You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोथरूड : चंद्रकांत पाटलांसाठी किती सोपं किती कठीण? - विधानसभा निवडणूक
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांची निवडणूक आता रंगतदार वळणावर आली आहे.
आधी ब्राह्मण उमेदवार हवा या मागणीमुळे गाजलेली ही निवडणूक आता मात्र स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार अशी होताना दिसत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असल्यानं साऱ्या राज्याचं लक्ष इथं आहे. पाटील यांनी आतापर्यंत विधान परिषदेची निवडणूक लढवली आहे. ते पुणे पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
तर याठिकाणी प्रबळ स्थानिक उमेदवार आहेत मनसेचे किशोर शिंदे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी पाठिंबा दिलाय.
एकूण 11 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे. पण इथं दुरंगीच लढत होण्याची चिन्हं जास्त आहेत.
या 11 उमेदवारांमध्ये एकही ब्राह्मण उमेदवार रिंगणात नाही हे विशेष. सर्व ब्राह्मण संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात भाजपला यश आलं आहे. सर्व संघटनांनी एक संयुक्त पत्रक जारी करून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आधी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केलेल्या ब्राह्मण उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहेत.
पण त्याचवेळी या मतदारसंघातल्या ब्राह्मण समाजाचा मलाच पाठिंबा असल्याचा दावा मनसे उमेदवार किशोर शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे.
किशोर शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी आरएसएसच्या संचलनाचं स्वागत करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न देखील याठिकाणी केला आहे.
"आरएसएसशी माझे चांगले संबंध आहेत. आरएसएसचे लोक मला मदत करतील, ब्राह्मण समाजाचे लोकं आम्हाला सुद्धा मतदान करतात, अनेक ब्राह्मण समाजाच्या लोकांनी फोन करून मला पाठिंबा दिला आहे," असा दावा सुद्धा किशोर शिंदे यांनी केला आहे.
असं असलं तरी ही निवडणूक आता स्थानिक विरुद्ध बाहेरचा असल्याचं शिंदे सांगतात.
चंद्रकांत पाटील यांना याबाबत बीबीसीनं विचारलं तेव्हा त्यांनी ते बाहेरचे असल्याचा मुद्दा खोडून काढला. मी पुण्याचाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
"मी 1982 पासून दर महिन्याला पुण्यात येत आहे, विद्यार्थी परिषद, भाजपमध्ये काम करत असताना सतत पुण्यात येत आहे. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाचा मी गेली 12 वर्षं आमदार आहे," असं त्यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
अशावेळी स्थानिक उमेदवारावर झालेला अन्याय हा सुद्धा मनसे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचाराचा भाग असणार आहे.
पुण्यातला भाजपचा बडा नेता कोण?
कोथरूडच्या निमित्तानं आता पुण्यातला भाजपचा सर्वांत मोठा नेता कोण ही सुद्धा चर्चा सुरू झाली आहे.
आतापर्यंत गिरीश बापट यांचं नाव पुण्यातले भाजपचे बडे नेते म्हणून घेतलं जात होतं, पण चंद्रकांत पाटील यांच्या एन्ट्रीमुळे त्याचं नाव मागे पडेल का?
या बाबत राजकीय विश्लेषक अद्वैत मेहता सांगतात, "गिरीश बापटांचं महत्त्व कमी होत असल्याचं दिसत असलं तरी चंद्रकांत पाटलांच्या निवडणुकीची जबाबदारीच आता गिरीष बापट यांनी स्वतः घेतली आहे. त्यातच बापट खासदार झाल्यामुळे त्यांच्या जागी महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली, परिणामी मुक्ता टिळक यांच्या रिकाम्या झालेल्या जागी बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न होऊ शकतो. यातून बापटांनी पुन्हा एकदा पुण्यावर आपली पकड कायम असल्याचा संदेश दिला आहे," असं मेहता सांगतात.
अशा सगळ्या स्थितीत भाजपनं लडाखचे खासदार जामयांग नामग्याल याचं कलम 370 च्या विषयावर भाषण आयोजित करून निवडणुकीत राष्ट्रवाद आणि काश्मीरचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याला प्रत्युत्तर म्हणून आम आदमी पार्टीनं 'पाटील ऑक्युपाईड कोथरूड' हे कॅम्पेन सुरू केलं आहे. या मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार अभिजीत मोरे हे आहेत.
त्यामुळे आधी जात, नंतर स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशा वळणावर गेलेली ही निवडणूक आता राष्ट्रवादाच्या मुद्द्याच्या दिशेकडे जात असल्याचं चित्र आहे.
कोथरूडमध्ये येत्या काळात राज ठाकरे, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
"या सभांनंतर कळेल की ही निवडणूक एकतर्फी होणार आहे की किशोर शिंदे चंद्रकांत पाटलांना कडवी झुंझ देतात," असं मेहता सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)