रशियाचा युक्रेनवरील विद्युत केंद्रांवर हल्ला, 10 लाखांहून अधिक लोकांचा वीज पुरवठा खंडित

फोटो स्रोत, Getty Images
रशियाने युक्रेनच्या विद्युत केंद्रांवर हल्ला चढवल्यानंतर अंदाजे 10 लाखांहून अधिक लोकांवर विजेचे संकट कोसळले आहे.
रशियाने युक्रेनमधील विद्युत यंत्रणेला लक्ष्य केले असून त्यावर जोरदार हल्ले चढवण्यात येत आहे. रशियाने नियोजनपूर्वक हे हल्ले केले. क्षेपणास्त्रांचे मारा अनेक तासांसाठी चालल्यानंतर युक्रेनमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
संपूर्ण देशभरातील विद्युत केंद्राना लक्ष्य करण्यात येत असल्याचे युक्रेनने सांगितले. युक्रेनचे ऊर्जा मंत्री हर्मन हालुश्चेंको यांनी म्हटले आहे की युक्रेनचे विद्युत क्षेत्र पुन्हा एकदा हल्ल्यांचे लक्ष्य झाले आहे.
युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हचे महापौर विटाली क्लिटस्कोंनी सांगितले मोठ्या प्रमाणात झालेल्या हल्ल्याचा एअर डिफेन्स सिस्टमने प्रतिकार केला जात आहे.
या महिन्यात या प्रकारचा हा दुसरा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीने या हल्ल्याबाबत माहिती देताना म्हटले की पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांवर हे हल्ले चढवण्यात आले आहेत.


रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटले की रशियाने 90 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सने हल्ले चढवले आहेत. युक्रेनने युके आणि अमेरिकेकडून घेतलेल्या शस्त्रास्त्रांचा हल्ला रशियावर केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हे हल्ले केल्याचे पुतिन यांनी म्हटले आहे.
आम्ही नियोजनपूर्वक युक्रेनच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करत आहोत, त्यात युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हच्या महत्त्वपूर्ण राजकीय केंद्रांचाही समावेश असेल असा इशारा पुतिन यांनी दिला. रशियाचे नवीन क्षेपणास्त्र ओरेश्निकने हा हल्ला केला जाईल असे पुतिन म्हणाले.
मागील आठवड्यात झाला होता मोठा हल्ला
गेल्या आठवड्यात रशियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राने हल्ला केला होता असे युक्रेनने म्हटले होते. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनमधील निप्रो शहरावर हल्ला केला होता.
रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाने युक्रेनवर आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. ही क्षेपणास्त्रं हजारो किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात असं संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
रशियाने डागलेली सहा केएच-101 क्रूझ क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा देखील युक्रेनच्या लष्कराने केला होता.
अमेरिकेनी युक्रेनला रशियाविरोधात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियाने हा हल्ला करण्यात आला होता.
युक्रेनचा रशियावर अमेरिकन क्षेपणास्त्रांनी हल्ला
तर त्या आधी, 19 नोव्हेंबरला रशियाने सांगितले होते की अमेरिकेनी दिलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेननी रशियावर हल्ला केला.
रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितले होते की युक्रेनने ब्रियांस्क प्रांतात लांबपल्ल्याची आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टिमच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यातली पाच क्षेपणास्त्रं निकामी करण्यात आली तर एक फुटण्यास अपयशी ठरलं.
या क्षेपणास्त्रांमुळे लष्करी तळांवर आग लागली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











