'पाच महिन्यांपूर्वी 100 सैनिकांच्या तुकडीत भरती झालो होतो, आज त्यातले 38 जणच जिवंत'

- Author, ओल्गा इवशिना आणि बेकी डेल किर्स्टी ब्र्यूवर
- Role, बीबीसी रशियन सेवा
रशिया-युक्रेन संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात दोन्ही बाजूचे प्रचंड नुकसान होते आहे. खासकरून सैनिकांना जीव गमवावा लागतो आहे. मृत्यूमुखी पडलेल्या रशियन सैनिकांची संख्या मोठी आहे. त्याचाच हा आढावा.
युक्रेनमधील युद्धात रशियाचे 50,000 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. बीबीसीने या वृत्ताची खातरजमा केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे नंतरच्या 12 महिन्यात युद्धभूमीवर मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 25 टक्क्यांनी जास्त असल्याचं आम्हाला आढळून आलं आहे.
फेबुवारी 2022 पासून बीबीसी, मीडियाझोना हा स्वतंत्र मीडिया समूह आणि स्वयंसेवक रशिया-युक्रेन युद्धात मृत्यूमुखी पडणाऱ्या सैनिकांच्या संख्येची नोंद ठेवत आहेत.
दफनभूमीतील नव्या कबरींच्या संख्येमुळे अनेक सैनिकांच्या नावांची माहिती मिळण्यास मदत होते आहे.
वृत्तपत्रे, सोशल मीडिया आणि अहवालांमधून ओपन सोर्सद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या टीमने मृत सैनिकांसंदर्भातील माहितीची छाननी केली आहे.
युक्रेन युद्धाच्या दुसऱ्या वर्षात 27,300 पेक्षा अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आमच्या तपासातून हाती आलेल्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या जमिनीवर कब्जा करताना मानवी जीवाची प्रचंड किंमत मोजली आहे.
यावर काही बोलण्यास रशियाने नकार दिला आहे.
ज्या पद्धतीने युक्रेनच्या फौजांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या ठिकाणांना तोफांच्या निशाणावर आणण्यासाठी रशिया सीमेवर अविरतपणे सैनिकांच्या लाटा पाठवत आहे, त्याला 'मीट ग्राईंडर' या संकल्पनेनं संबोधण्यात येतं आहे. याचा अर्थ मानवी जीवाचा विनाश करणारी यंत्रणा असा होता.
या युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रशियन सैनिकांची संख्या 50,000 पेक्षा अधिक आहे. रशियन सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये मृत सैनिकांची जी अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध केली होती त्याच्या ही संख्या आठपट आहे.
मृत रशियन सैनिकांचा आकडा प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक असण्याचीच शक्यता आहे.
आमच्या विश्लेषणात पूर्व युक्रेनमधील डोनेस्क आणि लुहांस्क येथील युद्धात मरण पावलेल्या सैनिकांचा समावेश नाही. जर ही संख्यादेखील लक्षात घेतली तर मृत्यूमुखी पडलेल्या रशियन सैनिकांची संख्या खूपच जास्त असेल.
दरम्यान युक्रेनदेकील युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या आकडेवारीबद्दल क्वचितच माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की म्हणाले होते की युद्धात युक्रेनच्या 31,000 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अमेरिकेतील गुप्तहेर संस्थांच्या माहितीच्या आधारे प्रत्यक्षातील संख्या खूपच जास्त आहे.
सैनिकांच्या लाटेचे डावपेच
बीबीसी आणि मीडियाझोना यांच्या मृत सैनिकांसंदर्भातील ताज्या यादीत रशियाने युद्धभूमीवर अवलंबलेल्या डावपेचांमुळे मोठी जीवितहानी झाली आहे.
पुढे दिलेला आलेख दाखवतो की युक्रेनच्या डोनेस्क प्रांतात युद्धभूमीवर मोठी आघाडी उघडल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये रशियन लष्कराला मोठ्या जीवितहानीला तोंड द्यावे लागले आहे.
इन्स्टिट्युट फॉर द स्टडी ऑफ वॉरच्या माहितीनुसार, वुहलेडर शहरासाठी लढत असताना रशियन सैन्याने युद्धआघाडीवर मानवी लाटांचा हल्ला करण्याचे डावपेच अवलंबले होते.
आव्हानात्मक भूरचना, हल्ला करण्याची अपुरी क्षमता आणि युक्रेनच्या सैन्याला धक्का देण्यात आलेलं अपयश, यामुळे रशियन सैन्याला फारशी मजल मारता आली नाही मात्र प्रचंड जीवितहानीला तोंड द्यावे लागले.
2023 च्या वसंत ऋतूमध्ये मनुष्यहानीत झालेली लक्षणीय वाढ आलेखात दिसून येते आहे. बख्तमुट शहर ताब्यात घेण्याच्या लढाईत वॅग्नर या कंत्राटी सेनेने रशियाला मदत केली होती. त्यादरम्यान ही जीवितहानी झाली आहे.
येवगेनी प्रिगोझिन या वॅग्नर प्रमुखाने त्यावेळेस त्याच्या सैन्यातून 22,000 सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
मागील शरद ऋतूत पूर्व युक्रेनमधील अवडिवका हे शहर ताब्यात घेताना रशियन सैन्याला मोठ्या जीवितहानीला तोंड द्यावे लागले होते.
दफनभूमीतील मोजदाद
युक्रेन युद्धाची सुरूवात झाल्यापासून बीबीसी आणि मीडियाझोनाबरोबर काम करणारे स्वयंसेवक रशियातील 70 दफनभूमींमधील नवीन लष्करी कबरींची मोजदाद करत आहेत.
आकाशातून घेतलेल्या छायाचित्रांमधून दफनभूमींचा लक्षणीय विस्तार झाला असल्याचे दिसून येते.
उदाहरणार्थ मॉस्कोच्या आग्नयेला असणाऱ्या राझानमधील बोगोरोड्सकोये दफनभूमीची छायाचित्रे दाखवतात की एक संपूर्ण नवीन भाग अस्तित्वात आला आहे.
जमिनीची छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवतात की बहुतांश नवीन कबरी युक्रेन युद्धात मारले गेलेल्या अधिकारी आणि सैनिकांच्या आहेत

रशियाच्या पाचपैकी दोन मृत सैनिकांचा या युद्धाआधी रशियाच्या लष्कराशी कोणताही संबंध नसल्याचा बीबीसीचा अंदाज आहे.
2022 मध्ये युद्धाच्या सुरूवातीला गुंतागुंतीच्या लढायांमध्ये रशियाने नियमित सैनिकांचा वापर केला होता, असे रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचे सॅम्युएल क्रेनी-इव्हान्स सांगतात.
मात्र त्या अनुभवी सैनिकांमधील बहुतांश आता एक तर मरण पावले आहेत किंवा जखमी झाले आहेत. त्यांच्याजागी थोडेसे प्रशिक्षण घेतलेले किंवा किरकोळ लष्करी अनुभव असलेले लोक आले आहेत. ज्यामध्ये स्वयंसेवक, नागरिक आणि कैंद्याचा समावेश आहे, असे त्यांनी पुढे सांगितलं.
जी गोष्ट नियमित सैनिक करू शकतात ती गोष्ट हे लोक करू शकत नाहीत. याचा अर्थ नव्याने आलेल्या या सैनिकांना तुलनेने सोपे डावपेच वापरावे लागत आहेत. बहुतांश वेळा ते तोफांच्या भडीमाराच्या साहाय्याने युक्रेनच्या तळांवर हल्ला करत आहेत, असे क्रेनी-ईव्हान्स यांनी सांगितलं.
वॅग्नर विरुद्ध संरक्षण मंत्रालय
रशियन लष्कराच्या सैनिकांच्या लाटा पाठवण्याच्या डावपेचांसाठी कैद्यांमधून तयार केलेले सैनिक खूप महत्त्वाचे आहेत. बीबीसीच्या विश्लेषणानुसार युद्धभूमीवर हे सैनिक फार लवकर मरण पावत आहेत.
येवगेनी प्रिगोझिनला कैद्यांमधून सैनिकभरती करण्यासाठी रशियाने जून 2022 मध्ये परवानगी दिली होती. कैंद्यांचे सैनिकात रुपांतर झालेले हे लोक रशियन सरकारच्या वतीने लढणाऱ्या एका खासगी सैन्याचा भाग बनून लढले होते.
अविरतपणे लढण्याच्या डावपेचांसाठी वॅग्नर प्रसिद्ध आहे. त्यांची अंतर्गत शिस्तदेखील खूप क्रूर असते. परवानगीशिवाय माघार घेणाऱ्या सैनिकांना ते जागच्या जागी ठार करतात.
फेब्रुवारी 2023 पर्यत वॅग्नर ग्रुपने कैंद्यांमधून सैनिकभरती करणे सुरू ठेवले होतं. त्यावेळेस त्यांचे रशियन सरकारची उत्तम संबंध होते. तेव्हापासून रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने हेच धोरण पुढे सुरू ठेवले आहे.
प्रिगोझिन यांनी मागील वर्षी जून महिन्यात रशियन लष्कराविरुद्ध एक बंड केलं होतं. प्रिगोझिन यांनी मॉस्कोवर चाल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हे बंड यशस्वी झालं नव्हतं. त्यांना माघार घ्यावी लागली होती. ऑगस्ट महिन्यात प्रिगोझिन यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

युद्ध आघाडीवर मरण पावलेल्या 9,000 रशियन कैंद्याच्या नावावर आमचं ताज्या विश्लेषणात भर देण्यात आला आहे.
त्यांच्यापैकी 1,000 पेक्षा अधिक कैद्यांची लष्कराबरोबरचा करार सुरू होण्याची तारीख आणि ते मरण पावल्याची तारीख याबाबत आम्ही खातरजमा केली आहे.
आम्हाला असं आढळून आलं की वॅग्नर ग्रुपमध्ये काम करणारे कैदी सरासरी तीन महिन्याचा कालावधी जिवंत राहिले होते.
तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने भरती केलेले कैदी सरासरी फक्त दोन महिन्यांचा कालावधी जिवंत राहिले होते.
रशियन संरक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या युनिट्सला स्टॉर्म प्लॅटून म्हणतात. यामध्ये गुन्ह्यांसाठी शिक्षा ठोठावण्यात आलेले कैदी असतात.
त्याचप्रमाणे वॅग्नर ग्रुपमधील तुकड्या आहेत. त्यांना आवश्यकता भासेल तेव्हा युद्धात वापरले जाते.
स्टॉर्म प्लॅटूनमधील सैनिकांसोबत लढलेल्या एका नियमित रशियन सैनिकाने मागील वर्षी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं होतं की ''स्टॉर्म सैनिक हे फक्त बळीचा बकरा आहेत.''
अवडिवका शहर ताब्यात घेण्यासाठी कित्येक महिने चाललेल्या लढाईत स्टॉर्म सैनिक महत्त्वाचे ठरले होते.
आठ आठवड्यापूर्वीच हे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे. पुतिनसाठी हा विजय बख्तमुट नंतरचा सर्वात महत्त्वाचा आणि सांकेतिक विजय ठरला आहे.
कैद्यांची थेट रवानगी युद्धभूमीवर
वॅग्नरच्या ग्रुपच्या नेतृत्वाखाली कैद्यांना लढाईच्या मैदानात पाठवण्याआधी फक्त एक दिवसाचं प्रशिक्षण दिलं जात होतं.
संरक्षण मंत्रालयाने भरती केलेले काही कैदी कंत्राटावर सही केल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यातच युद्धभूमीवर मारले गेल्याचं आम्हाला आढळून आलं.
मारले गेलेल्या आणि जिवंत असणाऱ्या कैद्यांच्या कुटुंबियांशी बीबीसीने संवाद साधला. त्यांनी आम्हाला सांगितलं की संरक्षण मंत्रालयाकडून कैंद्यांना सैनिक भरती करताना दिलं जात असलेलं लष्करी प्रशिक्षण पुरेसं नाही.
एका विधवा महिलेने आम्हाला सांगितलं की तिच्या पतीने संरक्षण मंत्रालयाबरोबरच्या करारावर मागील वर्षी 8 एप्रिलला सही केली होती आणि त्यानंतर फक्त दिवसात तो युद्धभूमीवर लढत होता.

''मला खात्री आहे की ते काही आठवड्यांच्या प्रशिक्षणाबद्दल ते बोलले होते आणि एप्रिलअखेरीसपर्यत काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं त्यांनी सांगितलं होतं.''
ती महिला म्हणाली, ती पतीची वाट पाहत होती. मात्र तिला कळलं की 21 एप्रिललाच तिचा पती मारला गेला आहे.
आणखी एक महिला म्हणाली की तिचा मुलगा युद्धात लढताना मारला गेला. त्याच्या मृत्यूची बातमी देण्यासाठी ती आपल्या पतीशी संपर्क करू पाहत असताना तिला कळलं की तुरुंगात असणाऱ्या तिच्या पतीलादेखील युद्धभूमीवर नेण्यात आलं आहे.
एक महिला जिला आम्ही अलफिया म्हणतो, ती सांगते की वादिम हा तिचा 25 वर्षांचा मुलगा दोन जुळ्या मुलांचा बाप होता. त्याला युद्धभूमीत नेण्यापूर्वी त्याने कधीही शस्त्र हातात धरलं नव्हतं.
ती म्हणते, ती तिच्या पतीला, अॅलेक्झांडरला, त्यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी देऊ शकली नाही. कारण त्याला युद्धात लढण्यासाठी तुरुंगातूनच नेण्यात आलं होतं. आणखी एका कैद्यानं फोनवरून सांगितल्यावर तिला ही बाब कळली होती.
अलफिया सांगते, ''अॅलेक्झाडंर युक्रेनमध्येच वाढले होते. तिथं त्यांचं कुटुंब आहे. त्याला या गोष्टीची कल्पना होती की फॅसिझमशी लढण्यासाठी रशिया युक्रेनवर हल्ला करतो ही गोष्ट खोटी होती. पहिल्यांदा जेव्हा सैनिक भरतीसाठी लष्कराचे लोक तुरुंगात आले होते तेव्हा अॅलेक्झांडरनं त्यांना विरोध केला होता.''
मुलाच्या मृत्यूनंतर सात महिन्यांनी अलफियाला कळवण्यात आलं की अॅलेक्झांडरदेखील मारला गेला आहे.
'मरणासाठी तयार रहा'
वॅग्नर ग्रुपसाठी काम करताना कैद्यांशी सर्वसाधारणपणं सहा महिन्यांचा करार केला जातो. जर हे कैदी जिवंत राहिले तर त्यांची तुरुंगातून सुटका केली जाणार असते.
मात्र मागील वर्षीच्या सप्टेंबरपासून संरक्षण मंत्रालयाने भरती केलेल्या कैद्यांना ते मरेपर्यत किंवा युद्ध संपेपर्यत, यातील जे आधी घडेल तोपर्यत लढावे लागणार आहे.
अलीकडेच कैद्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे चांगले युनिफॉर्म आणि बुट मागितल्याची बीबीसीपर्यत पोचली आहे. कैद्यांना योग्य किट, वैद्यकीय साठा आणि अगदी कलाशनिकोव्ह रायफलशिवाय युद्धभूमीत पाठवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
''अनेक सैनिकांकडे युद्धात लढण्यास योग्य नसणाऱ्या बंदूका आहेत,'' असं व्लादिमिर ग्रुबनिक या रशियन युद्धाच्या समर्थक आणि ब्लॉगरने त्याच्या टेलीग्राम चॅनेलवर लिहिलं आहे.
''युद्ध आघाडीवर एखादा सैनिक प्रथमोपचार किटशिवाय काय करणार, खंदक खडण्यासाठी कुदळ आणि एक मोडकी रायफल हे एक मोठं कोडं आहे.''

ग्रुबनिक हा रशियाने ताब्यात घेतलेल्या पूर्व युक्रेनमध्ये राहतो. त्याचं म्हणणं आहे की जेव्हा काही अधिकाऱ्यांना आढळलं की काही बंदूका पूर्णपणे मोडकळीस आलेल्या आहेत. ते अधिकारी म्हणाले की त्या बंदूका बदलून देणं त्यांच्यासाठी अशक्य आहे.
''ती रायफल आधीच त्या व्यक्तीला देण्यात आलेली होती आणि कडक लष्करी नोकरशाही याबद्दल काहीही करणार नाही.''
काही माजी कैद्यांनी सांगितलं की त्यांच्या सहकाऱ्यांना मोठ्या किंमत मोजावी लागली.
''जर तुम्ही आता कंत्राटावर सही केली तर तुम्ही मरणासाठी तयार राहा,'' असं स्टॉर्म प्लॅटूनसाठी असलेल्या एका ऑनलाईन व्यासपीठावर सर्गी म्हणतो. या व्यासपीठावर त्यांच्यासाठी असलेली माहिती दिली जाते.
ऑक्टोबर महिन्यापासून स्टॉर्म तुकडीमध्ये लढत असलेला सर्गी एक कैदी असल्याचं सांगतो.
स्टॉर्म तुकडीचा आणखी एक सदस्य सांगतो की पाच महिन्यांपूर्वी 100 सैनिकांच्या स्टॉर्म प्लॅटूनमध्ये तो भरती झाला होता. आता त्यातील फक्त 38 जिवंत आहेत.
''प्रत्येक लढाई म्हणजे एक पुनर्जन्मच आहे.''











