रशियावर हल्ला करण्याचा युक्रेनचा मार्ग मोकळा, बायडन सरकारचा मोठा निर्णय

फोटो स्रोत, White Sands Missile Range
- Author, पॉल ॲडम्स, कॅथरीन आर्मस्ट्राँग
- Role, बीबीसी न्यूज
अमेरिकेनी युक्रेनला रशियाविरोधात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली आहे. याआधी, अमेरिकेनी युक्रेनला लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पुरवले होते. मात्र त्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरोधातील युद्धात वापर करण्यावर निर्बंध होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या परवानगीनंतर त्याचा वापर करण्याचा युक्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे.
अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला याबाबत माहिती दिली.
मागील अनेक महिन्यांपासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की एटीएसीएमएस (ATACMS) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांवरील निर्बंध हटवण्याचा आग्रह करत होते. युक्रेनला या क्षेपणास्त्रांचा वापर रशियावर हल्ला करण्यासाठी करायचा आहे.
याबाबतच्या वृत्तांवर बोलताना रविवारी झेलेन्स्की म्हणाले की, अशा गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत. क्षेपणास्त्रे यांचं उत्तर स्वतः देतात.
दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पाश्चिमात्य देशांना असा निर्णय घेण्याबाबत इशारा दिला होता. असं काही झालं तर हा नाटो सैन्याचा युक्रेन युद्धात थेट सहभाग मानला जाईल असं पुतिन यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेने युक्रेनला क्षेपणास्त्रांच्या वापराला परवागनी दिल्याच्या वृत्तांवर पुतिन यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रशियाच्या इतर नेत्यांनी या निर्णयाला गंभीर म्हटलं आहे.
असं असलं तरी अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी केवळ कुर्स्क प्रदेशासाठी दिली आहे. याच भागात रशियाने ऑगस्टमध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे या भागात युक्रेनच्या सैन्याला ही क्षेपणास्त्रे वापरता येतील.

फोटो स्रोत, EPA
भविष्यात रशिया आणि युक्रेनमध्ये होणाऱ्या संभाव्य वाटाघाटीत उपयोग व्हावा म्हणून बायडन सरकारने युक्रेनला रशियाच्या काही भागावरील ताबा कायम ठेवण्यासाठी मदत करण्याचंही आश्वासन दिलंय.
बायडन यांनी युक्रेनसाठी खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया कीवमधील युक्रेनियन सेक्युरिटी अँड कोऑपरेशन सेंटरचे प्रमुख सेर्ही कुझान यांनी बीबीसीला दिली.
"यामुळे युद्धाची दिशाच बदलेल असं नाही. मात्र, यामुळे युक्रेनचे सैन्य रशियाच्या बरोबरीचे होईल," असं सेर्ही कुझान यांनी म्हटलं.


अमेरिकेने युक्रेनला दिलेले एटीएसीएमएस क्षेपणास्त्रे 300 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात.
एका अमेरिकेच्या अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टला सांगितले आहे की, बायडन सरकारने युक्रेनला लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा निर्णय हा उत्तर कोरियाच्या सैनिकांना युक्रेनमध्ये लढण्याची परवानगी देण्याच्या रशियाच्या निर्णयाला दिलेली प्रतिक्रिया आहे.
सेर्ही कुझान म्हणाले की, रशियाच्या कुर्स्क भागातून युक्रेनियन सैन्याला हुसकावण्यासाठी रशिया आणि कोरियाच्या सैन्याकडून होणाऱ्या अपेक्षित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बायडन यांनी हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांमध्ये रशिया आणि कोरियाकडून या भागात मोठे हल्ले अपेक्षित आहेत.
कुर्स्कमध्ये 11,000 उत्तर कोरियाचे सैनिक असल्याचा अंदाज युक्रेनने व्यक्त केला होता.
बायडन यांच्या या निर्णयामुळे आता अखेर ब्रिटन आणि फ्रान्सचाही युक्रेनला लांब पल्ल्याचे स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युक्रेनकडून या क्षेपणास्त्रांचा वापर रशियाच्या अंतर्गत भागात हल्ल्यासाठी होऊ शकतो.
असं असलं तरी बायडन यांच्या या निर्णयावर यूके आणि फ्रान्सने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
युक्रेनने पूर्व भागातील रशियाच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी पहिल्यांदाच अमेरिकेच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. त्याला झेलेन्स्की यांनी मागील महिन्यात दुजोरा दिला होता.
मागील अनेक महिन्यांपासून युक्रेन रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या रशियाचे सैनिक युक्रेनच्या पूर्वेकडील डोनेस्तक भागात पोकरोव्स्क या प्रमुख शहराकडे आगेकूच करत आहे. हे शहर युक्रेनच्या सैन्यासाठी एक प्रमुख पुरवठा केंद्र आहे.
रशियाने युक्रेनवर ड्रोन हल्ल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. युक्रेनच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरमध्ये 2,000 हून अधिक ड्रोन लाँच करण्यात आले होते. आतापर्यंतच्या युद्धात वापरलेली ही ड्रोनची विक्रमी संख्या आहे.
शनिवारी रात्री रशियाने महिन्याभरातील सर्वात मोठा हल्ला केला. यात 10 लोकांचा मृत्यू झाला. झेलेन्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात जवळपास 120 क्षेपणास्त्र आणि 90 ड्रोनचा वापर करण्यात आला.
रविवारी सायंकाळीही हल्ले सुरूच होते. रशियाच्या सीमेजवळ सुमी प्रदेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ले झाल्याने दोन मुलांसह आणखी 8 जणांचा मृत्यू झाला.
ब्रायन्स्कच्या सीमावर्ती भागातील रशियन अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री युक्रेनकडून ड्रोन हल्ला झाल्याची माहिती दिली. तसेच रशियाने युक्रेनचे 26 ड्रोन पाडल्याचंही नमूद केलं.
दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून युक्रेनने त्यांच्या मित्र राष्ट्रांकडून स्वतःच्या बचावासाठी पुरेसा पाठिंबा मिळत नसल्याचं म्हटलं होतं.
जो बायडन यांच्या सरकारचा जानेवारीमध्ये कार्यकाळ संपत आहे. या पार्श्वभूमीवर बायडन प्रशासन युक्रेनला दिल्या जाणाऱ्या मदतीचा वेग वाढवत आहे.
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आगामी काळात अमेरिकेकडून युक्रेनला दिली जाणारी मदत कमी करू शकतात किंवा थांबवू शकतात, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिका युक्रेनला देत असलेली मदत अमेरिकेच्या संसाधनांचा अपव्यय असल्याचंही म्हटलं होतं. तसेच निवडून आल्यानंतर युद्ध संपवू असंही नमूद केलेलं. मात्र ते हे युद्ध कसं थांबवणार याबद्दल त्यांनी काहीही स्पष्ट मत व्यक्त केलं नव्हतं.
अमेरिका युक्रेनचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश आहे. जर्मन संशोधन संस्था कील इन्स्टिट्यूट फॉर द वर्ल्ड इकॉनॉमीनुसार, या युद्धाची सुरुवात झाल्यापासून जून 2024 च्या अखेरपर्यंत अमेरिकेने युक्रेनला 55.5 बिलियन अमेरिकन डॉलर (55.5 अब्ज डॉलर) किमतीची शस्त्रे आणि उपकरणे पुरवली आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











