You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करा, त्यांना सोडू नका- उद्धव ठाकरे
"पाकिस्तानला पाकिस्तानच्या भूमीतच उत्तर द्यावं लागणार आहे," असं वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
गुरूवारी पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात CRPFचे 37 जवान ठार झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
"भारताने सर्जिकल स्ट्राइक केली होती. त्याचा मला अभिमान आहे, पण ही सर्जिकल स्ट्राइक पाकव्याप्त काश्मीरमध्ये झाली होती. पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करायला हवी," असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.
"मी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत आम्ही चर्चा केली, पण आता या पार्श्वभूमीवर त्या गोष्टी सर्व गौण वाटतात. निवडणुका या होतच राहतील, पण आता वेळ त्यांना धडा शिकवण्याची आली आहे," असं ठाकरे म्हणाले.
युतीबाबत काय निर्णय झाला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारण्यात आला होता. ते म्हणाले "युती, निवडणुका या होतच राहतील. सध्या पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं गरजेचं आहे."
पुलवामामध्ये नेमकं काय झालं?
"जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातल्या एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता.
हा मोठा ताफा होता. वेगवेगळ्या वाहनांमधून अडीच हजार जवान प्रवास करत होते. जवानांच्या गाड्यांवर गोळीबारही करण्यात आला," अशी माहिती CRPF चे महासंचालक आर. आर. भटनागर यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
जवानांचा ताफा पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून निघाला होता. संध्याकाळपूर्वी हे जवान श्रीनगरला पोहोचणं अपेक्षित होतं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खराब हवामानामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत या महामार्गावर फारशी वाहतूक नसल्यानं तसंच इतरही काही प्रशासकीय कारणांमुळे जवान मोठ्या संख्येने श्रीनगरकडे जात होते, असं लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एरवी कोणत्याही ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी एकूण 2547 जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)