You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : बुलडाण्याचे दोन्ही जवान 4 दिवसांपूर्वीच पुन्हा ड्युटीवर रुजू झाले होते
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसीसाठी
जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात बुलडाण्याच्या 2 जवानांना प्राण गमावावे लागले आहेत.
संजय राजपूत आणि नितीन शंकर राठोड अशी त्यांची नावं आहेत.
49 वर्षांचे संजय रजपूत हे मलकापूरचे राहाणारे आहेत. तर 36 वर्षांचे नितीन शंकर राठोड लोणार तालुक्यातल्या चोरपांग्राचे रहिवासी आहेत.
संजय राजपूत CRPFच्या बटालियन 115चे जवान होते. 1996मध्ये म्हणजेच वयाच्या 23व्या वर्षी ते CRPFमध्ये दाखल झाले होते. 20 वर्षं नोकरी केल्यानंतर अतिरिक्त पाच वर्षे त्यांनी वाढवून घेतली होती. 1996 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरात झाली होती.
संजय यांना 2 मुलं आहेत. जय 12 वर्षांचा तर शुभम 11 वर्षांचा आहे. त्यांना एकूण भाऊ 3 आणि 1 बहीण आहे. एका भावाचा अपघातात मृत्यू झाला. आई जिजाबाई 78 मलाकपूर येथे वास्तव्यास आहे.
संजय यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मलकापूरमधल्या नूतन विद्यालयात झालं तर बारावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी जनता कॉलेजमध्ये पूर्ण केलं.
त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर मलकापूर शहरावर शोककळा पसरली आहे.
एक आठवड्यापूर्वीच आले होते घरी
10 फेब्रुवारीला संजय राजपूत मलकापूरवरून त्यांची आई, कुटुंबिय आणि मित्रांची भेट घेऊन नागपूरमार्गे 4-5 दिवसांच्या सुट्या संपवून जम्मूकडे रवाना झाले होते. त्यांची ही शेवटची भेट ठरली.
नितीन शंकर राठोड हे CFPR च्या तीन बटालियनमध्ये 2006ला दाखल झाले होते. आसाममध्ये त्यांचं पहिलं पोस्टिंग झालं होतं. त्याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण इथल्याच आश्रमशाळेत झालं होतं.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीन यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी तसंच आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.
खेळ, व्यायाम करणं याबरोबरच गावातील तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत्त करण्याचं काम नितीन सुट्टीवर आल्यावर करायचे. ते गावकऱ्यांशी अगदी प्रेमाने वागायचे, असं त्यांचे मित्र सांगतात.
50 दिवसाच्या सुट्ट्यांवर आलेले नितीन 4 दिवसांपूर्वी म्हणजे 11 फेब्रुवारीला ड्युटीवर रुजू झाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)