'युद्धात जखमा झाल्यावर पुन्हा सेक्स करण्याबद्दल शंका होती, पण 'रिसेक्स'मुळे अनेकांना डेट केलं'

RESEX

फोटो स्रोत, RESEX

फोटो कॅप्शन, जाहिरातीत हिल्ब स्ट्रायझको आणि त्याची सहकारी
    • Author, टोबी लखरस्ट
    • Role, कीव्ह, बीबीसी न्यूज

युक्रेनची राजधानी कीव्हमधील एका कार्यालयात एक 26 वर्षांचा तरूण हातात मोबाईल घेऊन एक व्हीडिओ पाहात आहे.

या व्हीडिओमध्ये तो स्वयंपाकघरात एका तरुणीचं अत्यंत उत्कटतेने चुंबन घेताना दिसतो. व्हीडिओमध्ये इतरही काही जोडपी आपल्याला दिसू शकतील.

खरंतर हा व्हीडिओ म्हणजे एक जाहिरात आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात शारीरिक आणि मानसिक आघात सोसावं लागलेल्या माजी सैनिकांसाठीच्या कॅम्पेनची ही जाहिरात आहे.

या माध्यमातून रिसेक्स ही संस्था माजी सैनिकांना त्यांच्या लैंगिक जीवनात मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

स्वयंपाक घरात तरुणीचं अत्यंत जोशाने चुंबन घेणारा हिल्ब स्ट्रायझको व्हीडिओत आनंदात दिसत असला तरी काही दिवसांपर्यंत अत्यंत दुःखी होता.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांचं मारियुपोल बंदर मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालं. त्यावेळी हिल्ब स्ट्रायझको हा तिथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांपैकी एक होता.

रशियाने केलेल्या हल्ल्यात इमारत उद्ध्वस्त झाल्यानंतर तो तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. नंतर खाली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तो अत्यंत वाईटरित्या दबला गेला.

या घटनेत हिल्बच्या कंबरेसह जननेंद्रियाला प्रचंड दुखापत झाली. चेहऱ्यालाही मार बसून जबडा आणि नाक तुटलं. नशीब बलवत्तर म्हणून हिल्ब वाचला पण त्याला रशियाने पकडलं आणि युद्धकैदी म्हणून आपल्या ताब्यात घेतलं.

ukraine
फोटो कॅप्शन, हिल्ब स्ट्रायझको
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यानंतर एका महिन्याने उभय देशांच्या करारानुसार हिल्बला पुन्हा युक्रेनला पाठवण्यात आलं.

पण, या दरम्यान, कैदेत असताना रशियाने आपल्यावर वैद्यकीय उपचार योग्यरित्या केले नाहीत, असं हिल्ब म्हणतो.

हिल्बची सुटका झाल्यानंतर काही दिवसांनी बीबीसीने त्याच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्याच्या पुनर्वसनाच्या वेळीही त्याच्याशी संवाद साधला.

हिल्बचं पुनर्वसन सुरू असतानाच रिसेक्स प्रकल्प चालवणाऱ्या व्हेटरन हब संस्थेने त्याची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकल्पात सहभागी होण्यास सांगितलं.

तो सांगतो, "माझ्या ओटीपोटाला झालेल्या दुखापतीनंतर मला अनेक समस्या आल्या. त्या बऱ्या होण्यास काही वेळ लागला. मी पुन्हा सेक्स करू शकेन की नाही वाटलं होतं, पण रिसेक्समुळे नंतर मी अनेकांना डेट केलं.

"सेक्सबाबत जास्त बोललं जात नाही. पण माझ्याबाबत जे घडलं, ते इतरांसोबत घडावं असं मला वाटत नाही. हीच मी प्रकल्पात भाग घेण्यामागची प्रेरणा होती.

इव्होना कोस्टिना या व्हेटरन हब संस्थेच्या संस्थापकांपैकी एक आहेत.

अमेरिकन सैनिकांच्या समस्यांबाबत वाचल्यानंतर 2018 मध्ये त्यांना रिसेक्स प्रकल्पाची कल्पना सुचली होती, असं त्यांनी सांगितलं.

ukraine
फोटो कॅप्शन, रेसेक्सने महिला आणि पुरुषांसाठी 'डू लव्ह' नावाच्या पुस्तिका छापल्या

प्रकल्पासाठी निधी उभा राहिल्यानंतर त्यांनी सैनिक आणि तज्ज्ञांशी चर्चा करणं सुरू केलं.

त्यांना नेमक्या कशा प्रकारे मदत करता येऊ शकेल, याविषयी त्यांनी जाणून घेतलं.

यासंदर्भात सर्वप्रथम त्यांनी ऑनलाइन स्वरुपात काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

तेव्हा त्यांना लोकांकडून तसंच काही प्रमाणात सैनिकांकडूनही काही कठोर उत्तरे ऐकून घ्यावी लागली.

'लोक मरत आहेत आणि तुम्ही सेक्सबद्दल विचार करत आहात,' अशा स्वरुपाच्या त्या प्रतिक्रिया होत्या.

याशिवाय, सर्वच सैनिकांना लैंगिक जीवनात संघर्ष करावा लागत असेल, हे आपलं गृहितकही चुकीचं असल्याचं त्यांना कळून चुकलं.

इव्होना सांगतात, "काहींच्या बाबतीत काहीच समस्या नव्हत्या. खरं सांगायचं तर त्याचं सेक्स अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू होतं.

मग नेमकी समस्या काय असू शकते याविषयी आम्ही विचार केला.

त्यानंतर, व्हेटरन हब संस्थेने सुमारे 6 हजार पुस्तिका छापल्या. युक्रेनच्या आसपासच्या वैद्यकीय केंद्रांना, सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठवल्या. तसंच ऑनलाइनही उपलब्ध करून दिल्या आहेत.

ukraine
फोटो कॅप्शन, कॅटरिना स्कोरोखोड

त्याशिवाय, रिसेक्सने व्हीडिओ, ग्राफिक्स आणि हेल्पलाईन यांच्यासह सोशल मीडियावर मोहीमही सुरू केली.

यामध्ये हस्तमैथुनापासून ते सेक्स टॉय आणि अगदी मूलभूत लैंगिक धड्यांपर्यंत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इव्होना म्हणतात, "आम्ही सगळ्या बाबी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. या पुस्तिकेमध्ये एक प्रकरण हे विशेषत: व्हर्जिन असलेल्या जखमी सैनिकांसाठी तयार करण्यात आलेलं आहे. कारण त्यांच्यासाठी त्यांचे पहिले लैंगिक संबंध हे जखमेनंतरच प्रस्थापित होणार आहेत. त्यांनी कल्पना केली होती, त्यापेक्षा ते वेगळे असू शकतात."

रिसेक्सच्या प्रोजेक्ट मॅनेजर कॅटरिना स्कोरोखोड म्हणाल्या, "यामध्ये महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र पद्धतीने मार्गदर्शन देण्यात आलं आहे. त्यांच्या शारिरीक क्षमतांनुसारही यामध्ये काही फरक असू शकतो.

पण, या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्या तरी या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भौतिक गोष्टींपेक्षाही भावनिक बाजूंवर जास्त आहे."

कॅटरिना पुढे म्हणतात, "तुम्ही स्वत:ला कसं स्वीकारू शकता, स्वत:वर कसं प्रेम करू शकता, दुखापतींनंतर जोडीदारासोबतचं नातं कसं निर्माण करावं यांच्यासह लैंगिक संबंधांमध्ये घनिष्ठता कशी आणावी याविषयी सांगण्यात आलं आहे."

या प्रकल्पादरम्यान प्रश्नांची उत्तरे मिळवताना सैनिकांच्या उत्तरांमध्ये मतांतरं दिसून आली. त्याच प्रकारे LGBTQ समुदायाकडूनही याबाबत उत्तरं मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागला.

यासोबतच त्यांना काही गोष्टी शिकायलाही मिळाल्या. त्यांच्या लक्षात आलं मानसिक आरोग्याबाबत अजूनही जनजागृतीची गरज आहे. मानसिक आरोग्याचा कामवासना आणि संपूर्ण लैंगिक कार्यक्षमतेवर खूप परिणाम होतो.

युद्धाच्या मानसिक आघातातून गेलेल्या सैनिकांसाठी त्यानंतरचा सेक्स कठीण किंवा वेदनादायी असू शकतो.

इव्होना म्हणतात, "लैंगिकतेवर चर्चा करण्यासाठी वापरली जाणारी भाषादेखील महत्त्वाची आहे. अशा वेळी भडक आणि नाट्यमय भाषा वापरण्याची आवश्यकता नसते."

रिसेक्स प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर हिल्ब स्ट्रायझकोचा दृष्टिकोन बदलला आहे.

तो म्हणतो, "आता मी नक्कीच सकारात्मक आहे. गेल्या वर्षभरात मी अनेकांना डेट केलं. त्या सर्वांचा मी खूप आभारी आहे.

"माझा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी माझा प्रत्येक जोडीदार माझ्यासाठी महत्त्वाचा होता. त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आता माझी एक प्रेयसी आहे. ती माझी एक चांगली जोडीदारही आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.