पुलवामा : CRPFवर झालेल्या हल्ल्याला धोकादायक संकेत का म्हणत आहेत तज्ज्ञ?

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 जवानांनी प्राण गमावले. तर काही जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरामध्ये आयईडीच्या मदतीनं स्फोट घडवून 40 हून अधिक जवानांना घेऊ जाणाऱ्या बसला निशाणा बनवण्यात आलं.

काश्मीर प्रश्नाचे जाणकार आणि संरक्षण तज्ज्ञ या हल्ल्याला भारत सरकारचं सर्वात मोठं अपयश असल्याचं मानतात.

पूर्व पोलीस उपमहानिरीक्षक आणि लेखक अली मोहम्मद वटाली यांनी म्हटलं की, "अशा प्रकारचा मोठा हल्ला म्हणजे कट्टरवाद्यांना संपवण्यात आलेलं अपयश स्पष्टपणे आधोरेखित करतं. शिवाय असा हल्ला काश्मीर प्रश्न आणखी गुंतागुंतीचा करु शकतो"

ते पुढे म्हणतात की, "भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी वेळोवेळी असा दावा केला की काही दिवसात काश्मीरमधील कट्टरवादी कायमचे नष्ट होतील. मात्र तसं झालं नही. काश्मीरमधील स्थिती आणखी खराब होताना दिसत आहेत. लष्कराचा काश्मीरमध्ये झालेला वापर आणि तशा पद्धतीची रणनीती ही स्थिती सांभाळण्यात अपयशी ठरल्याचं दिसतं. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे, असं म्हणता येणार नाही. "

बीबीसीनं जेव्हा मोहम्द वटालींना विचारलं की, गेल्या काही वर्षांमध्ये कट्टरवाद्यांचे आत्मघातकी हल्ले जवळपास बंद झाले होते, मग हे आता पुन्हा का वाढू लागलं आहे? त्यावर ते म्हणाले, "एक वेळ अशी होती की आत्मघातकी हल्ले होणं, लष्कराला निशाणा बनवणं कायम घडायचं. आणि आता आपण पुन्हा त्याच दिशेने जात आहोत की काय असं वाटतंय"

'ही एक मोठी लढाई आहे'

माजी पोलीस महानिरीक्षक एम.एम.खजुरिया म्हणतात की काश्मीरात जे सुरुय ती काही अशी लढाई नाहीए, जी एक-दोन महिन्यात संपून जाईल. हा एक मोठा संघर्ष आहे.

खजुरिया म्हणतात की, "ही लढाई काही महिन्यात संपून जाईल असं होणं शक्य नाही. विशेषत: जेव्हापासून या लढाईत वहाबी मुस्लिम तरुण जास्त प्रमाणात उतरल्याचं दिसतंय. हा एक नवाच खेळ सुरु झाल्याचं दिसतंय. आजचा हल्ला हा गेल्या काही वर्षातला सर्वात मोठा हल्ला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे जसं की सरकारी रिपोर्ट सांगतायत, "हा हल्ला एका स्थानिक तरुणानं घडवून आणला आहे. स्थानिक तरुण आयसिस आणि वहाबी विचारधारेच्या जवळ जाताना दिसतायत. आणि ही स्थिती सर्वात चिंताजनक आहे. भारत सरकारला याकडं गांभीर्यानं पाहावं लागेल. यावर वेगळा उपाय शोधावा लागेल"

ते पुढं सांगतात की, "भारत सरकारला काश्मीरमधील तरुणांशी, लोकांशी संवाद साधावा लागेल. जे लोक नाराज आहेत त्यांच्याशीही बोलावं लागेल. आणि खरंतर आपण त्या लोकांचा विचार करायला पाहिजे, जे अशा कट्टरवाद्यांपासून दूर आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुठलंही राजकारण करणं चुकीचं हे. आपल्याला लोकांशी संवाद करावाच लागेल."

'पहिल्यांदाच इतका मोठा हल्ला झाला'

गुरुवारी सीआरपीएफ जवानांवर झालेला हल्ला सर्वात घातक आणि खतरनाक घटना असल्याचं एस.पी.वैद्य सांगतात. ते काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक आणि सध्याचे परिवहन आयुक्त आहेत.

ते सांगतात, "मला वाटतं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका धक्कादायक आत्मघातकी हल्ला पाहिला आहे. ज्यात जवानांच्या तुकडीला इतक्या धक्कादायक पद्धतीनं लक्ष्यं बनवण्यात आलं. हल्लेखोर हा स्थानिक तरुण होता. हा खूपच गंभीर आणि खतरनाक संदेश आहे. हे असं का आणि कसं झालं याची चौकशी झाली पाहिजे. ही जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबासारख्या अतिरेकी संघटनांची विचारधारा आहे, ज्याला काश्मिरी तरुण बळी पडताना दिसत आहेत. त्यांना आत्मघातकी हल्लेखोर बनवलं जातंय."

सध्या निवडणुका जवळ आल्या आहेत, अशावेळी अतिरेकी हल्ला झाल्याने जवानांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल का? या प्रश्नाचं उत्तर एस.पी.वैद्य यांनी स्पष्टपणे नाही असं दिलंय.

ते म्हणाले की, "या हल्ल्याचा जवानांच्या मनोबलावर परिणाम होईल असं मला वाटत नाही. याआधीही कट्टरवाद्यांनी लष्करावर हल्ले केले आहेत आणि ते आताही सुरु आहे."

वैद्य यांनी म्हटलं की, "जवानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक झाली की नाही, हे आताच सांगू शकत नाही. मात्र ही घटना का आणि कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे. सखोल चौकशीनंतरच अनेक गोष्टी स्पष्टपणे समोर येतील."

'कट्टरवादाला खतपाणी मिळणार'

90 च्या दशकात कट्टरवादाचा उदय झाला. तेव्हापासून अशा प्रकारचे हल्ले सुरुच आहेत. 2005 पर्यंत हा सगळा सिलसिला सुरु होता. गुरुवारी झालेल्या हल्ल्यामुळे काश्मीरमधील सुरक्षेच्या स्थितीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गेल्यावर्षी 250 हून अधिक कट्टरवाद्यांना लष्करानं संपवल्याचा दावा सरकारनं केला होता. ज्यात अशा संघटनांच्या म्होरक्यांचाही समावेश होता. आता दक्षिण काश्मीर कट्टरवाद्यांचा अड्डा होताना दिसतंय.

2016 मध्ये हिजबुलचा कमांडर बुऱ्हान वाणीला लष्करानं संपवलं. त्यानंतरच्या तीन वर्षात दक्षिण काश्मीरमधील अनेक स्थानिक तरु कट्टरवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचं दिसतंय.

पत्रकार आणि राजकीय निरीक्षक हारून रेशींना वाटतं की, गुरुवारचा हल्ला पुढच्या काळात काश्मीरमधील कट्टरवादाला खतपाणी घालणारा ठरु शकतो.

ते म्हणतात की, "कट्टरवाद्यांसाठी गुरुवारचा हल्ला एखाद्या प्रोत्साहनासारखा ठरेल. कारण गेल्या दोन वर्षात या भागात लष्करानं कडक कारवाया केल्या आहेत. सुरक्षा दलांनी जवळपास 500 हून अधिक कट्टरवाद्यांना ठार केल्याचं सांगितलं जातंय."

हारून रेशी पुढे म्हणतात, "काही दिवसांपूर्वीच भाजप नेते राम माधव यांनी दावा केला होता की काश्मीरमधील कट्टरवाद्यांना संपवण्यात लष्कराला यश आलंय. पण या हल्ल्यानं एक गोष्ट आधोरेखित केली आहे, की कदाचित त्यांची संख्या कमी झाली असेलही पण ते देशासाठी घातक ठरू शकतात. जसं की कालचा हल्ला एका 21 वर्षाच्या तरुण पोरानं केला आहे. तुम्ही लक्षात घ्या ही किती खतरनाक गोष्ट आहे. हा हल्ला एक मोठा संदेश आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)