'कानाला गोळी लागली आणि मी रशियन सैनिकाच्या मृतदेहावर पडलो', फसवणूक झालेल्या तरुणांची कहाणी

प्रिन्स सेबॅस्टियन

फोटो स्रोत, VIVEK R NAIR

फोटो कॅप्शन, प्रिन्स सेबॅस्टियन
    • Author, अश्रफ पदन्ना
    • Role, रिपोर्टर, त्रिवेंद्रम, केरळ

डेव्हिड मूथप्पन यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात फेसबूकवर एक जाहिरात पाहिली. रशियामध्ये सुरक्षारक्षकांच्या नोकरीची ती जाहिरात होती.

जाहिरातीमध्ये 2,04,000 रुबल (2201 डॉलर) एवढा मासिक पगार मिळणार असं सांगण्यात आलं होतं. दक्षिण भारतातील केरळमधील शिक्षण अर्धवट सोडून मच्छिमारी करणाऱ्या तरुणांसाठी हा आकडा प्रचंड मोठा होता.

काही महिन्यांनी 23 वर्षीय मूथप्पन हे प्रत्यक्षात रशियानं ताबा मिळवलेल्या पूर्व युक्रेनमधील दोन्तेस्क शहरात युद्धाच्या मैदानावर रशियाकडून लढत होते.

त्याठिकाणच्या अनुभवाबाबत विचारलं असता, त्यांनी "तिथं सगळीकडं मृत्यू आणि विनाश पसरलेला होता," असं म्हटलं.

त्यांच्यासह आणखी एक जण गेल्या आठवड्यात केरळला परत येण्यात यशस्वी ठरले. गेल्या काही महिन्यांत एजंटकडून अनेकांना फसवून युक्रेन विरोधातील लढाईत रशियाच्या बाजुनं लढण्यासाठी याठिकाणी पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये या दोघांचा समावेश होता.

त्यापैकी काही जणांना घरी परत येण्यात यश आलं, पण अजूनही इतर काहीजण तिथं अडकलेले आहेत. त्यापैकी बहुतांश गरीब कुटुंबांतले आहेत. त्यांना नोकरीचं आमीष दाखवून युद्ध सुरू असलेल्या भागात पाठवण्यात आलं.

काहींना रशियाच्या लष्कराचे सहायक म्हणून पाठवलं जात असल्याचंही सांगण्यात आलं होतं. आतापर्यंत या युद्धात अशा किमान दोन भारतीयांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

फसवणूक करून युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी रशियाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय.

ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी बीबीसीनं रशियाच्या भारतातीलय दूतावासाला ई मेलही केला आहे.

इशारा : लेखातील काही तपशील वाचकांना विचलित करू शकतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मूथप्पन यांना त्यांच्या मासेमारी केल्या जाणाऱ्या पोझियूर गावात परत येऊन हायसं वाटत आहे. पण त्यांनी युद्धात जे काही पाहिलं ते कधीही विसरू शकत नसल्याचंही ते सांगत आहेत.

"तिथं सगळीकडं जमिनीवर शरीराचे अवयव विखुरलेले होते," असंही ते म्हणाले. त्यावेळी ते प्रचंड तणावात होते त्यांना ते पाहून उलटी झाली आणि ते जवळजवळ बेशुद्धही झाले होते.

"नंतर लवकरच रशियाच्या लष्कराचे अधिकारी तिथं आले आणि मला छावणीत परत जायला सांगितलं. मला त्यातून सावरायला अनेक तास लागले," असं ते म्हणाले.

ख्रिसमसच्या आसपासच्या काळात एका निर्जन स्थळी सुरू असलेल्या लढाईत त्यांचा पाय मोडला, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला याबाबत काहीही माहिती नव्हती असंही त्यांनी सांगितलं.

मूथप्पन यांनी अडीच महिने लुहान्स, वोल्गोग्राड आणि रोस्तोव्ह मधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घालवले. त्यानंतर ते त्यातून काही प्रमाणात सावरले.

नंतर मार्च महिन्यात त्यांना काही भारतीयांनी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्यासाठी मदत केली. नंतर त्यांची घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली.

जवळपास 61 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंचुथेंगू या केरळमधील मच्छिमारांच्या दुसऱ्या एका गावात आम्हाला प्रिन्स सेबॅस्टियन भेटले. त्यांचीही कहाणी काहीशी अशीच होती आणि त्याचा त्यांच्यावर प्रचंड आघात झालेला होता.

प्रिन्स सेबॅस्टियन

फोटो स्रोत, VIVEK R NAIR

फोटो कॅप्शन, प्रिन्स सेबॅस्टियन

एका स्थानिक एजंटनं फसवून त्यांना रशियाला पाठवलं होतं. त्यांना युक्रेनमधील पण रशियाच्या ताब्यातील लिसिचान्स्क शहरात इतर 30 जणांबरोबर तैनात करण्यात आलं होतं. अवघ्या तीन आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना शस्त्रांसह युद्धात लढण्यासाठी पाठवण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांना RPG-30(एक रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड लाँचर) आणि बॉम्ब अशी शस्त्रं देण्यात आली होती. पण त्यामुळं त्यांना वेगानं चालताही येत नव्हतं.

युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी एक गोळी टँकवर लागली आणि तिथून उडून त्यांच्या डाव्या कानाला भोक पाडून गेली. ते कशावर तरी खाली कोसळले. तो एका रशियन सैनिकाचा मृतदेह होता.

"प्रचंड धक्का बसल्यामुळं मी स्तब्ध झालो होतो. सुमारे तासाभरानंतर रात्र होऊ लागली तेव्हा आणखी एक बॉम्बस्फोट झाला. त्यामुळं माझा डाव्या पायाला मोठी जखम झाली."

त्याच रक्तबंबाळ अवस्थेत त्यांनी एका दरीत ती रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची सुटका करण्यात आली आणि नंतर त्यांनीही अनेक आठवडे वेगवेगळ्या रुग्णालयांत घालवले.

नंतर त्यांना आराम करण्यासाठी एक महिन्याची सुटी मिळाली. त्यादरम्यान एका पादरींनी भारतीय दुतावासात संपर्क साधण्यासाठी त्यांची मदत केली. दुतावासानं एक तात्पुरता पासपोर्ट देऊन त्यांची घरी परतण्याची सोय करण्यात आली.

त्यांच्यासोबत गेलेले त्यांचे इतर दोन मच्छिमार मित्र अजूनही बेपत्ता असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक आठवड्यांपासून त्यांचा कुणाशाही काहीही संपर्क झालेला नाही.

केरळमधील अधिकाऱ्यांच्या मते, त्यांना आतापर्यंत फसवणूक करून रशियाला नेल्याबाबत चार कुटुंबांकडून तक्रारी मिळाल्या आहेत. त्यात मूथप्पन आणि सेबॅस्टियन यांच्यासह बेपत्ता असलेल्या दोन मित्रांचा समावेश आहे.

सॅबेस्टियन आणि त्यांचे मित्र गावातील एका एजंटकडं गेले होते. युरोपात त्यांना कुठं नोकरी मिळू शकते का? याची चौकशी करायला ते गेले होते असं सेबॅस्टियन म्हणाले. ती व्यक्तीही सध्या फरार आहे.

"एक वेळ तर अशी आली होती की, युक्रेनचे सैनिक 200 मीटर अंतरावर होते. आम्हाला आक्रमक पवित्रा घेण्यास सांगण्यात आलं होतं. पण मी एकही गोळी चालवली नाही. मी कोणाला मारू शकत नाही," असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, VIVEK R NAIR

त्या एजंटनं त्यांना रशियात सुरक्षारक्षकाची नोकरी करण्याची सूवर्णसंधी असल्याचं सांगितलं. त्यामोबदल्यात महिन्याला 2,00,000 रुपये ($2,402) मिळणार असल्याचं समजताच ते लगेचच तयारही झाले.

त्या सगळ्यांनी एजंटला रशियाच्या व्हिसासाठी प्रत्येकी 7 लाख रुपये दिले. 4 जानेवारी रोजी ते मॉस्कोला पोहोचले. त्याठिकाणी अॅलेक्स नावाच्या एजंटनं त्यांचं स्वागत केलं. तो एजंट त्यांच्याच मल्याळम भाषेत बोलत होता.

त्या सर्वांनी ती रात्र एका फ्लॅटमध्ये घालवली. त्यानंतर एका व्यक्तीनं त्यांना जवळपास 336 किलोमीटर अंतरावरील कोस्त्रोमा शहरातील एका लष्करी अधिकाऱ्याकडं नेलं. त्याठिकाणी त्यांनी एका करारावर सह्या केल्या. हा करार रशियन भाषेत होता, त्यामुळं त्यातला मजकूर त्यांना समजला नाही असं सेबॅस्टियन म्हणाले.

त्याठिकाणी श्रीलंकेतील तीन जणही त्यांच्याबरोबर होते. नंतर त्या सहा जणांना युक्रेनच्या सीमेवर असलेल्या रोस्तोव्ह प्रांतातील लष्कराच्या छावणीत नेण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्या सर्वांचे फोन आणि पासपोर्टही घेतले.

त्यांचं प्रशिक्षण 10 जानेवारीला सुरू झालं. त्यानंतरच्या दिवसांत ते अँटिटँक ग्रेनेड कसे हाताळायचे? तसंच जखमी झाल्यानंतर काय करायचं? हे सर्व शिकले.

त्यानंतर त्यांना अल्बिनो पॉलिगॉन नावाच्या दुसऱ्या एका लष्करी तळावर त्या सर्वांना नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना 10 दिवस रात्रं दिवस प्रशिक्षण देण्यात आलं.

"त्याठिकाणी सर्वप्रकारची शस्त्रं आमची वाट पाहत होती. मी खेळण्यांप्रमाणं त्या शस्त्रांबरोबर खेळू लागलो," असंही सेबॅस्टियन यांनी सांगितलं.

पण प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानावर गेल्यानंतर तिथलं क्रूर वास्तव त्यांच्यासमोर आलं.

आता ते पुन्हा मासेमारी सुरू करण्याच्या विचारात आहेत. "मला लोकांकडून घेतलेले कर्जाचे पैसे परत करून पुन्हा पूर्वीप्रमाणं माझं जीवन सुरळीत सुरू करायचं आहे," असंही ते म्हणाले.

पोझियूरमध्ये मूथप्पन यांनाही अशीच आशा आहे.

"मी गेलो तेव्हा माझं एका मुलीशी लग्न ठरलं होतं. मी खूप पैसे घेऊन येईन आणि लग्नापूर्वी घर बांधेन, असं तिला सांगितलं होतं," असं ते म्हणाले.

पण आता मूथप्पन यांना पुन्हा त्यांची गाडी रुळावर आणायची असल्यामुळं त्यांनी आणखी दोन महिने वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

पण किमान युद्धभूमीवर असताना त्यांनी कोणालाही गोळी घालून ठार केलं नाही याचा त्यांना आनंद वाटत आहे.

"एक वेळ तर अशी आली होती की, युक्रेनचे सैनिक 200 मीटर अंतरावर होते. आम्हाला आक्रमक पवित्रा घेण्यास सांगण्यात आलं होतं. पण मी एकही गोळी चालवली नाही. मी कोणाला मारू शकत नाही," असं त्यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)