रशियाचा चेर्नोबिल अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला, झेलेन्स्की काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ॲलेक्स बॉयड
- Role, बीबीसी न्यूज
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्याची चर्चा सुरू असतानाच युक्रेनच्या चेर्नोबिल अणूऊर्जा प्रकल्पावर रशियानं हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियन ड्रोन हल्ल्यामुळे चेर्नोबिल अणूऊर्जा प्रकल्पातील खराब झालेल्या रिअक्टरच्या वरील रेडिएशन शेल्टरचं नुकसान झालं आहे. हा हल्ला रात्री झाला आहे. यामुळे आग लागली असून ती विझवण्याचं काम सुरू आहे.
शुक्रवारी सकाळपर्यंत रेडीएशनच्या पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही, असं झेलेन्स्की म्हणाले.
रात्री झालेल्या स्फोटानंतर काही मिनिटांतच अग्निशमन दल आणि वाहनं घटनास्थळी पोहोचली. या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, असं आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सी (IAEA) ने सांगितलं.
2022 मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून रशियाचा अमेरिकेसह अन्य पाश्चात्य देशांसोबत तणाव वाढला होता.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी दावा केलाय की रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
2024 नोव्हेंबरमध्ये काय झालं होतं?
रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार ड्रोन हल्ले सुरू आहेत. युद्ध सुरू झाल्यापासूनचे हे सर्वात मोठे ड्रोन हल्ले आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने एकूण 84 युक्रेनियन ड्रोनवर कारवाई केली आहे. यातील काही ड्रोन रशियाचे राजधानी मॉस्कोकडे जात होते. या पार्श्वभूमीवर मॉस्कोच्या तीन प्रमुख विमानतळांवरील विमानांच्या उड्डाणात बदल करण्यात आला.

फोटो स्रोत, Reuters
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने शनिवारी (9 नोव्हेंबर) रात्री युक्रेनच्या प्रत्येक भागाकडे 145 ड्रोन सोडले. त्यापैकी बहुतेक ड्रोन पाडण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत जिंकल्यानंतर आता रशिया आणि युक्रेनवर युद्ध संपवण्याचा दबाव वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले होत आहेत.
युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वांत मोठा हल्ला होता. मॉस्कोच्या गव्हर्नरनेही या हल्ल्याला मोठा हल्ला म्हटलं होतं.
युक्रेनकडून आलेले बहुतेक ड्रोन रामेंस्कोये, कोलोम्ना आणि डोमोडेडोवो जिल्ह्यात पाडण्यात आले, अशी माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली.

फोटो स्रोत, Reuters
मॉस्कोच्या नैऋत्येला असलेल्या रामेन्सकोये येथे ड्रोनचे अवशेष पडून पाच जण जखमी झाले आणि चार घरांना आग लागली. रामेन्सकोये शहरात 34 ड्रोन पाडण्यात आले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
सप्टेंबरमध्ये रामेंस्कोयेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. मॉस्को शहरात अनेक ड्रोन हल्ले झाले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात मध्य मॉस्कोमधील क्रेमलिनजवळ दोन ड्रोन नष्ट करण्यात आले होते.
युक्रेनमधील ओडेसा भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते. या हल्ल्यांच्या फोटोंमध्ये काही इमारतींमध्ये आग लागून नुकसान झाल्याचंही दिसलं.


युक्रेनच्या हवाई दलाने सांगितलं की, रशियाचे 62 इराण निर्मित ड्रोन पाडण्यात आले, तर 67 ड्रोन हरवले. याशिवाय आणखी 10 ड्रोन युक्रेनचे हवाई क्षेत्र सोडून, शेजारील बेलारूस आणि मोल्दोव्हाकडे परत जात आहेत.
एएफपी न्यूज एजन्सीच्या इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर डेटानुसार, मार्च 2022 पासून ऑक्टोबरपर्यंत रशियन सैन्याने युक्रेनच्या सर्वात मोठ्या भागावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे हे ड्रोन हल्ले होत आहेत.
युनायटेड किंग्डमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सर टोनी रडकिन यांनी बीबीसीच्या संडे विथ लॉरा कुएन्सबर्ग कार्यक्रमात सांगितले की, युद्ध सुरू झाल्यापासून रशियाला सर्वाधिक नुकसान सहन करावं लागलं आहे.
ऑक्टोबरमध्ये रशियाच्या सैन्यातील दररोज सरासरी 1,500 जणांना युद्धाचा फटका बसला. यात कुणाचा मृत्यू झाला, तर कुणी जखमी झालं, असंही रडकिन यांनी नमूद केलं.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आता ट्रम्प रशिया युक्रेन युद्धावर काय भूमिका घेणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारात वारंवार निवडून आल्यावर एका दिवसात युद्ध संपवू, असं वक्तव्य केलं होतं. मात्र, हे युद्ध कसं थांबवणार याचे तपशील त्यांनी दिले नाही.
ट्रम्प यांचे माजी सल्लागार ब्रायन लॅन्झा यांनी बीबीसीला सांगितले की, आगामी ट्रम्प प्रशासन रशियाने अतिक्रमण केलेला भूभाग पुन्हा युक्रेनला मिळवून देण्याऐवजी शांतता प्रस्थापित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
यावर ट्रम्प यांच्या प्रवक्त्यांनी या धोरणापासून दूर राहणं पसंत केलं. लॅन्झा हे ट्रम्प यांच्यावतीने बोलण्यास अधिकृत व्यक्ती नाहीत, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी रविवारी सरकारी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अमेरिकेच्या प्रशासनाकडून सकारात्मक संकेत मिळत असल्याचं म्हटलं.

पेस्कोव्ह यांनी दावा केला की, ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात रशियाच्या पराभवाची इच्छा नसून शांतता हवी असल्याचं म्हटलं आहे.
अध्यक्षीय निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी बीबीसीला दिली.
झेलेन्स्की यांनी यापूर्वीच रशियाला जमीन देण्याला विरोध करत इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेच्या मदतीशिवाय युक्रेन युद्ध हरेल, असंही नमूद केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











