Chernobyl Disaster : चेर्नोबिल पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा का मानली जाते?

इतिहासातील सर्वांत गंभीर अशा आण्विक दुर्घटना झालेल्या ठिकाणांपैकी चेर्नोबिल ही एक आहे. याठिकाणी 1986 मध्ये चारपैकी एका अणुभट्टीचा स्फोट झाला होता.
1986 मध्ये घडलेल्या अपघातानंतर आजपर्यंत याठिकाणी किरणोत्सर्ग कायम असल्याचं सांगितलं जातं.
सुमारे 31 वर्षांपूर्वी झालेल्या अणुऊर्जा अपघातानंतर किरणोत्साराची भीती असल्यानं चेर्नोबिल शहर मनुष्यविरहित करण्यात आलं होतं.
एकेकाळी चेर्नोबिल हे नाव उच्चारण्याचं टाळलं जात होतं, त्याच्या आसपास जाण्याचाही विचार कोणी करत नव्हतं.
26 एप्रिल 1986ला काय घडलं?
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट चारमध्ये 26 एप्रिल 1986 रोजी मध्यरात्री स्फोट झाला. अणुभट्टी फुटली आणि किरणोत्साराचे ढग आसमंतात पसरले.
आठवडाभरात, कामगार आणि आप्तकालीन पथकातील कर्मचारी असे 30 जण किरणोत्साराची बाधा झाल्यानं दगावले. अख्खं प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.

विखुरलेल्या, होत्या तशाच सोडून दिलेल्या इमारती, बर्फानं झाकल्या गेलेल्या गाड्यांचे बम्पर, पिवळा रंग राखून असलेला आकाश पाळणा या सगळ्या खुणा पाहात आम्ही पुढे आलो. त्या सगळ्या प्रवासात, बालवाडीच्या वसतिगृहात एका गंजलेल्या बेडवर एक बाहुली तशीच पडलेली आहे, ते दृश्य हृदय पिळवटणारं होतं.

सगळ्या नियमांचं पालन केलं तर हा भाग तितका धोकादायक राहिलेला नसल्याचं युक्रेन सरकारमधले पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे मंत्री ओस्ताप सिमिराक यांनी बीबीसीला सांगितलं होतं. "काळजी घेतली नाही तर मात्र प्राणावर बेतेल", असंही त्यांनी म्हटलं होतं.

या अणुभट्टीवर आच्छादन टाकण्याचं काम दहा हजार कामगार सलग चार वर्षं करत होते. त्यामुळे किरणोत्सार नियंत्रणात आणणं शक्य झालं. तेही कामगारांच्या सुरक्षेची सगळी खबरदारी घेऊन, असंही सिमिराक म्हणाले होतं.
यूकेमधील इकॉलॉजी आणि हायड्रॉलॉजी केंद्राचे प्रोफेसर निक बेरेस्फोर्ड यांनीही तिथल्या धोक्याची पातळी नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं होतं.
पुन्हा किरणोत्सर्गाचा धोका?
चेर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरात सुरू असलेल्या संघर्षाच्या धोक्याबाबत शेफिल्ड विद्यापीठातील अणु विषयक तज्ज्ञ प्राध्यापिक क्लेअर कोरखिल यांनी माहिती दिली.
परिसरात दारुगोळा असावा किंवा दारुगोळा असलेली विमानं उडावी यासाठी हे ठिकाण योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या.
"याठिकाणी आण्विक कचरा प्रतिबंधक सुविधा आहेत. 1986 च्या स्फोटात नुकसान झालेल्या अणुभट्टीला झाकणारं आणि सुरक्षा करणारा घुमट याठिकाणी आहे."
या इमारती किरणोत्सर्ग करणारं साहित्य आतच राहावं या दृष्टीनं तयार करण्यात आल्या आहेत. युद्धक्षेत्रासारख्या वापरण्यासाठी त्या तयार केलेल्या नाहीत, असंही त्या म्हणाल्या.
याठिकाणी काही नुकसान झाल्यास किरणोत्सर्गी साहित्य हटवण्याच्या कामामध्ये 30 वर्षे मागे ढकलले जाऊ शकतो. तसंच स्थानिक परिसरात किरणोत्सर्ग पसरण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असंही त्या म्हणाल्या.
व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीत रशियन सैन्यानं चर्नोबिल अणुभट्टीतल्या कर्मचाऱ्यांना बंदी बनवलं असल्याचं म्हटलं आहे. याचा निषेध करत असून, त्यांच्या सुटकेची मागणी अमेरिकेनं केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चेर्नोबिलमध्ये पर्यटन
पण गेल्या काही काळात जगभरातील साहसी, उत्साही पर्यटकांनी चेर्नोबिलकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यातल्या काहींनी तर स्थानिक सरकारी हॉस्टेलमध्ये राहण्याचं धाडसही केलं होतं.
युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्हपासून दोन तासाच्या अंतरावर चेर्नोबिलमधलं 30 किमीचं प्रतिबंधित क्षेत्र आहे. ही पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा मानली जाते. तिथं किरणोत्साराची बाधा होण्याचा धोका असल्यानं लोकांना मर्यादित काळासाठीच थांबता येतं.
पर्यटक या भागात एक किंवा दोन दिवसच असतात. या काळात होणाऱ्या किरणोत्साराचं प्रमाण तुलनेनं कमी असतं. त्याच्यापेक्षा जास्त किरणोत्सार विमान प्रवासात असतो, असा दावा केला जात आहे.
चेर्नोबिल सुरक्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही खूप प्रयत्न झाले. युरोपियन बँक ऑफ रिक्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हल्पमेंट आणि आंतरराष्ट्रीय दात्यांना दिलेल्या निधीतून इथं बरंच काम झालं. त्या प्रकल्पाच्या इमारतीवर टाकण्यात आलेल्या आच्छादनामुळे पुढील 100 वर्षं किरणोत्सार रोखला जाऊ शकतो.
त्या आच्छादनामुळे जुन्या बांधकामाचं आणखी नुकसान रोखलं जाऊ शकेल, असं ईबीआरडीच्या चेर्नोबिल मदत निधीचे प्रमुख सायमन इव्हान्स यांनी सांगितलं. अर्थात त्याच्यामुळे 30 किमी परिघातील किरणोत्सार कमी होईल, असा त्याचा अर्थ नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

किरणोत्साराच्या प्रभावाविषयी मतमतांतरे आहेत. 80 वर्षांचं इव्हान सेमेन्यूक हे या घटनेच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या गावी परतले आणि तिथंच राहात आहेत. ते तिथेच शेती करतात आणि स्वत:पुरतं पिकवतात.
त्या भयानक दिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले, "रात्री स्फोटाचा आवाज झाला. तसे आवाज नेहमीचेच असल्यानं आम्हाला वेगळं काही वाटलं नाही. आता ही जागा राहण्यास एकदम सुरक्षित आहे."

फोटो स्रोत, Getty Images
"पर्यटक इथं येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही भीती बाळगू नका," असं ते आवर्जून सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








