You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरे म्हणतात, ‘ही तर सुरुवात आहे, कधी ना कधी यश येईल’ #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) आदित्य ठाकरे म्हणतात, 'ही तर सुरुवात आहे, कधी ना कधी यश येईल'
पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि आम आदमी पक्षाला घवघवीत यश मिळालं. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढलेल्या शिवसेनेवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
यावर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले, "ही तर सुरुवात आहे, आम्ही आणखी लढू. कधी ना कधी यश येईल."
आदित्य ठाकरे हे स्वत: उत्तर प्रदेश आणि गोव्यात प्रचारासाठी गेले होते.
पाच राज्यात विजयी झालेल्यांचं अभिनंदन करतानाच आदित्य ठाकरे म्हणाले, "जे या निवडणुकीत लढले त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. हिमतीने, ताकदीने लढले. मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जे निकाल आहेत सर्वांच्या डोळ्यासमोर आहेतच. पण कुठेही नैराश्याचं वातावरण नाही. आमचा जोश वाढलेला आहे कारण पहिल्यांदा आम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने तिथे लढलो."
2) शिवसेनेची लाईट गुल झालीय, आता मुंबईतही परिवर्तन होणार - शेलार
"शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले आहे. लाईट गुल झालीय. आता मुंबईतही परिवर्तन होणार. यांची लाईट गुल होणार आहे. मोदी है तो मुमकीन है, मुंबईतही चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस काम करणार," असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. झी न्यूजनं ही बातमी दिलीय.
"बोरूबहाद्दर आणि युवराज गोवा-गोरखपूरमध्ये गेले. बदल आणू म्हणाले. गोरेगावमध्ये बदल करू शकले नाहीत. नोटाला जेवढी मतं आहेत, त्यापेक्षा कमी मतं शिवसेनेला मिळाली," असं म्हणत शेलारांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.
काल, 10 मार्च रोजी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. त्याचावेळी गोवा आणि यूपीत निवडणूक लढलेल्या शिवसेनेचे मात्र डिपॉझिट जप्त झाल्याचे चित्र आहे.
3) भाजपचा विजय म्हणजे आमचा पराभव नाही - राकेश टिकैत
"आम्ही क्रांतिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत. आम्ही राजकारणी नाहीत. त्यामुळे भाजपचा विजय म्हणजे आमचा पराभव नाही," असं शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी टाइम्स नाऊसोबत बोलताना म्हटलं.
केंद्र सरकारने आणलेल्या शेतीविषयक तीन कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर केंद्र सरकारनं तिन्ही कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केलं होतं.
शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका बसेल, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत होती. मात्र, शेतकरी पट्टा समजल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातही भाजपला चांगलं यश मिळाल्याचं चित्र आहे.
4) राणे पिता-पुत्रांकडून गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणात खळबळजनक आरोप केल्यानं अडचणीत आलेल्या राणे पिता-पुत्रांना कोर्टानं दिलेला दिलासा 15 मार्चपर्यंत कायम ठेवलाय.
नारायण राणे आणि नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनाला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आलाय. तसं प्रतिज्ञापत्र दिंडोशी पोलिसांच्या वतीने सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं.
दुसरीकडे, राणे पिता-पुत्रांनी आपल्याविरोधात दाखल गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचा दावा केलाय आणि त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतलीय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियनने मालवणीतील राहत्या घरी 9 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. तिच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी राणे पिता-पुत्रांवर दिशाच्या आई-वडिलांनी पोलीस तक्रार केली होती.
5) ओबीसी आरक्षणासाठीचा समर्पित आयोग रद्द
राज्य मागासवर्ग आयोगाचा ओबीसी आरक्षणासाठीचा समर्पित आयोग रद्द करण्यात आलाय. महाराष्ट्र सरकारनं अधिसूचना जारी करत हा निर्णय घेतला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक डेटा गोळा करण्याचे काम आता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जयंत बंथिया समितीकडे देण्यात आले आहे.
तसंच, ओबीसींचं राजकीय आरक्षण निश्चितीचे कामही याच समितीकडे वर्ग करण्यात आलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)