इस्रायल-हमासमध्ये करार, उत्तर गाझात आपल्या घरी परतले हजारो पॅलेस्टिनी

फोटो स्रोत, Reuters
इस्रायल आणि हमास यांच्यात करार पूर्ण झाल्यानंतर उत्तर गाझातील आपल्या घरी हजारो पॅलेस्टिनी परतले आहेत. याआधी इस्रायलने हमासवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हजारो पॅलेस्टिनींचे आपल्या घरी परतणे रखडले होते. पण आता हा करार पूर्ण झाल्यानंतर आता हे लोक आपल्या घरी परतताना दिसत आहेत.
इस्रायली नागरिकांची हमासकडून सुटका करण्यात आल्यानंतर हा करार पूर्ण गेला.
याआधी, हमासनं शनिवारी (25 जानेवारी) इस्रायलच्या चार महिला सैनिकांची सुटका केली होती.
7 ऑक्टोबर 2023 ला हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.
उत्तर गाझात परतण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागली आहे.


दक्षिण गाझातून उत्तर गाझाकडे जी वाहने जात आहेत ती अत्यंत सावकाश जात आहेत. हमासच्या सुरक्षा रक्षकांकडून या वाहनांची कडक तपासणी होत आहे. 300 मीटर्स अंतरावर चेकपोस्ट्स आहेत.
दर 40 मिनिटांमध्ये 20 वाहने तपासली जात आहेत आणि मगच त्यांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.
रेड क्रॉसच्या टीम, अमेरिकन आणि इजिप्शियन अधिकारी देखील यावेळी उपस्थित आहेत. तर इस्रायली सेना एका अंतरावरुन या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
'हा तर माझा पुनर्जन्मच'
उत्तर गाझात परतत असणाऱ्या एका महिलेनी सांगितले की मला असे वाटत आहे की "हा माझा पुनर्जन्मच आहे. मी माझ्या घरी परत जात आहे, हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. माझ्या मातृभूमीत परतताना मला खूप आनंद होत आहे."

फोटो स्रोत, Reuters
"ईश्वराचे आभार आहेत, हे खरं आहे की आम्ही खूप थकलो आहोत पण शेवटी आमचा विजय झाला. आमच्या योद्धांचे आभार आणि ईश्वराचे आभार आहेत, हा माझा पुनर्जन्मच आहे आणि आम्ही पुन्हा जिंकलो आहोत," असं या महिलेनी रॉयटर्सला म्हटले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











