जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये हल्ला, CRPFचे 34 जवान ठार, हल्ल्यामागे पाकिस्तान - राजनाथ सिंह

    • Author, रियाज मसरूर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगर

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपोराजवळ श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं.

या हल्ल्यात 34 जवान ठार झाले आहेत. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो.

CRPFचे हे जवान 76 बटालियनचे होते. CRPF (ऑपरेशन)चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं, "जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यांतील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता."

हा मोठा ताफा होता. वेगवेगळ्या वाहनांमधून अडीच हजार जवान प्रवास करत होते. जवानांच्या गाड्यांवर गोळीबारही करण्यात आला, अशी माहिती CRPF चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

जवानांचा ताफा पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून निघाला होता. संध्याकाळपूर्वी हे जवान श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

खराब हवामानामुळं गेल्या दोन-तीन दिवसांत या महामार्गावर फारशी वाहतूक नसल्यानं तसंच इतरही काही प्रशासकीय कारणांमुळे जवान मोठ्या संख्येने श्रीनगरकडे जात होते, असं लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

एरवी कोणत्याही ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी एकूण 2547 जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती.

ज्या बसवर हल्ला झाला ती 76 व्या बटायलियनची होती. त्यामध्ये एकूण 39 जवान होते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

या स्फोटात जखमी झालेल्या जवानांना श्रीनगरमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केल आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.

"पुलवामामध्ये CRPF च्या जवानांवर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. संपूर्ण देश या शूर जवानांच्या कुटुंबियांच्या सोबत उभा आहे. जखमी सैनिकांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो."

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगरला जाणार आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं ही माहिती दिली आहे.

तसंच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा देखील केली आहे.

या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी 

जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मचा प्रवक्ता मोहम्मद हसन यानं हल्ल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध केलं. यामध्ये आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यांनं हा हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे. आदिल अहमद हा पुलवामाचाच रहिवासी आहे.

प्रियंका गांधींकडून श्रद्धांजली

प्रियंका गांधी यांची या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची पत्रकार परिषद रद्द केली आहे. त्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी तर आल्या पण त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडेलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि निघून गेल्या.

"जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान ठार झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक देशवासी सहभागी आहे," असं म्हणत प्रियंका यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी लष्कर प्रमुख जनर व्ही. के. सिंग यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. "आमच्या सैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल," असं त्यांनी त्यात म्हटलंय.

राहुल गांधी यांनी ट्वीटकरून हा भ्याड हल्ला असल्याचं म्हटलं आहे. "जम्मू काश्मीरमध्ये पुलवामामध्ये सीआरफीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला भ्याड आहे. त्यामुळे मी व्यथित आहे. शहिदांच्या कुटुंबियाप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. तसंच जखमींना लवकर बरं वाटण्याची प्रार्थना करतो."

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा या हल्ल्याची निंदा केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी देखील ट्वीट करून हल्ल्यात ठार झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला सुरक्षा दलांसमोरचं मोठं आव्हान मानला जात आहे. 

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात झालेल्या हल्ल्यामध्ये 250 जहालवादी, सुरक्षा दलाचे 84 जवान आणि 150हून अधिक सामान्य नागरिक मारले गेले आहेत. 

"या वर्षी सहा आठवड्यांत आम्ही 20 हून अधिक जहालवाद्यांना ठार केलं आहे. थंडीमध्येसुद्धा ही मोहीम सुरू राहणार आहे. नागरिकांना कोणतंही नुकसान न पोहोचवता जहालवादी संघटनांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. मात्र कधीकधी लोक कारवाई होत असताना गर्दी करतात. त्यामुळे जीवितहानी होते," अशी माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

ही बातमी अपडेट केली जात आहे.

हेही वाचलतं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)