प्रसिद्धीपासून दूर राहणारी पुतिन यांची 'प्रेयसी' अनपेक्षितपणे पुन्हा प्रकाशझोतात का आली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एलिझावेटा फोख्त
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, रशिया
रशिया आणि पुतिन म्हटलं की डोळ्यासमोर येते प्रचंड गोपनीयता. पुतिन यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय, रशियातील उच्चभ्रू वर्ग, उच्च पदस्थ यांच्याबद्दल कमालीची गुप्तता राखली जात असते.
मात्र आता यात बदल होताना दिसत आहे. एरवी प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या कथित प्रेयसी अलीना काबेवा या पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर यावर चर्चा होत आहे.
अलीना यांची चर्चा का होते आहे, रशियात काय बदलतंय याची माहिती देणारा हा लेख.
अलीना काबेवा या लोकांसमोर फारशा न येणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्या माजी ऑलिंपिक जिम्नॅस्ट आहेत आणि स्वतंत्र रशियन प्रसारमाध्यमांमध्ये कधीकधी त्यांचा उल्लेख रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या 'प्रेयसी किंवा जोडीदार' असा केला जातो.
मात्र अलीकडच्या काही महिन्यांमध्ये, 'स्काय ग्रेस' (Sky Grace)या त्यांच्या जिम्नॅस्टिक्स अॅकेडमीचा प्रचार करण्यासाठी अलीना काबेवा यांचं रशियातील सार्वजनिक जीवनात पुन्हा एकदा नाट्यमय पुनरागमन झालं आहे.
अलीना यांनी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी याच क्षणाची निवड का केली आहे? त्यांच्या या निर्णयातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या यांच्या मर्जीतील आणि त्यांच्यावर निकटवर्तीयांमधील असणाऱ्या लोकांच्या खास हितसंबंधांबाबत आपल्याला काय माहिती मिळते?


अलीना यांच्या संस्थेचं वेगळं अस्तित्व
ब्रिक्स गेम्स ही क्रीडा स्पर्धा दरवर्षी ब्रिक्स (BRICS) संघटनेच्या सदस्य देशांकडून आयोजित केली जाते. गेल्या वर्षी कझानमध्ये झालेल्या ब्रिक्स गेम्समध्ये रशिया, बेलारुस, कझाकस्तान, थायलंड, सर्बिया आणि इतर देशांमधील जिम्नॅस्टबरोबर 'स्काय ग्रेस' या क्लबचे खेळाडू देखील होते.
विशेष म्हणजे स्काय ग्रेसच्या खेळाडूंनी रशियन संघातून या स्पर्धेत भाग घेण्याऐवजी स्वतंत्र संस्थेच्या माध्यमातून भाग घेतला.
हा क्लब फक्त दोनच वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. मात्र तरीदेखील स्काय ग्रेस या क्लबला जी विशेष वर्तणूक देण्यात आली त्यामागचं कारण सांगता येणं कठीण नाही. ते कारण म्हणजे या क्लबच्या संस्थापिका आणि प्रमुख अलीना काबेवा.
अलीना रशियातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांनी ऑलिंपिक आणि इतर जागतिक स्पर्धांमधून जिम्नॅस्टिक्समध्ये अनेक पदकं मिळवली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या नावाची कीर्ती ही त्यांच्या खेळातील कामगिरीपेक्षा त्यांच्या व्लादिमीर पुतिन यांच्याशी असलेल्या कथित संबंधांवर जास्त केंद्रित झाली आहे. असं म्हटलं जातं की अलीना या पुतिन यांच्या लहान मुलांची आई आहेत.
'ऑटम' या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात असा दावा करण्यात आला होता की पुतिन आणि अलीना या जोडप्याला दोन मुलं आहेत.
2022 मध्ये अमेरिका, युके आणि युरोपियन युनियन यांनी पुतिन यांच्याबरोबरच्या घनिष्ठ संबंधांमुळे अलीना काबेवा यांच्यावर निर्बंध घातले होते. अर्थात पुतिन यांनी स्वत: मात्र अलीना यांच्याबरोबरच्या संबंधांबाबत दुजोरा दिलेला नाही.
त्याउलट 2008 मध्ये दोघांचं लग्न जवळपास निश्चित असल्याच्या अफवांना उत्तर देताना पुतिन म्हणाले होते की "ज्यांना चांगलं सुचत नाही आणि जे लोक इतरांच्या आयुष्यात लक्ष घालतात आणि त्यांच्याबद्दल कल्पनारंजन करतात अशा लोकांबद्दल ते नेहमीच वाईट विचार करतात."
पुतिन यांच्या जवळच्या लोकांचं रशियातील विशेष स्थान
पुतिन यांच्या खासगी आयुष्यबद्दल चर्चा करणे हे रशियामध्ये पूर्णपणे निषिद्ध मानलं जातं.
मारिया वोरोंत्सोवा आणि कतरिना तिखोनोवा या पुतिन यांच्या दोन कथित मुली अनुक्रमे एका चांगला नफा कमावणाऱ्या वैद्यकीय संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक आणि मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये 1.7 अब्ज डॉलरच्या विकास प्रकल्पाच्या प्रमुख आहेत.
येवगेनी पुतिन हे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे चुलत भाऊ आहेत. अॅना त्सिविलयेवा या येवगेनी पुतिन यांची मुलगी असल्याचं मानलं जातं. रशियन सरकारमध्ये अॅना संरक्षण उपमंत्री पदावर पोहोचल्या आहेत. पेशानं त्या मानसोपचारतज्ज्ञ आहेत.
पुतिन किंवा संबंधित महिला यांनी कधीही त्यांच्या कौटुंबिक संबंधांबाबत या तिघांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या तिघांनाही प्राधान्याची वागणूक दिल्याचा, अर्थसंकल्पात इतरांपेक्षा त्यांना अधिक झुकतं माप दिल्याचा आणि सर्वसामान्य रशियन लोकांच्या वाट्याला न येणारी वेगानं पुढे जाणारी करिअरचा फायदा होत असल्याचं दिसून येतं.
त्यामुळेच 2015 मध्ये जेव्हा अलीना काबेवा यांनी पुतिन यांच्या बाळाला जन्म दिल्याच्या वृत्तांना स्पष्टपणे नाकारण्यात आलं तेव्हा त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र तरीदेखील, 2007 मध्ये जिम्नॅस्ट खेळाडच्या कारकिर्दीतून निवृत्त झाल्यानंतर अलीना काबेवा यांची रशियातील उच्चभ्रू वर्गातील उच्चपदस्थांमध्ये झपाट्यानं उदय झाला. त्या सात वर्षे रशियन संसदेच्या सदस्या होत्या.
त्यानंतर त्या नॅशनल मीडिया ग्रुपच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी होत्या. नॅशनल मीडिया ग्रुप पुतिन यांचे जवळचे सहकारी असलेल्या युरी कोवालचुक यांच्या मालकीचा आहे.
महत्त्वाच्या पदांवर राहूनदेखील सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहण्याचं, वावरण्याचं अलीना टाळत असत. त्या नेहमीच पडद्यामागे किंवा प्रसिद्धीपासून दूर राहायच्या आणि प्रसारमाध्यमांसमोर जवळपास कधीही येत नव्हत्या.
सेलिब्रिटींवर लिहिणाऱ्या, त्यांचे फोटो छापणाऱ्या चमकदार मासिकांनी अलीना यांचं वर्णन मासिकातील कथेसाठी 'जवळपास अशक्य' विषय असं केलं होतं.
मात्र रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर 2022 च्या शरद ऋतूत यासंदर्भातील परिस्थिती अचानक बदलली. काबेवा यांनी 'स्काय ग्रेस' संस्थेची स्थापना केल्याची घोषणा केली. ही लयबद्ध जिम्नॅस्टिक्स क्लब्सची आंतरराष्ट्रीय असोसिएशन आहे.
त्यानंतर थोड्याच कालावधीत, रशियातील सोची शहरात पुतिन यांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या सिरियस शैक्षणिक केंद्रातील ब्लॅक सी रिसोर्टमध्ये स्काय ग्रेस अकाडमी उघडण्यात आली.

या बातम्याही वाचा:

स्काय ग्रेसवर विशेष मर्जी
मार्च 2023 मध्ये या नव्या जिम्नॅस्टिक्स शाळेला गॅझप्रॉम (Gazprom) या कंपनीनं दोन अब्ज रुबल्स (2.04 कोटी डॉलर) पेक्षा अधिक किंमतीची इमारत भेट म्हणून दिली. गॅझप्रॉम ही रशियन सरकारची नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.
रशियातील इतर कोणत्याही क्रीडा क्लब किंवा संघटनेला हेवा वाटावा असा दर्जा काबेवा यांच्या नव्यानंच स्थापन झालेल्या जिम्नॅस्टिक्स संस्थेला आहे.
काबेवा यांची जिम्नॅस्टिक्स संस्था त्यांच्या स्वत:च्या सोयीनुसार वेळापत्रक ठरवू आणि मंजूर करू शकते. तसंच त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेतील नियम देखील ठरवू किंवा निवडू शकते.
लयबद्ध जिम्नॅस्टिक्ससाठी रशिया किंवा परदेशात स्थापित करण्यात आलेल्या नियमांपेक्षा हे नियम वेगळे असू शकतात. तसंच अलीना यांची संस्था स्वतंत्रपणे त्यांच्या इच्छेनुसार पुरस्कार देखील देऊ शकते. या सर्व बाबतीत देखील अलीना यांची स्काय ग्रेस रशियातील इतर क्रीडा क्लबमध्ये एकमेव आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"स्काय ग्रेस ही संस्था स्वतंत्ररीत्या काम करते, या संस्थेनी एक स्वतंत्र खेळ तयार केला आहे, ज्याचे स्वत:चे वेगळे नियम आहेत. ही संस्था त्या नियमांनुसार खेळांच्या स्पर्धांचं आयोजन करते. त्या 'खेळाच्या' आधारे खेळाडूंना पुरस्कार दिले जातात," अशी माहिती काबेवा यांनी भाग घेतलेल्या जिम्नॅस्टिक्स स्पर्धांचं वार्तांकन केलेल्या एका पत्रकारानं दिली. या पत्रकारानं नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
"दुसऱ्या शब्दात, काबेवा ज्या जिम्नॅस्टिक्स खेळासाठी प्रसिद्ध आहेत, त्या खेळाव्यतिरिक्त त्यांनी एक समांतर खेळ शोधून काढला आहे. तो खेळ फक्त त्यांच्या संस्थेतच अस्तित्वात आहे," असं त्या पत्रकारानं सांगितलं.
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, काबेवा यांच्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी युरोपमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये भाग घेतला. अलीना यांचा क्लब तटस्थ संस्था म्हणून स्पर्धेत भाग घेत असला तरी रशियावर निर्बंध घातल्यानंतर अशा प्रकारे भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती.
विशेष म्हणजे रशियातील इतर कोणत्याही क्लबमधील जिम्नॅस्टिक्स खेळाडूंना याप्रकारची संधी देण्यात आलेली नाही.
त्यामुळे पाश्चात्य देशांनी निर्बंध घातलेल्या अलीना काबेवा यांनी अचानक लोकांचं लक्ष वेधून घेतलं. रशियातील प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं. विशेषकरून ज्या कोवालचुक कंपनीच्या त्या पूर्वी अध्यक्ष होत्या त्या कंपनीच्या मालकीच्या प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणलं.
लाईट्स, कॅमेरा...अॅक्शन
स्काय ग्रेस या सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रीय होत चालल्या आहेत. स्काय ग्रेस संस्थेचं टेलीग्राम या सोशल मीडिया व्यासपीठावर खात्यावर काबेवा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे डझनावारी व्हिडिओ आहेत.
हे व्हिडिओ अशाप्रकारे चित्रीत करण्यात आले जणूकाही अलीना काबेवा यांना त्यांचं चित्रण करणाऱ्या कॅमेऱ्याची माहितीच नव्हती. अलीना यांचं चित्रीकरण होतं आहे, याची त्यांना माहिती नसण्याची शक्यता जवळपास नाहीच, असं आम्ही ज्या क्रीडा पत्रकाराशी बोललो त्यांनी सांगितलं.
अलीना काबेवा यांचा कॅमेऱ्यासमोरील वावर, त्याचं सादरीकरण हे खूपच काळजीपूर्वक, बारकाईनं निर्माण केलं जातं, असं त्या पत्रकारानं सांगितलं.
"अलीना यांच्या परवानगीशिवाय आणि माहितीशिवाय त्यांचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाईन दिसत नाही. त्यांचा व्हिडिओ कोणीतरी इतक्या गुप्तपणे तयार करून आणि नंतर तो पोस्ट करणं अजिबात शक्य नाही," असं त्या पत्रकारानं मला सांगितलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, "व्हीडिओ तयार करताना कॅमेराचा अँगल काय असावा, तिथली प्रकाशयोजना कशी असावी, त्यांच्या मेकअपमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे की नाही या सर्व गोष्टी अलीना यांच्या परवानगीनंच होतात."

फोटो स्रोत, Getty Images
मग अलीना यांनी त्यांची पार्श्वभूमी सोडण्याचा आणि प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा निर्णय अचानक का घेतला? याबाबत काहीही निश्चित सांगता येणं शक्य नाही. मात्र अलीना काबेवा यांचं लोकांसमोर येणं, पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येणं आणि रशिया-युक्रेन युद्ध, तसंच रशियावर लादले गेलेले निर्बंध या दोन्ही गोष्टी एकाचवेळी झाल्या आहेत.
त्याचवेळी, मारिया वोरोंत्सोवा आणि कतरिना तिखोनोवा या पुतिन यांच्या दोन कथित मुली गेल्या वर्षी सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये उपस्थित राहिल्या होत्या. असं करून त्यांनी लोकांसमोर येणं किंवा प्रसिद्धीच्या झोतात राहणं यासंदर्भातील त्यांची नापसंती किंवा अनिच्छा कमी करण्यास सुरुवात केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यापासून सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट फोरममधील परदेशी पाहुण्यांची उपस्थिती कमी झाली आहे. मात्र तरीदेखील या कार्यक्रमाचं महत्त्व, व्लादिमीर पुतिन यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून असलेल्या अधिकारांचं प्रदर्शन आणि रशियातील संभाव्य लाभार्थींसाठीचं आकर्षण म्हणून राहिलं आहे.
यासंदर्भात स्वतंत्र प्रसारमाध्यमांनी केलेलं काम आणि या लोकांवर आधीच निर्बंध घालण्यात आल्यामुळे, त्यांची ओळख लपवण्याचं किंवा ते गुप्त ठेवण्याचं आता कोणतंही ठोस कारण राहिलेलं नाही.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
रशिया-युक्रेन युद्धाचा एक परिणाम म्हणजे रशियातील या नेपोटिझम किंवा घराणेशाहीवरील पडदा दूर झाला आहे. तसंच रशियातील उच्चभ्रू वर्गावरील नियंत्रणदेखील कमी झालं आहे.
पूर्वीसारखी आता गुप्तता राखणं तितकंच महत्त्वाचं राहिलेलं नाही, तसं शक्यही नाही आणि किंबहुना या वर्गातील लोकांची तशी आता इच्छादेखील नाही. पुतिन यांच्या इतर कथित नातेवाईकांसह काबेवा यांना देखील त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा असण्याची शक्यता आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी असलेली त्यांची जवळीक म्हणजे अशा प्रकारच्या महत्त्वाकांक्षा असलेल्या लोकांचं लक्ष ते अपरिहार्यपणे आकर्षित करतील.

फोटो स्रोत, Getty Images
अलीना काबेवा आता त्यांच्या जिम्नॅस्टिक्स संस्थेच्या वाढीवर लक्ष केंद्रित करत आहेत. स्काय ग्रेस या संस्थेला आता आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून पुढे आणलं जात आहे.
नोव्हेंबर महिन्यात कतारमध्ये एक मोठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अलीना काबेवा या स्वत: त्या स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत होत्या.
रशियातील प्रसारमाध्यमांमध्ये या स्पर्धेची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली, त्यावर चर्चा झाली. रशियातील प्रमुख क्रीडा वृत्तवाहिनीनं अगदी त्यांचे प्रमुख समालोचक देखील स्पर्धेच्या ठिकाणी पाठवले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











