उद्धव ठाकरेंच्या तब्येतीवरून राज ठाकरेंचा मोठा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप, राज ठाकरे यांनी केला आहे. पुण्यात मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

आता निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असा दावा राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला आहे.

"निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. मला वातावरणात निवडणूक दिसेना, ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं. सगळं खोटं आहे. यांना निवडणूका घ्यायच्या नव्हत्या.मुख्यमंत्री यांची तब्बेत चांगली नाही याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण खरं हे कारण आहे," असं राज ठाकरे म्हणालेत.

"जूनमध्ये पावसात निवडणुका घेणं अवघड होईल. लोकांना निवडणुकांमध्ये काही रस नाही. निवडणूक लढावनाऱ्यांना त्यात रस आहे, निवडणूका न घेता प्रशासक नेमायचा म्हणजे सरकार आणि महापालिका त्यांच्याच हातात," असा आरोपसुद्धा राज ठाकरे यांनी केला आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केली.

"कार्यालय न उघडता लोक तुमच्याकडे यायला हवेत, संपर्क कार्यालय न थाटता लोक सरकारकडे न जाता माझ्याकडे येतात," असं यावेळी राज ठाकरे म्हणालेत.

"ज्या ठिकाणी जाईल त्या पदाधिकारीच्या घरी जेवणार इतर पक्षा सारखा जात बघून नाही," अशी टीका राज यांनी इतर पक्षांवर केली आहे.

प्रत्येक सण तिथीनुसार साजरा होतो. शिवाजी महाराजांची जयंती सर्वांसाठी सण आहे. म्हणून ती तिथीनुसार साजरी करा, असंसुद्धा राज ठाकरे म्हणालेत.

राज ठाकरेंच्या भाषणातील इतर मुद्दे

  • दोन वर्षं कुठे भाषण केलं नाही. मुलाखती दिल्या पण भाषण नाही केलं.
  • आझाद मैदानवर मोर्चा काढला ते शेवटचं भाषण होतं. त्यानंतर दोन वर्ष बोललो नाही.
  • लॉकडाऊन मधली शांतता कधीच अनुभवली नाही. मला पत्र लिहून मोदींना कळवावं वाटत एक दोन दिवस लॉकडाऊन ठेवा. शांतता चांगली होती आता ती परत हरवत चालली आहे.
  • कोव्हिडमध्ये कुटुंब जवळ आली. कोव्हिडचं संकट जगावर होतं आपल्यावर अजून संकटं चालूच आहेत.
  • माझ्या आणि पक्षाच्या आयुष्यात संकटं आली. या संकटातून काय शिकलो हे लक्षात ठेवायचं असतं. याही काळात माझ्याबरोबर राहिलात या बद्दल लोकांचे धन्यवाद देतो.
  • जगात प्रत्येकाला वाईट काळ आला. एकाच व्यक्तीला वाईट काळ आला नाही त्या म्हणजे लता दीदी. लता दीदी सांगत होत्या, माझे वडील गेले तेव्हा परिस्थिती अशी असायची की सकाळी जेवणार आहोत की रात्री जेवणार आहोत. कुरमुरे खाऊन दिवस काढले.
  • शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं. आम्हाला इतिहास नाही पाहायचा जात पहायची. राजकीय पक्षांनी तुम्हाला जातीमध्ये अडकवल आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)