You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : CRPF जवानांवर हल्ला करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल-मोदी
"दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल." अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना इशारा दिला आहे. तसंच मोदींनी या हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
पुलवामात गुरुवारी CRPFच्या तुकडीवर आत्मघातकी हल्ला झाला. ज्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जैश ए मोहम्मद या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेनंतर देशभरात संताप आणि आक्रोश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत या नव्या रेल्वेच्या लोकार्पण सोहळयात बोलत होते.
यावेळी अतिरेकी संघटनांना इशारा देताना मोदी म्हणाले की, "मी देशाला विश्वास देतो की हल्ल्यामागे ज्या शक्ती आहेत. त्यांना याची शिक्षा नक्की मिळेल. जे आमच्यावर टीका करत आहेत, त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. त्यांच्या भावना मी समजू शकतो. टीका करणं त्यांचा अधिकर आहे. पण मी सगळ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो, की खूपच संवेदनशील आणि भावनिक वेळ आहे. सत्ताधारी असोत की विरोधक आपण सगळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांपासून दूर राहूयात. या हल्ल्याचा देश एकजुटीनं मुकाबला करतोय. देश एका आवाजात बोलतोय हे जगाला समजलं पाहिजे."
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले आहेत. जगात एकट्या पडलेल्या आपल्या शेजाऱ्याला असं वाटत असेल की आपण जे कृत्य करतोय, जे कारस्थान करतोय त्यामुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल तर ते चूक आहे. ते कधीही होणार नाही, असंही मोदींनी ठणकावलं आहे.
पुढे ते म्हणाले की, "सध्या पाकिस्तान आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे अशी कृत्यं करुन ते भारताचे हाल करण्याचे त्यांचे मनसुबे कधीच पूर्ण होणार नाहीत. वेळेनं हे सिद्ध केलंय की त्यांचा रस्ता हा विध्वंसाकडे जाणारा आहे. आपला रस्ता विकासाच्या, समृद्धतेच्या दिशेने जाणारा आहे. 130 कोटी भारतीय मिळून या हल्ल्याचं उत्तर देतील."
पुलवामा हल्ल्यानंतर भारताप्रती सहानुभुती व्यक्त करणाऱ्या देशांचेही मोदींनी आभार मानले आहेत. काही देशांनी कडक शब्दात अतिरेकी हल्ल्याची निंदा केली. भारतासोबत उभं राहण्यची भावना बोलून दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं मोदी म्हणाले.
जगभरातील देशांनाही मोदींनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, "मानवतावादी शक्तींना एकत्र येऊन अतिरेक्यांचा पराभव करावा लागेल. सगळे देश एका भाषेत बोलतील, एका स्वरात बोलतील, एका दिशेनं जातील तेव्हा काही क्षणात दहशतवाद संपून जाईल" असं मोदी म्हणाले.
पुढे त्यांनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करताना भावनिक उद्गार काढले. ते म्हणाले, "पुलवामा हल्ल्यानंतर मन दु:खासह आक्रोशानं भरलं आहे. पण देश थांबणार नाही. शहीदांनी प्राणांची आहुती दिली आहे. देशासाठी ते दोन गोष्टींसाठी जीव धोक्यात घालतात. पहिली देशाची सुरक्षा आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशाची समृद्धता. त्या वीरांना मी नमन करतो. वंदन करतो आणि विश्वास देतो की ज्या स्वप्नांसाठी त्यांनी आयुष्याची आहुती दिली त्यासाठी आम्ही आमच्या आयुष्याचा क्षण-क्षण खपवू.
पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढला
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. कारण भारतानं पाकिस्तानला दिलेला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा अखेर काढून घेतला आहे. भारतानं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या 1996 च्या तरतुदीनुसार पाकिस्तानला 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा दिला होता. त्यामुळे पाकिस्तानला भारताशी व्यापार करणं सोपं झालं होतं. मात्र हा दर्जा काढून घेतल्याने आता पाकिस्तानला भारताशी व्यापार करणं महाग पडेल. दोन्ही देशातील व्यापार 2 बिलियन डॉलर्सच्या घरात असल्याची माहिती आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
पुलवामा हल्ल्यात प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबींयाच्या दुःखात आम्ही सामिल आहोत. या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपला पक्ष सरकार आणि संरक्षण दलांबरोबर आहे असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. कोणत्याही स्थितीत दहशतवाद या देशाची एकात्मता तोडू शकत नाही. ज्या जवानांनी प्राण गमावले त्यांचे कुटुंबीय, मुले,बंधू-भगिनी, संरक्षण दलांबरोबर आम्ही पूर्णशक्तीने उभे राहू असेही राहुल यांनी सांगितले.
हा अत्यंत दुःखाचा क्षण असून पुलवामाशिवाय कोणत्याही विषयावर मत व्यक्त केले जाणार नाही असे राहुल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा राहील असा विश्वास व्यक्त केला. दहशतवादाबाबत हा देश कोणतीही तडजोड करणार नाही असेही डॉ. मनमोहन सिंह यांनी सांगितले.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)