You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019: रामदास आठवले - रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार #राष्ट्रमहाराष्ट्र
मी रिपब्लिकन ऐक्यासाठी तयार आहे, परंतु प्रकाश आंबेडकर नाहीत. जर ते आमच्याबरोबर आले तर मी त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करायला तयार आहेत, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बीबीसी मराठीच्या राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात केलं.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. तेव्हा रामदास आठवले भाजपशी युती,प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अशा अनेक विषयांवर बीबीसी मराठीच्या नीलेश धोत्रे यांच्याशी बातचीत केली.
प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी जर तयारी दाखवली असती तर मी त्यांच्याबरोबर काम केलं असतं, तसंच मायावती रिपब्लिकन पार्टीमध्ये आल्या तर मी त्यांना पक्षाचं अध्यक्षपद द्यायला तयार आहे, असं सांगत रामदास आठवले यांनी "आजही आपण दलित पक्षांच्या ऐक्यासाठी तयार आहोत," असं सांगितले.
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी AIMIMच्या असदउद्दिन ओवेसी यांच्याबरोबर महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे, जी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार आहे.
रिपब्लिकन ऐक्याबाबत बोलताना रामदास आठवले पुढे म्हणाले, "मी ज्या पक्षांबरोबर जातो त्या पक्षांना सत्ता मिळते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असो वा भाजपा-सेना युती, सर्व पक्षांना दलितांच्या मतांची गरज आहे. परंतु आम्हाला स्वबळावर यशस्वी होता येत नाही.
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
"1986 साली सर्वांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा यश आलं नाही. आज प्रकाश आंबेडकरांच्या सभांना गर्दी होत आहे, तिचं रूपांतर मतांमध्ये होईल की नाही, हे सांगता येत नाही. वंचित बहुजन आघाडीची एकही जागा येणार नाही. मात्र त्यांच्या निवडणूक लढवण्याने भाजपा-शिवसेना युतीचा फायदा होणार हे मात्र नक्की," असं ते म्हणाले.
"काँग्रेसबरोबर असताना माझा अपमान झाला, मला पराभूत करण्यात आलं. माझं दिल्लीतल्या घरातलं साहित्य रस्त्यावर फेकण्यात आलं. त्यामुळं मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला," असं सांगायलाही ते विसरले नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आंबेडकरवादी
रा. स्व. संघ आणि भाजपबरोबर कसं जुळवून घेतलं, हे सांगताना आठवले म्हणाले, "भारतीय जनता पक्षासोबत मी सध्या रुळलेलो आहे, कारण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळलेले आहेत. रा. स्व. संघाशी आमचे अजून थोडे मतभेद आहेत.
"परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आंबेडकरवादी विचारांचे आहेत. जर डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण केली नसती तर एक चहावाला पंतप्रधान झाला नसता, असं पंतप्रधान स्वतःच म्हणतात," त्यांनी सांगितलं.
सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे कोट्यवधींची कामं
केंद्र सरकारने दलितांसाठी अनेक कामं केली आहेत, हे सांगताना रामदास आठवले म्हणाले, "इंदू मिलच्या 3,600 कोटी रुपयांच्या जागेवर 736 कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभं केलं जाणार आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येत आहे.
"डॉ. आंबेडकरांच्या संबंधित देशातील सर्व ठिकाणी सरकारनं निधी दिला आहे. माझ्या मंत्रालयाचं बजेट आता 76 हजार कोटी रुपयांचं आहे. दिव्यांगांना शिक्षणात 5 आणि नोकरीमध्ये 4 टक्के आरक्षण देण्यात आलं. 12 ते 12.5 लाख लोकांना आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आले आहे."
दलितांवरील हल्ले सर्व सरकारांच्या काळामध्ये
भाजप सत्तेत आल्यापासून दलितांवर हल्ले वाढल्याच्या बातम्यांबद्दल ते म्हणाले की असे हल्ले सर्वच पक्षांच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहेत. "या हलल्यांचा आणि सरकारमध्ये असलेल्या राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही. भाजप असो वा काँग्रेस असो, कुठलाही पक्ष दलितविरोधी नसतो," असंही रामदास आठवले यांनी सांगितलं.
आठवले यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांनाही उत्तर दिली. त्यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये कविता ऐकवून ही चर्चा चांगलीच रंगवली.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतयांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)