You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे म्हणजे मनोरजंन, मनोरंजन, मनोरंजन - अमृता फडणवीस : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात.
राज ठाकरे म्हणजे मनोरजंन - अमृता फडणवीस
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे मनोरंजन, मनोरंजन आणि मनोरंजन आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.
एबीपी माझा या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांना देशातील राजकीय नेत्यांविषयी मत विचारण्यात आलं. त्यावेळी राज ठाकरेंबद्दल विचारले असता, त्यांनी राज ठाकरेंना मनोरंजन असं म्हटलं. तसेच, "असं म्हटल्यानं त्यांना राग तर येणार नाही ना?" असंही अमृता फडणवीसांनी विचारलं.
यावेळी अमृता फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही मत विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, "मोदी हे 'नये भारत के राष्ट्रपिता' आहेत." अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मोदींना दिलेल्या याच उपमेमुळं वादात अडकल्या होत्या.
तर शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 'मोठे भाऊ' असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 175 जागा जिंकेल - अजित पवार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या 175 जागा निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलाय. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.
"मुख्यमंत्री सातत्यानं 'आम्हाला विरोधक दिसतच नाहीत' असं सांगतायत. जर विरोधक मैदानात नाहीत, तर राज्यात इतक्या सभा का घेतायत? केंद्रातून मंत्री कशासाठी येतायत? मोदी, शाह कुणासाठी सभा घेतायत? निवडणुकीआधी यात्रा का काढावी लागली," असे सवालही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून विचारले.
दुसरीकडे, शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील नेतृत्त्वावर महत्त्वाचं विधान केलंय. पवार म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लोकशाही पद्धतीने राजकीय वारसदार ठरेल." लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
मुख्यमंत्री भाजपचाच, इच्छा असल्यास आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं - फडणवीस
राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, "शिवसेनेची इच्छा असेल तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपदी बसवू शकतात. पण हा त्यांचा निर्णय असेल."
"भाजपनं गेल्या पाच वर्षात चांगलं काम केल्यानं मला कोणतीही भीती नाहीय. कारण माझ्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप भक्कमपणे उभे आहेत," असा दावा फडणवीस यांनी केला.
'एमआय 17' हेलिकॉप्टर चुकून पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलाकडून कारवाई
'एमआय 17' हे हेलिकॉप्टर पाडल्याप्रकरणी भारतीय हवाई दलानं सहा अधिकाऱ्यांवर कारवाई केलीय. दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शललाही सामोरं जावं लागणार आहे. टाईम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिलीय.
16 फेब्रुवारीला बालाकोट हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय हवाई दलाच्या काही अधिकाऱ्यांना श्रीनगरजवळील बडगाममध्ये आपलंच एमआय-17 हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यात सहा अधिकारी मृत्यूमुखी पडले होते.
भारतीय हवाई दलानं कारवाई केलेल्या सहापैकी दोन अधिकाऱ्यांना कोर्ट मार्शलला सामोर जावं लागेल, तर उर्वरीत चार जणांना प्रशासकीय कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
दरम्यान, एमआय-17 हेलिकॉप्टर चुकून पाडणं ही मोठी आणि गंभीर चूक होती, अशी कबुली काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी दिली होती.
PMC बँकेतून आता 40 हजार रूपये काढता येणार
पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं घेतला आहे. आता खातेधारकांना 40 हजार रूपये काढता येणार आहेत. इंडिया टुडेनं ही बातमी दिलीय.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेऊन, पीएमसी बँकेच्या ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शक्तिकांत दास यांनीही ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं.
पीएमसी बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादल्यानंतर तीनवेळा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली होती. आधी केवळ एक हजार रूपये काढता येत होते. त्यानंतर 10 हजार, 25 हजार आणि आता 40 हजारांपर्यंत मर्यादा वाढवलीय.
नव्या मर्यादेमुळं 77 टक्के ग्राहक पीएमसी बँकेतून आपले पैसे काढू शकतील, असा दावा आरबीआयनं केलाय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)