युक्रेनच्या सैनिकांना वाचवतेय ही 'कँडी', ती नेमकी कशी काम करतेय?

प्लास्टिक 'कँडी'

फोटो स्रोत, SERGEY FLASH

फोटो कॅप्शन, प्रत्येक युक्रेनियन सैनिकाला हवीहवीशी वाटणारी प्लास्टिक 'कँडी'
    • Author, ओलीग चरनीश
    • Role, बीबीसी युक्रेन

जर युक्रेनच्या कोणत्याही सैनिकाला तुम्ही विचारलं की, "तुला युद्धावर जाण्याआधी काय हवं आहे?" तर प्रत्येक सैनिक त्याला 'कँडी' हवी आहे असंच म्हणेल.

युक्रेनच्या सैनिकांना हवीहवीशी वाटणारी ही 'कँडी' म्हणजे एखादं चॉकलेट, टॉफी किंवा एखादा गोड पदार्थ नसून, सैनिकांच्या हातात बसू शकणाऱ्या एका छोट्या प्लास्टिक बॉक्सला कँडी असं म्हटलं जातं. या बॉक्समध्ये एक स्क्रीन असते आणि त्याला एक अँटेना देखील जोडलेला असतो.

या उपकरणाचं नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी यामुळे युक्रेनच्या सैनिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रत्येक सैनिकाला युद्धभूमीवर जाण्याआधी हे उपकरण खरेदी करायचं आहे, यासाठी ते कितीही किंमत मोजायला तयार आहेत. हे छोटंसं उपकरण 'ड्रोन डिटेक्टर' म्हणून काम करतं.

केवळ ड्रोनसाठी म्हणजे मानवरहित विमानांसाठी बनवण्यात आलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युक्रेनचे शेकडो सैनिक 'कँडी' कुठे मिळेल याची चौकशी करत आहेत. युक्रेनियन भाषेत या उपकरणाला सुकोरोक असं म्हणतात.

युक्रेनच्या हद्दीत रशियाकडून हेरगिरीसाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याने या उपकरणाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. रशियाकडून विमान, हवाई संरक्षण प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या गंभीर लक्ष्यांवर मारा करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जातो.

यामुळे अशा परिस्थितीत, युक्रेनच्या सैनिकांना त्यांच्या डोक्यावर उडणारी वस्तू रशियाचा ड्रोन तर नाही ना याची खात्री करणं खूप महत्त्वाचं आहे.

कँडी हे उपकरण नेमकं तेच करायला मदत करतं.

ड्रोन डिटेक्टर कशासाठी वापरतात?

युद्धाच्या आघाडीवर ड्रोन डिटेक्टर तुम्हाला जिवंत ठेवू शकतो.

कँडीच्या मदतीने ड्रोन हल्ल्याची पूर्वकल्पना मिळू शकते. ज्या परिसरात सैनिक आहेत तिथे जर एखादा ड्रोन असेल तर तात्काळ सैनिकांना त्याची सूचना देऊन मार्ग बदलण्यास सांगितलं जाऊ शकतं. तसेच एखाद्या ड्रोनने एखाद्या वाहनाला लक्ष्य केलं असेल तर हल्ला होण्यापूर्वीच त्या वाहनात बसलेल्या लोकांना ताबडतोब बाहेर काढण्याची सूचना या ड्रोन डिटेक्टरच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते.

निकोलाय कोलेस्निक हे युक्रेनियन सैन्याच्या मानवरहित हवाई वाहनांच्या (UAV) बटालियनचे कमांडर आहेत. त्यांनी स्वतःही अशाच परिस्थितीचा सामना केला आहे.

ड्रोन

फोटो स्रोत, GENERAL STAFF OF UKRAINE

फोटो कॅप्शन, ड्रोन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

निकोलाय कोलेस्निक सांगतात की, एकदा ते त्यांच्या तुकडीसह आघाडीवर जात होते. मुख्य मोर्चापासून 7 किलोमीटर दूर असताना गाडीत ठेवलेली 'कँडी' सिग्नल देऊ लागली.

कोलेस्निक म्हणतात की, "लॅन्सेट या रशियन ड्रोनने वाहनावर हल्ला करण्याच्या काही सेकंद आधी ते त्यांच्या कारमधून उडी मारून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. यानंतर काही वेळातच दुसरा ड्रोन येऊन धडकला. या हल्ल्याने आम्ही हादरलो होतो पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यातून आमचा जीव वाचवू शकलो."

अशा प्रकारचं उपकरण हे प्रत्येक सैनिकाकडे आणि लष्करातल्या प्रत्येक वाहनात असायला हवं असं निकोलाय यांना वाटतं.

लष्करी रेडिओ तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ आणि सल्लागार सर्गेई बेस्क्रेस्टनॉफ म्हणतात की, "कँडी हे एक आदर्श उपकरण नाही, परंतु युक्रेनियन सैन्यासाठी हा एक सोपा आणि स्वस्त उपाय आहे."

बीबीसी युक्रेन सर्व्हिसशी बोलताना ते म्हणाले की, "लष्कराला ड्रोन डिटेक्टर पुरविण्याचे प्रकरण बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे आणि आता युक्रेनच्या सशस्त्र दलाचा पाठलाग करण्यासाठी रशियन ड्रोन सीमेच्या आत येऊ लागले आहेत. जर एखादा 'विंग' (विमानासारखा दिसणारा ड्रोन) तुमच्या डोक्यावर बराच काळ घिरट्या घालत असेल तर तुमच्यावर हल्ल्याचा अंदाज आला पाहिजे.

"रशियाने याच पद्धतीचा वापर करून युक्रेनच्या पॅट्रियट लॉन्चरवर हल्ला केला आणि त्याचप्रमाणे झापोरोझ्ये येथील एका गावात युक्रेनच्या हेलिकॉप्टर आणि 128 व्या ब्रिगेडच्या सैनिकांवरही हल्ला झाला."

बेस्क्रेस्टनॉफ यांच्या मते, गुप्तचर ड्रोन दिसल्यास काय करावे याचे काही ठराविक नियम आहेत.

शत्रूच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी या उपकरणाची गरज भासू लागली आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK MYKOLA KOLESNYK

फोटो कॅप्शन, शत्रूच्या ड्रोनचा सामना करण्यासाठी या उपकरणाची गरज भासू लागली आहे.

उदाहरणार्थ, युद्धात आघाडीवर असणाऱ्या सैनिकाला ड्रोन दिसला, तर त्याने ताबडतोब त्याच्या हालचाली थांबवाव्यात. याउलट, लष्करी उपकरणे घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने आपला वेग वाढवला पाहिजे जेणेकरून क्षेपणास्त्र त्याला लक्ष्य करू शकणार नाहीत.

त्याचप्रमाणे, जर कँडीवर परिसरात एखादा ड्रोन असल्याची माहिती मिळाली तर सैनिकांनी त्यांचे वाहन सोडून पळून जावे आणि लहान ड्रोन दिसल्यास सैनिकाने एकतर लपून बसावे किंवा ड्रोन पाडण्याचा प्रयत्न करावा.

कॉम्प्लेक्स स्पेक्ट्रम मॉनिटर (पूर्वसूचना देणारं अधिक गुंतागुंतीचं यंत्रं) सामान्य सैनिकांसाठी योग्य नाही असे बेस्क्रेस्टनॉफ यांचे मत आहे. त्यांना 'कँडी' सारखे साधे उपकरण हवे आहे जे शत्रूचे ड्रोन जवळ आल्यावर वाजायला लागते.

बेस्क्रेस्टनॉफ म्हणतात की, "सैनिकांना एक सोपा पर्याय हवा आहे. जर 'कँडी' वाजायला लागलं तर याचा अर्थ काही धोका आहे, जर ती वाजली नाही तर याचा अर्थ सर्वकाही ठीक आहे, एवढं सांगणारं एक साधं उपकरण सैनिकांकडे असायला हवं."

'कँडी' असं विचित्र नाव का पडलं?

'कँडी'चा शोध दिमित्री सेलन नावाच्या युक्रेनियन प्रोग्रामरने लावला होता. तो अनेक दिवसांपासून लंडनमध्ये राहत आहे.

युद्ध उपकरणांच्या जगात ड्रोन डिटेक्टर ही एक सामान्य गोष्ट मानली जाते.

सामान्यत: हा एक मोठा आणि महागडा स्पेक्ट्रोमीटर असतो जो फ्रिक्वेंसीचे विश्लेषण करून ड्रोनची उपस्थिती ओळखतो, परंतु सामान्य सैनिकासाठी युद्ध परिस्थितीत त्याचा वापर करणे हे सोपं काम नाही.

दिमित्री सेलन म्हणतात की, "ड्रोन डिटेक्टर हे एक साधं आणि स्वस्त उपकरण असायला हवं. जेणेकरून प्रत्येक सैनिक त्याच्याजवळ कँडी ठेवू शकेल आणि सहजपणे त्याचा वापरही करू शकेल."

दिमित्री सेलिन

फोटो स्रोत, UNIT.CITY

फोटो कॅप्शन, दिमित्री सेलिन

'कँडी'चा पहिला प्रोटोटाइप 2022 मध्ये तयार करण्यात आला होता.

सेलन म्हणतात की, त्यांनी अगदी अचानक या उपकरणाला 'कँडी' हे नाव दिलं. ते म्हणतात की, "पहिल्या प्रोटोटाइपसाठी, मी एक सामान्य बॉक्स शोधत होतो. मला यासाठी साखरेचा प्लास्टिक बॉक्स अगदी योग्य वाटला."

याच बॉक्सवरून हे नाव पडलं आहे.

सेलन म्हणतात की युक्रेनियन सैनिकांमध्ये हे डिटेक्टर थोड्याच काळात लोकप्रिय झालं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर येऊ लागल्या.

'कँडी'चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे उपकरण अगदी साधं आहे आणि स्वस्त आहे. सध्या ड्रोन डिटेक्टरची किंमत 2400 रेवेनया (युक्रेनचं चलन) इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत सुमारे पाच हजार रुपये एवढी होते.

'कँडी' कसं काम करतं?

'कँडी'ची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. प्रत्येक ड्रोन आणि तो ड्रोन हाताळणाऱ्या ऑपरेटरकडे असणारा कन्सोल हे एका विशिष्ट रेडिओ लहरींचा वापर करून संवाद साधतात.

ऑपरेटरकडे असणाऱ्या रिमोट कंट्रोलद्वारे, ड्रोनची दिशा ठरवता येते. ड्रोनमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्याद्वारे ऑपरेटरला व्हिडिओ आणि टेलिमेट्री सिग्नल मिळत असतात त्यातून ड्रोन नेमका कुठे आहे हे कळतं.

दिमित्री सेलन यांच्यामते, व्हिडिओ आणि टेलिमेट्री दोन्ही प्रवाह किंवा त्यापैकी किमान एक सहज पकडता येऊ शकतात कारण हे सिग्नल सर्व दिशांना प्रसारित होत असतात.

"म्हणून आम्ही ऑपरेटरच्या कन्सोलवर असलेला रिसीव्हर वापरतो आणि जर आम्ही सिग्नलचे पॅरामीटर्स योग्यरित्या निवडले तर आम्ही ते सहजपणे पकडू शकतो," असं त्यांनी सांगितलं.

'कँडी'चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी साधं आणि स्वस्त आहे.

फोटो स्रोत, FACEBOOK YURI BIRIUKOV

दिमित्री म्हणाले की, सिग्नल पॅरामीटर्स केवळ फ्रिक्वेन्सीवर आधारित नसतात तर आणखी तीन सिग्नल देखील समाविष्ट करतात. त्या पॅरामीटर्सच्या आधारे, कोणत्या प्रकारचा ड्रोन आहे हे कळू शकतं."

युक्रेनच्या लष्कराला काही विशिष्ट रेडिओ फ्रिक्वेन्सीची माहिती आहे, काही ठराविक पॅरामीटर्स त्यांच्याकडे आहेत ज्याद्वारे त्यांना येणारा रशियन ड्रोन नेमका कोणता आहे हे शोधता येतं. ऑर्लन, एलरॉन, झाला आणि सुपरकॅम सारखे हेरगिरी करणारे ड्रोन रशियाकडून वापरले जातात.

या माहितीच्या आधारे, डिटेक्टरला कोणता ड्रोन लॅन्सेट कामिकाझे ड्रोन आहे आणि कोणता लहान चायनीज मॅव्हेक्स आहे हे कळतं.

'कँडी'ला एफपीओ ड्रोन ओळखण्यात अडचणी येतात हे सेलन यांनी कबूल केलं.

'कँडी' हे ड्रोन स्पष्टपणे शोधू शकत नाही. याशिवाय आणखी एक समस्या आहे, ती म्हणजे आता असे सर्व फर्स्ट पर्सन ड्रोन कमी फ्रिक्वेन्सीवर चालत आहेत. म्हणजे ड्रोन शोधण्यासाठी त्यांना विशेष अँटेना लागेल.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBC/LEE DURANT

फोटो कॅप्शन, सैनिक

सेलन म्हणतात की, अनुभवी ड्रोन ऑपरेटर जेव्हा त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचतात तेव्हा टेलीमेट्री सिग्नल बंद करतात, ज्यामुळे डिटेक्टर त्यांची उपस्थिती ओळखत नाहीत.

पण सेलन म्हणतात की युक्रेनियन अभियंते हे अडथळे दूर करण्यासाठी कामाला लागले आहेत.

दिमित्री सेलन कबूल करतात की त्यांनी शोधलेलं हे उपकरण परिपूर्ण नाही.

पण प्रत्येक सैनिकाजवळ त्यांचं हे उपकरण असायलाच हवं असं त्यांना वाटतं का?

तर यावर बोलताना ते म्हणतात की, "प्रत्येक सैनिकाला खिशात बसू शकणारं हे ड्रोन डिटेक्टर हवं आहे."

सेलना म्हणतात की, "तुम्ही घोडा आणि कारचे उदाहरण घ्या. सध्या 'कँडी' हा घोडा आहे, पण पुढे चालून ही कार झाली तर प्रत्येकासाठी चांगलं होईल. 'कँडी'ला 'कार' बनवण्यासाठी आता आणखीन फक्त दोन सुधारणा करण्याची गरज आहे. त्या सुधारणा झाल्यानंतर कँडी कोणत्याही ड्रोनला ओळखण्याचं आव्हान अगदी सहज पेलू शकेल."