You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा: जेव्हा प्रमोद सावंतांचा 'पहाटेचा शपथविधी' झाला होता…
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गोव्याचे निकाल आले 10 मार्चला पण एरवी शांत असणाऱ्या गोव्याची राजकीय भूमी यंदा तापली होती नोव्हेंबरपासूनच. त्याचं निमित्त होतं की तृणमूल कॉंग्रेसनं इथं मारलेली धडक. नुकतंच बंगालमध्ये मोदी-शहा या जोडगोळीला एकट्यानं पराभूत करणायऱ्या ममता बॅनर्जी यांचा चेहरा हजारो होर्डिंग्सवर संपूर्ण गोवाभर झळकत होता. त्यात आक्रमकता होता.
ते होर्डिंग्स-वॉर पाहता भाजपानंही होर्डिंग्स उभारायला सुरुवात केली. त्यांना कमी पडायचं नव्हतं, राज्य वाचवायचं होतं. त्यांच्या सगळ्या पोस्टर्सवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा चेहरा होता. त्यावर सरकारच्या योजनांची यादी होती आणि फक्त सावंतांचा चेहरा. सरावलेल्या, अथवा न सरावलेल्या नजरांनाही समजण्यासारखं होतं की त्यात काय कमी होतं. ती होती आक्रमकता. जी तृणमूलच्या पोस्टर्सवर होती.
आक्रमकता हा भाजपाच्या राजकारणाचाही पिंड आहे. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, अमित शाह यांच्या फोटोंमध्ये, पोस्टर्समध्ये आक्रमकता दिसते. तेच काय, शालीन पिंडाचं राजकारण म्हणून भाजपा ज्यांना नेतृत्व देतं त्या देवेंद्र फडणवीसांचे महाराष्ट्रातले बहुतांश पोस्टर्स हेही आक्रमक भाव असलेले असतात, त्यांची भाषणंही आवेशपूर्ण असतात. आक्रमक प्रतिमांच्या या राजकारणात प्रमोद सावंतांचा चेहरा मात्र सात्विक होता. पोस्टर्सवरही आणि प्रत्यक्षातही.
पण तरीही प्रमोद सावंतच मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात भाजपासाठी गोव्याचा चेहरा होते आणि आहेत. त्याचं कारण 'साधेपणा'ची प्रतिमा गोव्याच्या राजकारणात महत्वाची आहे. ती प्रतिमा मनोहर पर्रिकरांच्या राजकारणाचाही पाया होती. त्यामुळे गोव्यात सर्वमान्यता मिळते. गोव्याच्या आणि इतर राज्यांमधला हा फरक आहे. म्हणूनच पर्रिकरांनीच निधनापूर्वी आपला उत्तराधिकारी म्हणून निवडलेल्या प्रमोद सावंतांची 'अनाक्रमक' प्रतिमा घेऊन निवडणुकीतही भाजपा पुढे गेली आणि आता निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून तोच चेहरा असणार आहे.
पण पहिल्या वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडलं जाण्यापेक्षा प्रमोद सावंतांचा यंदाचा मार्ग अधिक खडतर होता असं दिसतं आहे. 2019 मध्ये त्यांची निवड सरळ होती आणि पर्रिकरांच्या निधनानंतर वातावरणही भावनिक होतं. यावेळेस मात्र त्यांना मोठी स्पर्धा पक्षामध्ये होती.
2017 मध्ये भाजपावासी झालेल्या विश्वजीत राणेंची मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा लपलेली नाही आहे. त्यांच्या पत्नीही आता आमदार आहेत. त्यांना मानणारा आमदारांचा एक गट आहे. शिवाय बाकी जे भाजपाबाहेरुन येऊन यंदा आमदार झालेत तेही सगळे सावंतांना मानत नाहीत. प्रत्येकाची आपल्या पदरात काही पाडून घेण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं काय करावं याबद्दलही मतांतरं होती. कोणालाच आपलं महत्त्व सरकारमध्ये कमी होऊ द्यायचं नाही आहे. त्यामुळे निकाल आल्याच्या तासाभरात भाजपा पाठिंब्यानं 25 आमदारांपर्यंत पोहोचला तरीही प्रमोद सावंतांना नाव घोषित होण्यासाठी आठवडाभर थांबावं लागलं. मध्ये ते दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींनाही भेटून आले. पण तरीही लगेच घोषणा झाली नाही. अखेरीस सर्वांची समजूत घालून, गणितं जुळवून संघ आणि पक्षातून वर आलेल्या सावंतांच्या नेतृत्वालाच भाजपानं पसंती दिली.
सावंत, पर्रिकर आणि संघ
डॉ. प्रमोद सावंत हे राजकारणात मनोहर पर्रिकरांमुळेच आले आणि त्यांनीच सावंतांना ते आता जिथं आहे तिथपर्यंत आणलं. यंदाच्या निवडणुकीतला भाजपाचा विजय हा दोघांनाही, सावंतांना आणि भाजपालाही, पर्रिकरांच्या छायेतून पहिल्यांदा बाहेर आणेल. पण इतिहास वेगळा आहे कारण जवळपास तीन दशकं पर्रिकरांचं गोवा भाजपावर एकहाती वर्चस्व होतं. त्यांनी माणसं निवडली, मोठी केली. सावंत त्यापैकी एक.
वास्तविक प्रमोद सावंतांचं घर हे रा.स्व.संघाच्या विचारांचं आहे. बिचोलिम तालुक्यातलं कोठंबी हे त्यांचं गाव. त्यांचे वडील पांडुरंग हे जिल्हा पंचायत सदस्य होते. तेव्हाचा जनसंघ, भारतीय मजदूर संघ यांच्याशीही ते संबंधित होते. त्यामुळे मनोहर पर्रिकरांचंही घरी येणं-जाणं होतं. कदाचित प्रमोद सावंतांना तेव्हापासूनचं त्यांनी हेरलं होतं.
प्रमोद सावंत हे शिक्षणानं आणि व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांनी कोल्हापूरच्या महाविद्यालयातून आयुर्वेदशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर काही काळानं त्यांनी पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातूनही एक पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ते पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होण्याअगोदर वैद्यकीय प्रॅक्टिससुद्धा करत होते. ते संघाच्या आणि त्यांच्या भागातल्या इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये कार्यरत होते. ते काही काळ बिचोलिमचे संघाचे बौद्धिक प्रमुखसुद्धा होते, पण त्यांचा ओढा राजकारणाकडे होते आणि ते भाजपाकडे ओढले गेले, असं संघाचे गोव्याचे प्रभारी राहिलेल्या सुभाष वेलिंगकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
संघाशी संबंध असला तरीही प्रमोद सावंत हे 'नेहरु युवा केंद्रा'शीही संबंधित आहेत. त्यांनी इथल्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला आहे. त्यात त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. तिथून कल्पना घेऊन आपल्या भागांमध्ये त्यांनी संघटन चालवले आहे.
भाजपामध्ये त्यांना तरुण वयात जबाबदाऱ्या मिळत गेल्या. ते गोव्यात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनेक काळ होते. त्यांना युवा मोर्चाचं राष्ट्रीय अध्यक्षही केलं गेलं. पण त्यांच्या राजकीय करियरला निर्णायक वळण मिळालं 2008 मध्ये. तेव्हा साखळी मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होती आणि पक्षानं त्यांना ती लढवायला सांगितली. सावंत त्यावेळेस म्हापशातल्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय पदावर होते. पण पक्षाच्या आग्रहामुळे त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि निवडणुकीला उभे राहिले. ती पोटनिवडणूक प्रमोद सावंत हरले, पण त्यांचं राजकारणातलं करियर मात्र सुरू झालं होतं.
ज्या साखळीतून त्यांनी पहिली निवडणूक हरली, तोच त्यांनी त्यांचा मतदारसंघ म्हणून बांधला. 2012 मध्ये जेव्हा मनोहर पर्रिकरांच्या नेतृत्वात भाजपा आघाडीला बहुमत मिळालं तेव्हा प्रमोद सावंत पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर पुढची 2017 ची निवडणूक भाजपासाठी अवघड ठरली, कारण त्यांचे केवळ 13 आमदार निवडून आले. कॉंग्रेस मोठा पक्ष झाला. पण गणितं फिरली आणि भाजपानं गोवा फॉरवर्ड पार्टी, मगोपा आणि कॉंग्रेसमधला फुटीरांचा गट एकत्र घेऊन पर्रिकरांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. यावेळेस दुसऱ्यांदा आमदार झालेले प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे अध्यक्ष झाले. वयाच्या 43व्या वर्षी ते इथले सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले.
जेव्हा सावंतांचा 'पहाटेचा शपथविधी' झाला...
वास्तविक बऱ्याचदा सगळ्याच राज्यांमध्ये असं पहायला मिळतं की विधानसभा अध्यक्ष हे जवळपास राजकीय निवृत्तीच्या वेळचं पद असतं. कोणाचाही मंत्री होण्याकडे आणि राहण्याकडे कल जास्त असतो. अध्यक्षपद मिळणं हे रिटायरमेंटचा संदेश मानला जातो. पण प्रमोद सावंतांच्या बाबतीत उलटं घडलं. ते पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष बनले आणि मग मुख्यमंत्री.
त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड म्हटलं तर अपेक्षित होती आणि म्हटलं तर अवघड. पर्रिकरांचं सावंतांकडे लक्ष होतंच. ते दिल्लीहून परतून मुख्यमंत्री झाल्यावर काहीच काळात त्यांचा आजार बळावत गेला. तेव्हापासूनच भाजपा आणि संघामध्येही पुढच्या नेतृत्वाविषयी विचार सुरु झाला असणार. याच दरम्यान त्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांचीही भेट घेतली होती.
पर्रिकरांचीही निवड तेच होते. 2018 चं 15 ऑगस्टचं भाषण प्रकृती खालावल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून करता येणं मनोहर पर्रिकरांना कठीण होतं. तेव्हा त्यांनी ते भाषण बाकी कोणाला न सांगता प्रमोद सावंतांना वाचायला सांगितलं जातं. आपल्यानंतर कोण या प्रश्नाचं उत्तर पर्रिकरांनी या कृतीतून सूचित केलं होतं असं म्हटलं गेलं.
जेव्हा पर्रिकरांचं निधन झालं आणि 19 मार्च 2019 मध्ये प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांचा रस्ता सोपा नव्हता. जरी भाजपा आणि संघ त्यांच्या मागे उभा होता, तरीही त्यांना पक्षात मोठी स्पर्धा होती. एक तर विश्वजीत राणे होते, जे 2017 मध्ये आमदारांचा एक गट घेऊन कॉंग्रेसमधून आले होते. ते माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणेंचे पुत्र आणि मुरलेले राजकारणी आहेत. त्यांना भविष्यात या पदाची शक्यता दाखवल्यानंच ते भाजपात आले असंही म्हटलं गेलं. सोबत गोवा फॉरवर्ड पार्टीचे विजय सरदेसाई, मगोपाचे सुदिन ढवळीकर या उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छाही लपलेली नव्हती.
पण तरीही दोन गोष्टी सावंतांच्या पथ्यावर पडल्या. एक म्हणजे मनोहर पर्रिकरांचा विश्वास आणि दुसरं म्हणजे भाजपा आणि संघाच्या काडरमधून आलेले ते एकमेव पर्याय होते. संघाला त्यांनाच संधी द्यायची होती. म्हणून पक्के, धूर्त राजकारणी अशी प्रतिमा नसणाऱ्या, मंत्रिपदाचा पूर्वानुभव नसणाऱ्या आणि उच्चशिक्षित असणाऱ्या प्रमोद सावंतांना संधी मिळाली.
गोव्यात धर्म-जात असं राजकारण बाकीच्या राज्यांमध्ये होतं तसं होत नाही, पण जातींचा सत्तेतला तोल राखला जातो. 'सारस्वत' पर्रिकरांच्या नेतृत्वात तीन दशकं गोव्यात लढलेल्या भाजपानं 'मराठा' सावंतांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून निवडलं. त्यासाठी सरकारमधल्या सर्वांचं एकमत होता होता वेळ गेला आणि 19 मार्चच्या पहाटे पावणेदोन वाजता प्रमोद सावंतांचा गोव्याच्या राजभवनात शपथविधी झाला.
पर्रिकरांच्या छायेतून सावंत बाहेर पडतील का?
साधे, नेमस्त, अनाक्रमक अशी प्रतिमा असणाऱ्या प्रमोद सावंतांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर मात्र चपळाईनं काही चाली केल्या. अर्थात त्यात गोवा भाजपा त्यांच्यासोबत होतीच. 2019 मध्ये ते मुख्यमंत्री होईपर्यंत भाजपा सरकार जेमतेम बहुमतातच होती. पण आता त्यांनी कॉंग्रेसमधून 10 आणि 'मगोपा'मधून 2 आमदार फोडले आणि भाजपात आणले. भाजपाचा आकडा 27 आमदारांपर्यंत पोहोचला. गोवा फॉरवर्ड पार्टी आणि उरलीसुरली मगोपा सरकारमधून बाहेर गेली.
पण त्यानंतर पर्रिकरांची भाजपा कोणती आणि सावंतांची भाजपा कोणती असा वाद गोव्यात रंगला. सावंतांच्या नेतृत्वातला भाजपा हा बहुतांशानं बाहेरच्या पक्षातून आणलेल्यांचा भाजपा बनला. भाजपा पर्रिकरांच्या प्रतिमेतून आणि छायेतून बाहेर पडत होती. संघाचे आणि काडरमधले लोक नाराज होते. त्याविरुद्ध कॉंग्रेसनं या निवडणुकीत सगळे नवीन चेहरे दिले होते. पण भाजपाच मोठा पक्ष ठरला. पण त्यातही ज्यांना बाहेरून पक्षात नंतर आणलं गेलं, त्या 2012 मधले आमदार गोव्यात पडले. बाकीचे तीन अगदी काठावर निवडून आले. लोकांनी बाहेरच्यांपेक्षा काडरमधल्या लोकांना निवडून दिलं.
"हे एका प्रकारे गोव्याच्या लोकांनीच भाजपात स्वच्छता मोहिम राबवली नाही का?" असा प्रश्न जेव्हा आम्ही प्रमोद सावंतांना विचारला तेव्हा ते फक्त हसले आणि म्हणाले, "निवडणुकांमध्ये जिंकण्याची कसोटी महत्वाची असते. काही बाबतीत आम्ही कमी पडलो. ते होत असतं. पण कॉंग्रेसमधून आलेले 7-8 जण निवडूनही आले आहेत."
पण 'स्वच्छता मोहिमे'मुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रमोद सावंतांना त्यांच्या मंत्रिमंडळात बाहेरच्यांपेक्षा काडरमधल्या, पक्षाच्या लोकांना संधी देता येणार आहे. पर्रिकरांनंतर जे मिळालं होतं ते मिसळ असलेलं मंत्रिमंडळ न करता स्वत:चं पहिलं मंत्रिमंडळ त्यांना बांधता येणार आहे. विश्वजीत राणेंसारखे महत्वाकांक्षा असलेले आक्रमक नेते आहेत. राणेंचे आणि सावंतांचे खटके मंत्रिमंडळातही कोरोना काळात उडाले आहेत. आता सावंत त्यांना कसे बांधून ठेवतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
साधारण दोन वर्षांची प्रमोद सावंतांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द राजकीय घडामोडी वगळता कामाच्या दृष्टिकोनातून फारशी चर्चेची ठरली नाही. कोरोना काळात गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झालेले मृत्यू असतील, ऑक्सिजनचा कमी पडलेला पुरवठा असेल किंवा तत्कालिन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेले भ्रष्टाचाराची आरोपवजा विधानं असतील या गोष्टींची मोठी चर्चा झाली. 'आप'नं सरकारविरुद्ध केलेली आंदोलनं जास्त गाजली. गव्हर्नन्स ही बाजू सावंतांच्या नेमस्त चेह-यानं झाकून गेली.
या निवडणुकीनं मनोहर पर्रिकरांचा वारसा कोणाकडे या प्रश्न सोडवला आहे. त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर बंड करुन निवडणुकीत होते, पण त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या छायेतून बाहेर पडून प्रमोद सावंत आता अधिक आक्रमक आणि अधिकार गाजवणारं रुप घेतात का हे पहायला हवं. निवडणुकीत स्थानिक चेहरा जरी सावंतांचा होता तरीही देवेंद्र फडणवीसांनी सगळी सूत्र हाती घेतली होती. त्यांनीच निर्णय घेतले होते. त्यात मवाळ सावंत हे मागे मागे होते असं गोव्यात बोललं गेलं. ते दिसतंही होतं. विजय आणि सत्ता आता सावंतांना बदलेल का यावर गोव्याचं नजीकचं राजकारण अवलंबून असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)