You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुलवामा : CRPF हल्ल्यानंतर प्रियंका गांधी पत्रकार परिषदेत हसत होत्या?
- Author, फॅक्ट चेक टीम
- Role, बीबीसी न्यूज
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचा एक स्लो मोशन व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
या व्हीडिओबरोबर "पुलवामा हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये हसणाऱ्या प्रियंका वाड्रा" असे लिहिण्यात आलेले आहे.
प्रियंका गांधी अशा घटनेबाबत गंभीर आणि संवेदनशील नाहीत असं भासवण्याचा प्रयत्न हा व्हीडिओ शेअर करणाऱ्या लोकांद्वारे केला जात आहे.
गुरुवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हीडिओ थोडा संथ करून अत्यंत अयोग्य संदेश जाईल अशी व्यवस्था करून व्हीडिओ शेअर केला जात असल्याचं आम्हाला दिसून आलं आहे.
काँग्रेसद्वारे पूर्व नियोजित प्रियंका गांधींच्या 'पहिल्या पत्रकार परिषदे'चा व्हीडिओ पूर्णपणे पाहिल्यास हा शेअर करणाऱ्यांचा दावा खोटा असल्याचं दिसून येतं.
ट्विटरवर @iAnkurSingh नावाच्या यूजरने अशाच प्रकारचा व्हीडिओ पोस्ट केला आहे.
त्यांचं हे ट्वीट शेअर केलं जात असून हा व्हीडिओ जवळपास 50 हजारवेळा पाहिला गेला आहे.
हे ट्वीट व्हॉटसअॅपवर शेअर केले जात आहे.
गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर अतिरेक्यांद्वारे हल्ला झाल्याचे समजल्यानंतर सुमारे चार तासांनी प्रियंका गांधी यांची पत्रकार परिषद झाली.
यावेळेस सुरुवातीला त्या म्हणाल्या, "हा कार्यक्रम राजकीय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे हे आपल्या सर्वांना माहिती असेल, परंतु पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय चर्चा करणं आम्हाला उचित वाटत नाही."
यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "आपल्या सर्वांना अत्यंत दुःख झालं आहे. शहीदांच्या नातलगांचे मनोबल टिकून राहावं यासाठी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत."
यानंतर काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया आणि राज बब्बर यांच्यासह प्रियंका गांधी यांनी काही मिनिटे मौन पाळून चारच मिनिटांमध्ये त्या निघून गेल्या.
पुलवामा हल्ल्यात जवानांचे प्राण गेल्यानंतर प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द केली अशी माहिती काही माध्यमांनी प्रसारित केली होती.
पुलवामा हल्ल्यामुळे देशभरात ठिकठिकाणी शोक व्यक्त केला जात आहे तर सोशल मीडियावर काही लोक त्यामध्ये राजकारण शोधत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)