रशियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा

युक्रेन

फोटो स्रोत, STATE EMERGENCY SERVICE OF UKRAINE

फोटो कॅप्शन, रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अग्निशमन दल एका निवासी इमारतीतील आगीशी लढा देत आहे
    • Author, जेना मून आणि बार्बरा टाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

युक्रेनच्या हवाई संरक्षण दलाने रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या हवाईदलाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या दिशेने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी (इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल) हल्ला केल्याचं म्हटलं आहे.

रशियाने मात्र या हल्ल्याबाबत काहीही भाष्य केलं नाही.

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेने एका निवासी इमारतीला आग लागल्याचे आणि अपंग लोकांसाठी पुनर्वसन केंद्राचे नुकसान दाखवणारे फोटो शेअर केले आहेत.

युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या निप्रो (Dnipro) शहराच्या दिशेने हा हल्ला केला आहे. या हल्ल्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची मिसाईल्स वापरल्याची माहिती आहे.

रशिया युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाने युक्रेनवर आयसीबीएम क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. ही क्षेपणास्त्रं हजारो किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात.

रशियाने डागलेली सहा केएच-101 क्रूझ क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा देखील युक्रेनच्या लष्कराने केला आहे. अमेरिकेनी युक्रेनला रशियाविरोधात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी रशियाने हा हल्ला केला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अमेरिकेने एटीएसीएमएस (ATACMS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवरील निर्बंध हटवले.

रशियाने असा दावा केला होता की युक्रेनने मागच्या आठवड्यात कथितरित्या रशियाच्या लष्करी तळांवर याच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला केला होता.

क्राइव्ही रीह शहरावर झालेल्या हल्ल्यात किमान 15 जण जखमी

युक्रेनच्या निप्रॉपेट्रोव्स्कचे प्रादेशिक प्रमुख सेरी लिसाक यांनी दिलेल्या माहितीनुसार क्राइव्ही रीह शहरावर झालेल्या हल्ल्यात किमान 15 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये 16 आणि 17 वर्षं वयाची दोन किशोरवयीन मुलं आहेत. सध्या नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची परिस्थिती मात्र कुणालाही माहिती नाही.

रशियाने हल्ल्याबाबत काहीही भाष्य केलं नाही

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी आज सकाळी रशियाने युक्रेनवर इंटरकॉन्टिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याच्या बातम्यांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ठिकाणी आग दिसत आहे

फोटो स्रोत, STATE EMERGENCY SERVICE OF UKRAINE

फोटो कॅप्शन, क्षेपणास्त्र हल्ल्याच्या ठिकाणी आग दिसत आहे

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनातही या हल्ल्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीने युकेने बनवलेली दोन शॅडो क्रूझ क्षेपणास्त्रं पाडल्याचा दावा केला आहे. रशियाच्या मंत्रालयाने या मिसाईल्स नेमक्या कुठे आणि कधी पाडल्या याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

युक्रेनचं निप्रो शहर स्फोटांनी हादरलं

आज (21 ऑक्टोबर) पहाटे पाचच्या सुमारास निप्रो शहर स्फोटांच्या मालिकेने हादरले. त्यानंतरचे सुमारे तीन तास असे स्फोट होत होते.

या शहरात राहणाऱ्या नागरिकांना क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या आवाजाची सवय आहे. यापैकी अनेकांना हवेतच निकामी केलं जातं.

पण आज सकाळच्या हल्ल्यात रशियाने इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईलचा वापर करून हल्ला केला आणि ही मिसाईल पहिल्यांदाच वापरली गेल्याची माहिती आहे.

युक्रेन

फोटो स्रोत, STATE EMERGENCY SERVICE OF UKRAINE

लष्करातल्या सूत्रांनी बीबीसीला सांगितलं की, ही क्षेपणास्त्रं सहा हजार मैलांपर्यंत मारा करू शकतात. यासोबतच अनेक शस्त्र वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असते. कॅस्पियन समुद्राच्या जवळ असलेल्या अस्त्रखान येथून हे मिसाईल्स डागण्यात आले होते.

इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल म्हणजे काय?

बॅलिस्टिक मिसाईल्समध्ये प्रक्षेपणाच्या ठिकाणापासून हजारो किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाची क्षमता असते. बॅलिस्टिक मिसाईल्सचे एकूण चार प्रकार असतात.

शॉर्ट रेंज (लघु पल्ल्याची), मिडीयम रेंज (मध्यम पल्ल्याची), इंटरमिजिएट रेंज आणि लॉन्ग रेंज (लांब पल्ल्याची) मिसाईल्स.

लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल सर्वाधिक दूरवर हल्ला करू शकतात. ही क्षेपणास्त्रं जिथून डागली गेली आहेत त्या ठिकाणापासून तब्बल 5 हजार 500 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकतात.

इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक

फोटो स्रोत, Getty Images

क्रूझ मिसाईल आणि बॅलिस्टिक मिसाईल हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. क्रूझ मिसाईल डागण्यासाठी जेट विमानांमध्ये वापरलं जाणारं इंजिन वापरलं जातं. युक्रेनने रशियावर केलेल्या कथित हल्ल्यासाठी युकेने युक्रेनला दिलेली क्रूझ क्षेपणास्त्रं वापरल्याचा माहिती आहे.

ही क्षेपणास्त्रं कमी अंतरावर हल्ला करतात पण त्यांचं लक्ष्य निर्धारित करता येतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.