You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : 'जैश ए महंमद'वर पाकिस्तान कारवाई का करत नाही?
- Author, अजय शुक्ला
- Role, संरक्षण तज्ज्ञ, बीबीसी हिंदीसाठी
14 फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात CRPF चे 40पेक्षा जास्त जवानांनी प्राण गमावला. भारतात मे महिन्याच्या आत निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर या हल्ल्याचा सूड घेण्याची शक्यता जास्त आहे.
या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दलांना मोकळीक दिली आहे. जहालवादी संघटनांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असंही ते म्हणाले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला या हल्ल्यासाठी जबाबदार धरलं आहे. या हल्ल्याला चोख उत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या अनेक टीव्ही वाहिन्यासुद्धा सुडाची भाषा करत आहेत.
पाकिस्तानमधील 'जैश-ए-महंमद' या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरला भारतीय सैन्याने 1990च्या दशकात अटक केली होती. 1999 साली झालेल्या कंदाहर प्रकरणात त्याची सुटका करण्यात आली होती. या अपहरण नाट्यासाठी पाकिस्तानच जबाबदार आहे, असं भारताला अजूनही वाटतं.
'जैश-ए-महंमद'मुळे कायमच तणाव
गेल्या अनेक वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्रावर अझहरला 'जागतिक दहशतवादी' ठरवावं म्हणून दबाव टाकत आहे. मात्र पाकिस्तानचा मित्रराष्ट्र चीन यात विघ्न निर्माण करत आहे.
त्यामुळे जैश-ए-महंमदचा या हल्ल्यातला सहभाग म्हणजे पाकिस्तानचा या हल्लायातील सहभाग दर्शवतो. 2001मध्ये 'जैश'च्याच एका आत्मघातकी पथकाने संसदेवर हल्ला केला होता. त्यात संरक्षण दलातील नऊ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक महिने दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
2016 मध्ये 'जैश'ने पठाणकोटमध्ये आणि उरीत हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाक प्रशासित काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं.
ISI लाही 'जैश'मुळे अडचण
जर कट्टरवादी गटांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याला पाकिस्तानवर काही कारवाई करावी लागली तरी त्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे, असं भारतीय सैन्याने म्हटलं आहे. मात्र असं काही झालं तर हे प्रकरण वाढत जाऊन युद्धापर्यंत जाऊ शकतं.
त्याचप्रमाणे दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत त्यामुळे हा धोका आणखी बळावतो. पाकिस्तानने अनेकदा अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुलवामा हल्ला हा चिंतेचं कारण असल्याचं ट्वीट केलं आहे. या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याच्या आरोपाचाही त्यांनी इन्कार केला आहे. कोणतीही चौकशी न करता भारतीय प्रसारमाध्यमं या हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध जोडत आहे असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
या हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने घेतली आहे. या संस्थेचा संस्थापक मसूद अजहर ज्या पद्धतीने पाकिस्तान मोकळा फिरतोय हे पाहता भारतीय लोकांना कोणत्याही पुराव्याची गरज नाही.
ISIसाठीही 'जैश'चं आवाहन राहिलं आहे. जैश ही संघटना लष्कर-ए-तय्यबासारखं पाकिस्तान सैन्याच्या आदेशांचं पालन करत नाही. 'जैश'ने पाकिस्तानमध्येही असेच हल्ले केले आहेत.
2003मध्ये या संघटनेने पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्यावर दोनदा हल्ला केला आहे.
असं असलं तरी या संघटनेचं नाव घेतल्यावर पाकिस्तान डोळ्यांवर झापड लावतो. काश्मीरमध्ये तणावपूर्ण स्थिती ठेवण्यासाठी या संघटनेचा फायदा, हे यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे.
आता 'जैश' वर काय कारवाई होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. ती करण्यासाठी भारताचा दबाव असेल. चीनही आता अजहरला पाठीशी घालणार नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्येही या संघटनेवर बंदी येण्याची शक्यता आहे.
भौगोलिक राजकारणाच्या बाहेर बघायला गेलं तर या घटनेला अनेक स्थानिक पैलूसुद्धा आहेत. गेल्या एका वर्षांत भारतीय सुरक्षा रक्षकांनी 300 कट्टरवाद्यांना ठार मारलं आहे. त्यापैकी बहुतांश दक्षिण काश्मीरमधले होते. तिथेच हा हल्ला झाला आहे.
स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी कट्टरवाद्यांच्या गटाने हा हल्ला केला आहे.
या भागात ज्या संघटनांचा दबदबा आहे त्यापैकी हिज्बुल मुजाहिद्दीनला आत्मघाती हल्ले गैर इस्लामिक वाटतात. अशात जैश-ए-महम्मद आणि लष्कर-ए-तयब्बावर असे हल्ले करण्याची जबाबदारी आहे.
भारतीय सुरक्षा दलांसाठी हा हल्ला म्हणजे गुप्तचर पातळीवर मोठं अपयश आहे. 'जैश' भारतीय लष्कराच्या इतक्या मोठ्या ताफ्यावर हल्ला करण्यात कशी यशस्वी ठरली हे प्रश्न आता तिथल्या पोलिसांना आणि गुप्तचर संस्थांना विचारले जातील.
स्फोटकांनी भरलेली कार, हल्ल्याची पूर्वतयारी आणि अनेक पातळीवरची सुरक्षा व्यवस्था अशा अनेक बाबींवर हे प्रश्न उपस्थित होतील.
सध्या भारत पर्यांयावर विचार करत आहे. आर्थिक पातळीवर त्यांनी पाकिस्तानला असलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा परत घेतला आहे. त्यात पाकिस्तानचं व्यावसायिक आघाडीवर मोठं नुकसान होईल.
त्याशिवाय भारत सरकार पाकिस्तानला मुत्सद्दी क्षेत्रातही दूर सारण्याच्या बेतात आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान 'जैश'वर काही कारवाई करत नाही तोपर्यंत असे हल्ले होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)