You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : CRPFवरील हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल - सरसंघचालक #5मोठयाबातम्या
सर्व महत्त्वाच्या वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1. पुलवामाचा बदला घेतला जाईल- संरसंघचालक
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला निश्चितपणे घेतला जाईल असा विश्वास रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.
निवडणुकांच्या काळामध्ये लोक स्वतःच्या गुणांची सोडून इतरांच्या दुर्गुणांचीच अधिक चर्चा करतात. अशा काळात नागरिकांनी नकारात्मक चर्चेऐवजी सकारात्मक चर्चेवर भर देण्याची गरज आहे, असेही मत सरसंघचालकांनी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात मांडले.
सरसंघचालकांप्रमाणेच राष्ट्रसेविका समितीने पुलवामा हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ नये आणि या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीतागायत्री अन्नदानम यांनी केले आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
2. विदर्भ दौरा सोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला
विदर्भाचा दौरा अचानक अर्धवट सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला परत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या या भेटीमध्ये महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही समावेश होता. तसेच शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईसुद्धा या बैठकीत सहभागी झाले होते.
ही बैठक संध्याकाळी उशिरापर्यंत चालली. उद्धव ठाकरे यांची चर्चेची इच्छा आहे असे समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार संध्याकाळी तात्काळ मुंबईला येऊन बैठकीसाठी धाव घेतली असे सूत्रांनी सांगितल्याचे एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
3. एमपीएससीच्या राज्यसेवा परीक्षेत सोलापूरचा आशिष बारकूल प्रथम
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या परीक्षेत सोलापूरचा आशिष बारकूल राज्यात पहिला आला आहे. मुलींमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे तर मागासवर्गिय विभागातून सोलापूरचा महेश जमदाडे प्रथम आला आहे.
एमपीएससीचच्या 136 पदांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री जाहीर करणयात आला. आयोगातर्फे राज्यातील 37 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
मुलाखतीसाठी निवडण्यात आलेल्या 427 विद्यार्थ्यांमधून 136 विद्यार्थ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एबीपी माझाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
4. सर्वोच्च न्यायालयाचे दोन अधिकारी बडतर्फ
रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरुद्धच्या एका प्रकरणात न्यायालयाच्या आदेशामध्ये अंबानी यांना अनुकूल ठरेल असा फेरफार केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
न्यायमूर्तींनी दिलेला आदेश लिहून घेऊन तो सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी जबाबादार असणाऱ्या या अधिकाऱ्यांनी बडतर्फ करण्याचा आदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जाहीर केला.
अनिल अंबानी यांनी न्यायालयाला हमी दिली असूनही एरिक्सन इंडियाची देणी चुकविण्यात ते अयशस्वी ठरले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली होती.
न्या. नरिमन यांच्या या आदेशआत फेरफार करण्यात आल्यामुळए सरन्यायाधीशांनी हे पाऊल उचलले.
वरिष्ठ वकील दुष्यंत दवे आणि एरिक्सनच्या इतर प्रतिनिधींनी न्या. नरिमन यंना भेटून ही विसंगती त्यांच्या लक्षात आणून दिली होती. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5. सुशील चंद्र निवडणूक आयुक्तपदी
माजी आयआरएस अधिकारी आणि सीबीडीटी प्रमुख सुशील चंद्र यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
आता निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, दुसरे आयुक्त अशोक लवासा यांच्याबरोबर ते काम करतील.
१ नोव्हेंबर मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत निवृत्त झाल्यानंतर त्रिसदस्यीय आयोगातील एक जागा रिक्त झाली होती.
सुशील चंद्र यांनी रुडकी विद्यापिठातून बी. टेक पदवी संपादन केली त्यानंतर डेहराडूनच्या डीएव्ही महाविद्यालयातून त्यांनी एल.एलबी पदवी संपादन केल्यानंतर ते भारतीय महसूल सेवेमध्ये 1980 साली दाखल झाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)