You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा निकाल आश्चर्यकारक असेल - प्रकाश आंबेडकर #राष्ट्रमहाराष्ट्र
"कोणत्याही परिस्थितीत आपण शिवसेना आणि भाजप या पक्षांबरोबर जाणार नाही. सेक्युलर विचारांच्या पक्षांना आमचा अजेंडा मान्य असेल तर त्यांच्याबरोबर जाऊ," असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात व्यक्त केलं.
बीबीसी मराठीच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात राज्यातील प्रमुख राजकीय नेते आपापली मतं आणि येत्या निवडणुकांमधली स्वतःची, स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.
वंचित बहुजन आघाडी, दलित नेते, जातीचं राजकारण अशा अनेक विषयांवर भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीच्या अभिजित कांबळे यांच्याशी बातचीत केली.
काँग्रेस आणि असदउद्दिन ओवेसी यांच्या AIMIM या दोन पक्षांपैकी MIM बरोबर जाण्याचा विचार बहुजन वंचित आघाडीने केल्याबद्दल ते म्हणाले, "आम्ही MIMला बरोबर घेतलं नाही. आम्हाला काँग्रेससोबत समझोता करायचा होता. मात्र काँग्रेसनं आमची उपेक्षा केली, त्यानंतर ओवेसींशी बोलणं झालं. आमच्या गरिबांच्या चळवळीला ओवेसींनी पाठिंबा दिला आहे."
'दाऊदची शरणागतीची तयारी होती...'
"मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही महिन्यांनी दाऊदने शरण येण्याची तयारी दाखवली होती, असं राम जेठमलानी यांनी सांगितलं होतं. तेव्हा संबंधितांनी ही माहिती तत्कालीन पंतप्रधान आणि गुप्तचर संस्थांना द्यायला हवी होती. त्यानंतर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये कुठेना कुठे त्याचा संबंध आहे.
"आज परराष्ट्रमंत्री 'दाऊदला आमच्या पदरात घाला, अशी विनवणी जगभरात करत असतात. त्याऐेवजी तेव्हाच निर्णय घ्यायला हवा होता," असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
भीमा कोरेगाव प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, "भीमा कोरेगावप्रकरणानंतर लोकांनी केलेला हिंसाचार दिसतो. मात्र पोलिसांची निष्क्रियता लोकांना दिसत नाही. लोकांच्या हिंसेला पोलिसांची निष्क्रियता कारणीभूत असते."
पाहा संपूर्ण मुलाखत इथे
'निवडणूक लढविण्याचा निर्णय अद्याप नाही'
लोकसभा निवडणूक सोलापूरातून लढणार की अकोल्यातून असं विचारताच "अद्याप मतदारसंघाचा निर्णय झालेला नाही" असं उत्तर त्यांनी दिलं. किंबहुना "मी निवडणूक लढवायची की नाही, याबाबत निर्णय घेतलेला नाही."
निवडणूक लढवण्याने आघाडीला फायदा होईल की माझ्या सर्वत्र प्रचाराने होईल, याचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला जाईल. मात्र वंचित बहुजन आघाडीचे निकाल आश्चर्यकारक असतील, असा विश्वासही त्यांनी यावेळेस बोलून दाखवला.
वंचित बहुजन आघाडी इतर दलित चळवळीतील पक्षांशी युती करणार का, असं विचारताच आम्ही कुणाशी युती करायची नाही, असा सामूहिक निर्णय घेतला आहे, असं आंबेडकर यांनी उत्तर दिलं. "वंचित बहुजन आघाडीची चळवळ निवडणुकीनंतरही कायम राहील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'नक्षलवाद का तयार होतो?'
नक्षलवादाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "नक्षलवाद भारताच्या कोणत्या प्रदेशात आहे, याचा विचार केला पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असणाऱ्या प्रदेशामध्ये आदिवासी लोक राहात आहेत. आदिवासींच्या प्रदेशाचं प्रशासन त्यांनीच चालवलं पाहिजे, अशी घटनेत तरतूद होती. मात्र गेल्या 70 वर्षांमध्ये तसं झालेलं नाही. त्यांच्या नैसर्गिक संपत्तीवर संकट आल्यावर त्यांनी उठाव केला. तिथलं जल, जंगल, त्यांची जमीन आमची आहे, ते कुणाच्याही बापाचं नाही, अशी या आदिवासींची घोषणाच आहे. त्यामुळ नक्षलवाद का तयार होतो याचा विचार सर्वांनी केला पाहिजे."
मुंबईतल्या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदान मिळवून दिलं का? असा प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले, "शिवाजी पार्कचं मैदान आता कोणाच्याही मेहेरबानीमुळं मिळत नाही. हायकोर्टानं त्याची जबाबदारी महानगरपालिकेकडं दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला हे मैदान महानगरपालिकेनं दिलं होतं."
"वंचित बहुजन आघाडीने औरंगाबादच्या परिषदेमध्ये आपलं शेती धोरण स्पष्ट केलं होतं. ती आमची शेतकी परिषद होती असं सांगून शेतकऱ्याला किमान आधारभूत मूल्य मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहोत," असं आंबेडकर यांनी सांगितलं.
कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -
- सकाळी 11 वाजता : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा
- दुपारी 12 वाजता : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा
- दुपारी 2 वाजता : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत
- दुपारी 3 वाजता : प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी, यांच्याशी चर्चा
- दुपारी 4 वाजता : धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, यांच्याशी चर्चा
- संध्याकाळी 5 वाजता : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी बातचीत
यांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)