रशिया युक्रेन वाद: युद्धाचा भारतीयांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल?

रूसी सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने पहिल्याच दिवशी 137 जणांचा जीव गेल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. यामध्ये सैनिक आणि सामान्य नागरिकांचा समावेश आहे. युक्रेनच्या संपूर्ण लष्करी यंत्रणेला रशिया लक्ष्य करत असल्याचं सांगण्यात येतंय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. युक्रेनमधली हिंसा थांबवण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना केलं. धोरणात्मक चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत असं पंतप्रधान मोदींनी म्हटल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय.

युक्रेनमध्ये सध्या हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत. या विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात परत आणण्याविषयीची चिंताही पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याकडे व्यक्त केली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचे रशियापासून पाच हजार किलोमीटर्सवर भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांवरही परिणाम होणार आहेत.

भारताचे रशिया व युक्रेन या दोन्ही देशांशी व्यापारी संबंध आहेत आणि अनेक भारतीय नागरीक या देशांमध्ये राहतात. युक्रेनमध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थी म्हणून गेलेले आहेत. तर, रशियामध्ये विद्यार्थ्यांसोबतच नोकरदार भारतीयसुद्धा आहेत.

रशियात राहणारे भारतीय

रशियातील भारतीय दूतावासाच्या म्हणण्यानुसार, रशियात सुमारे 14 हजार भारतीय राहतात. त्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थी वैद्यकीय किंवा इतर काही तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी तिथे गेलेले आहेत.

पुतीन मोदी

फोटो स्रोत, Getty Images

या व्यतिरिक्त रशियात पाचशे भारतीय व्यावसायिक आहेत. ते चहा, कॉफी, तांदूळ, मसाले, इत्यादी वस्तूंशी संबंधित व्यवसाय करतात.

केंद्रीय विद्यालयाशी संलग्न एक शाळासुद्धा रशियात आहेत, तिथला कर्मचारीवर्ग भारतीय आहे. भारतीय दूतावासामध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांची मुलं याच शाळेत शिकतात, तसंच काही स्थानिक विद्यार्थीसुद्धा या शाळेत शिकतात.

युक्रेनमध्ये राहणारे भारतीय

भारतातून युक्रेनला जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्येने विद्यार्थी आहेत. त्यातही जास्तकरून वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तिकडे जाणारे विद्यार्थी आहेत.

अशा विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 18 हजार ते 20 हजार असल्याचं सांगितलं जातं.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये कमी खर्च होतो. त्यामुळे इथले विद्यार्थी तिथे जाऊन शिकण्याचा निर्णय घेतात.

युक्रेन-रशिया यांच्यातील तणावामुळे तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी तातडीचं काम नसेल तर मायदेशात परत यावं, असा सल्ला भारत सरकारने दिला आहे. या दोन्ही देशांमधून 242 प्रवाशांना घेऊन येणारं पहिलं भारतीय विमान मंगळवारी दिल्लीला पोचलं.

या दोन देशांमधील परिस्थिती आणखी बिघडली, तर त्याचा तिथे राहणाऱ्या भारतीयांवर विपरित परिणाम होईल, म्हणून त्यांचे भारतात राहणारे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत.

भयग्रस्त वातावरणात तेलाच्या किंमती भडकल्या

या तणावाचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडण्याची चिंता व्यक्त करण्यात येते आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील तणावाचा परिणाम भारतीय व्यापार क्षेत्रावर अद्याप पडलेला नाही. पण या जागतिक तणावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमती वाढल्या असून ही बाब भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आव्हानात्मक आहे, असं भारताच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सांगितलं.

पेट्रोल पंप

फोटो स्रोत, EPA

मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 93-94 डॉलर इथपर्यंत पोचली होती.

ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ नरेंद्र तनेजा म्हणतात, "भारतात 85 टक्के तेलाची आयात होते. त्यातील बहुतांश तेल सौदी अरेबिया आणि अमेरिका इथून येतं. त्या व्यतिरिक्त इराक, इराण, ओमान, कुवैत व रशिया यांच्याकडूनही भारत तेल विकत घेतो."

"वास्तविक जगात सौदी अरेबिया, रशिया व अमेरिका हे तेलाचे सर्वांत मोठे उत्पादक देश आहेत. जगातील 12 टक्के तेल उत्पादन रशियात, 12 टक्के सौदी अरेबियामध्ये आणि 16-18 टक्के तेल उत्पादन अमेरिकेमध्ये होतं."

"या तीन देशांमधील दोन मोठे देश युद्धजन्य परिस्थिती एकमेकांसमोर उभे ठाकले, तर स्वाभाविकपणे जगभरातील तेलाच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होईल. युद्धाची शक्यताच आत्ताच्या तेलदरामधील वाढीला कारणीभूत आहे," असं तनेजा सांगतात.

ते पुढे म्हणाले, "गेल्या दीड महिन्यात भारतात तेलाचे आणि पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. कदाचित काही राज्यांमधील निवडणुकांमुळे हे झालं असेल. परंतु या दीड महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाची किंमत 15 ते 17 टक्क्यांनी वाढलेली आहे. अशा वेळी भारतात जेव्हा-केव्हा तेलाची नवीन किंमत ठरवली जाईल, तेव्हा त्यात प्रति लीटर सहा ते दहा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे."

एका अंदाजानुसार, कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली की भारतीय अर्थव्यवस्थेवर आठ हजार ते दहा हजार कोटींचा बोजा पडतो. याचा ताण अर्थातच सर्वसामान्य लोकांच्या खिश्यावर येणार.

नैसर्गिक वायूची किंमत

भारतातील एकूण इंधनवापरामध्ये नैसर्गिक वायूचा वाटा सुमारे सहा टक्के आहे, आणि त्यातील 56 टक्के वायू भारत आयात करतो. मुख्यत्वे कतार, रशिया, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे यांसारख्या देशांकडून भारतात नैसर्गिक वायू आयात केला जातो.

रशिया

फोटो स्रोत, Reuters

विहिरींमधून हा वायू काढला जातो, मग त्याचं द्रव्यात रूपांतर केलं जातं, त्यानंतर समुद्रमार्गे हा वायू भारतात येतो. त्यामुळे याला लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) असंही म्हटलं जातं. भारतात आणल्यावर त्याचं रूपांतर पीएनजी किंवा सीएनजीमध्ये केलं जातं. त्यानंतर कारखाने, वीजउत्पादन केंद्र, सीएनजी वाहनं आणि स्वैपाकघर या ठिकाणी त्याचा वापर होतो.

रशिया-युक्रेन तणावामुळे एलएनजीच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. रशिया व पश्चिम युरोप हे नैसर्गिक वायूचे मोठे निर्यातदार देश आहेत. याच क्षेत्रात सर्व पाइपलाइन आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावातून बॉम्बवर्षावर सुरू झाला, तर तेलपुरवठ्यामध्ये अडथळा येऊ शकतो. याच चिंतेमुळे एलएनजीच्या किंमती वाढत आहेत.

इंद्राणी बागची अनंता सेंटरमध्ये सीईओ (डेजिग्नेट) आहेत. भारतातील विकास व सुरक्षा या संदर्भातील प्रश्नांवर काम करणारी अनंता सेंटर ही ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्था आहे. इंद्राणी याआधी टाइम्स ऑफ इंडियामध्ये राजनैतिक संबंधांच्या संपादक राहिल्या आहेत.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, ""रशिया 40 टक्के तेल व नैसर्गिक वायू युरोपला विकतो. त्यांनी ही विक्री बंद केली तर परिस्थिती आणखी बिघडेल. या तणावामुळे कतारसारख्या दुसऱ्या देशांकडून होणाला एलएनजीचा पुरवठा युरोपच्या दिशेने वळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. भारत, चीन आणि जपान हे कतारकडून सर्वाधिक एलएनजी खरेदी करतात. अमेरिकेच्या दबावामुळे कतारने एलएनजी पुरवठ्यासाठी युरोपला प्राधान्य दिलं, तर त्याचा फटका कोणाला बसेल? स्वाभाविकपणे भारताच्या वाट्याचाच एलएनजी युरोपात जाईल."

परंतु, येत्या काळात भारत स्वतःची तेल व नैसर्गिक वायू उत्पादनाची क्षमता वाढवण्याची शक्यता आहे आणि जागतिक संकट न वाढता परिस्थिती नियंत्रणातही येऊ शकते, असं इंद्राणी म्हणतात.

नरेंद्र तनेजा म्हणतात, "एलएनजीच्या किंमती तेलाइतक्या वेगाने वाढलेल्या नाहीत. याचं एक कारण हे आहे की, एलएनजीच्या किंमती प्रादेशिक बाजारपेठेत निश्चित होतात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नाही. भारताने एलएनजी पुरवठ्यासाठी ज्या देशांशी करार केले आहेत, ते दीर्घकालीन करार आहेत, त्यामुळे या किंमती अनेक वर्षांसाठी निश्चित झालेल्या आहेत."

खाद्य तेल

तेल आणि नैसर्गिक वायू यांनंतर खाद्य तेलावर या संकटाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

युक्रेन हा जगातील शुद्ध सूर्यफूल तेलाचा सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. यात दुसऱ्या स्थानावर रशिया आहे.

पेट्रोल पंप

फोटो स्रोत, Getty Images

इंद्राणी बागची म्हणतात, "या दोन देशांमधील तणाव दीर्घ काळ कायम राहिला, तर घरोघरी वापर होणाऱ्या सूर्यफुलाच्या तेलाची किंमत वाढू शकते."

या व्यतिरिक्त भारत युक्रेनकडून मोठ्या प्रमाणात खतंसुद्धा विकत घेतो. भारतीय नौदलाच्या वापरासाठी काही टर्बाइनचा पुरवठाही युक्रेन भारताला करतो.

खतपुरवठ्यात घट झाली, तर त्याची भरपाई भारत दुसऱ्या देशांकडून करू शकतो, असं इंद्राणी म्हणतात. नौदलासाठी खरेदी करण्यात आलेले टर्बाइन अलीकडेच भारतात पोचले आहेत, त्यामुळे येत्या काळात मोठी समस्या आलीच तर ती मुख्यत्वे खाद्य तेलाशीच संबंधित असेल.

मौल्यवान खडे व धातू

भारत रशियाकडून मोती, मौल्यवान खडे व धातू यांचीही आयात करतो. त्यातील काहींचा वापर फोन आणि कम्प्युटर उत्पादनासाठी केला जातो.

वास्तविक रशिया व युक्रेन यांच्यासंदर्भातील भारताची आयात-निर्यातीची यादी मोठी आहे. या बातमीसोबत देण्यात आलेल्या ग्राफिकवरून वाचकांना त्याचा अंदाज येईल.

जहाज विम्याचा दर

वस्तूंसोबतच व्यापारी मार्गांनाही बाधा पोचण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तज्ज्ञ प्राध्यापक प्रबीर डे रिसर्च अँड इन्फर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्री (आरआयएस) या संस्थेसोबत काम करतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "सध्या तरी फारशी चिंतेची परिस्थिती नाही. युद्ध झालं तर नाटो देशही त्यात सक्रिय होती, मग मात्र जहाज वाहतुकीच्या मार्गांसंदर्भात पूर्वेकडचे नि पश्चिमेकडचे सगळेच देश अडचणीत येतील. या देशांमधील बहुतांश व्यापार समुद्रमार्गाने होतो.

अशा परिस्थितीत जहाज विम्याचा दर वाढतो. त्याचा परिणाम आयात-निर्यातीखालील वस्तूंच्या किंमतींवर होतो. तणावग्रस्त प्रदेशातून एखादा समुद्री मार्ग जात असेल किंवा त्या देशांवर निर्बंध लादलेले असतील, तर हा परिणाम होतो."

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)