाहाता ते आणखी चांगली प्रगती करू शकतील असं दिसतं. ते अत्यंत शांत स्वभावाचे असून राजकीय सामाजिक विचारांचा ताळमेळ ठेवून निर्णय घेतील असं दिसतंय."
मनोहर पर्रिकरांसारख्या मोठ्या नेत्यानंतर मुख्यमंत्रिपदी बसण्याची संधी सावंतांकडे आली आहे, त्यामुळे सावंत यांची त्यांच्याशी तुलना साहजिकच होणार. "परंतु अशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. प्रत्येकाच्या कामाची शैली वेगळी असते," असं प्रुडंट मीडियाचे पत्रकार रोहित वाडकर यांना वाटतं.
बीबीसी मराठी बोलताना रोहित पुढे म्हणाले, "प्रमोद सावंत हे आमच्या साखळी येथील घराशेजारी राहातात. त्यांची राहाणी आणि वागणं अत्यंत साधं आहे. त्यांचे वडीलही राजकारणामध्ये होते.
"2007 साली त्यांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला. मात्र 2012 आणि 2017 साली त्यांचा विजय झाला. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा विरोधीपक्षांमध्ये अनेक दशकं राजकारणात असणारे, माजी विधानसभाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री असणारे अनेक नेते होते. मात्र त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या रीतीने सभागृह सांभाळलं आहे. त्यांच्या पत्नी सुलक्षणा भाजपाच्या गोवा महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत," वाडकर सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)